वायू प्रदूषणामुळे मुंबईत २५ हजार मृत्यू; जगात पाचव्या स्थानी

    19-Feb-2021
Total Views |

air pollution _1 &nb


ग्रीनपीस संस्थेचे सर्वेक्षण

मुंबई (प्रतिनिधी) - २०२० मध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत मुंबई शहराचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागल्याचे समोर आहे. ग्रीनपीस संस्थेच्या साऊथइस्ट आशिया विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आहे. मुंबईत वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ हजारांच्या घरात असून दिल्ली या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे.
 
 
 
जगामध्ये निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या परिस्थितीला वायू प्रदूषण कारक आहे. वायू प्रदूषणाची भीषण परिस्थिती अधोरेखित करणारे आणखी एक सर्वेक्षण समोर आले आहे. गुरुवारी ग्रीनपीस संस्थेचा वायू प्रदूषणासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. यामाध्यमातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सर्वेक्षणानुसार २०२० मध्ये जगामध्ये वायू प्रदूषणाच्या कारणास्तव मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत दिल्ली शहर पहिल्या स्थानी आहे. दिल्लीत साधारण वायू प्रदूषणामुळे ५४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ टोकियो (४० हजार), शांघाई (३९ हजार), बिजिंग (३४ हजार) आणि मुंबई(२५ हजार) या शहरांचा क्रमांक लागत आहे.
 
 
 
ग्रीनपीसच्या सर्वेक्षणाचा भारताच्या अनुषंगाने विचार करावयाचा झाल्यास दिल्ली - मुंबईनंतर बंगळुरू (१२ हजार), चेन्नई (११ हजार), हैद्राबाद (११ हजार) आणि लखनऊ (६,७०० हजार) या शहरातही वायू प्रदूषणामुळे मृत पावलेल्या लोकांची संख्या आहे. मुंबईसारख्या समुद्र किनारी क्षेत्रात वसलेल्या शहरात वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील वायू प्रदूषणाची गुणवत्ता दिल्लीपेक्षा खालावल्याचे नोंदविण्यात आले आहे. हवेतील पीएम २.५ धूलीकण हे मानवी आरोग्यास घातक आहे. मुंबईत हे धूलीकण वाढत्या वायूप्रदूषणाचे कारक आहेत.