'कॅन्सल कल्चर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2021   
Total Views |

Donald Trump_1  
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालविण्यात आला. सिनेटमध्ये बहुमत नसल्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग बारगळला. त्याविषयी ट्रम्प यांच्या कायदेविषयक सल्लागार मदतनीसांनी वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या कायदेविषयक सल्लागारांच्या मते, ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग म्हणजे 'कॉन्स्टिट्यूश्नल कॅन्सल कल्चर' चा प्रकार होता. थोडक्यात, ट्रम्प यांच्याविरोधात तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी लोकांनी केलेले षड्यंत्र म्हणजे महाभियोग प्रक्रिया होती, असेच त्यांना सुचवायचे आहे. परंतु, त्याकरिता ट्रम्प यांच्या कायदेविषयक समितीने वापरलेला शब्द 'कॅन्सल कल्चर' असा आहे. त्यामुळे हे 'कॅन्सल कल्चर म्हणजे नेमका काय प्रकार आहे? जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी 'कॅन्सल कल्चर'वर विचारमंथन सुरू असते. या संज्ञेत असे काय विशेष आहे? सगळ्या जगाला या 'कॅन्सल कल्चर' भोवती रुंजी घालाविशी का वाटते? तर या नव्याने उदयास आलेल्या 'कॅन्सल कल्चर'चा ऊहापोह आपल्या दृष्टीनेदेखील व्हायला हवा.
 
 
'कॅन्सल कल्चर' म्हणजे 'Ostracism'चा आधुनिक आविष्कार आहे. वाळीत टाकणे, सामाजिक बहिष्कार घालणे हे प्रकार म्हणजेच 'कॅन्सल कल्चर.' सध्या आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाच्या जगात याला पेव फुटले. 'वेबस्टर'ने 'कॅन्सल' या शब्दाच्या अर्थासोबत 'एखाद्याचा पाठिंबा काढून घेणे' किंवा 'त्याला एकटे पाडणे' असा नवा अर्थ लिहिला आहे. 'डिक्शनरी डॉट कॉम' या संकेतस्थळावरील 'पॉप कल्चर' डिक्शनरीत 'कॅन्सल' या शब्दासाठी अजून स्पष्ट अर्थ सांगितला आहे. त्यानुसार 'कॅन्सल' म्हणजे सर्वसाधारण आधुनिक सामाजिक संकेत सोडून केलेले वक्तव्य किंवा कृतीसाठी एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीला किंवा उद्योगसमूह, कंपनीचा पाठिंबा काढून घेणे, त्यांना वाळीत टाकणे. 'कॅन्सल कल्चर' प्रकरणातील वागण्या-बोलण्याचे सर्वसाधारण संकेत 'पुराणमतवादी' नसून तथाकथित 'आधुनिकतावादी' असतात.
 
उदाहरणार्थ - तुम्हाला प्रामाणिकपणे गौरवर्ण आवडत असेल आणि तुमच्या गौरवर्ण आवडण्यामागे कोणतीही वर्णद्वेषमूलक भावना नसली तरीही तुम्ही तुमची आवड उघडपणे व्यक्त करू नका. जर तुम्ही एखाद्याच्या गौरवर्णाचे कौतुक केलेत, तर त्यातून तुम्हाला 'वर्णद्वेष्टे' ठरवले जाऊ शकते. तसेच अलीकडे शारीरिक ठेवणीविषयक बोलणेही 'बॉडी शेमिंग' समजले जाते. एखाद्याच्या लठ्ठपणाविषयी नापसंती दर्शविणे किंवा काहीतरी मत व्यक्त करणे इत्यादी प्रकारांचा समावेश 'बॉडी शेमिंग'मध्ये होतो. कंपनीच्या जाहिरातीत कृष्णवर्णीयांना स्थान नसणे चुकीचे समजले जाते. कंपनीच्या उत्पादनांची नावे भाषेच्या नव्या संकेतात बसणारी असली पाहिजेत. उदा. 'फेअर अॅण्ड लव्हली'चे 'ग्लोव्ह अॅण्ड लव्हली' होणे. थोडक्यात, आधुनिकतावादी वागण्या-बोलण्याचे संकेत अशा स्वरूपाचे आहेत. परंतु, या संकेतांचा दुराग्रह मध्ययुगीन धर्ममार्तंडांना लाजवेल इतका अतिरेकी आहे. कारण, साधारणपणे आपण वाळीत टाकणे, सामाजिक बहिष्कृत असे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर मध्ययुगीन चित्र उभे राहते. पण, 'कॅन्सल कल्चर' हे सुधारणावादी लोकांनी चालवलेला सामाजिक बहिष्कारणाचा प्रकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे हा प्रकार जास्त गंभीर आणि भयंकर आहे. म्हणूनच त्याची चर्चा आज इतक्या मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे. 'कॅन्सल कल्चर' प्रकाराला 'व्होक', 'पॉप' संस्कृतीचाच एक भाग समजले पाहिजे. समाजमाध्यमांमुळे हे प्रकार जास्त सुरू असतात. त्याचे परिणाम म्हणून 'कॅन्सल्ड' व्यक्ती/संस्थेला स्वतःची नोकरी गमवावी लागू शकते, नुकसान सोसावे लागू शकते.
 
डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरसारख्या समाजमाध्यमांनी पूर्णत: नाकारणे म्हणजे 'कॅन्सल कल्चर'च होते. ट्रम्प यांना अनेक माहितीजालावरील व्यासपीठांनी बहिष्कृत केले. मध्यंतरी 'ब्लॅक लाईव्हज मॅटर'विषयी सुरू असलेल्या आंदोलनात 'कॅन्सल कल्चर'चे प्रदर्शन अनेकदा घडले. मध्यंतरी 'Hypatia' या स्त्रीमुक्ततावादी मासिकालाही या 'कॅन्सल कल्चर'चा सामना करावा लागला. 'कॅन्सल कल्चर' आणि अतिरेकी 'पॉलिटिकल करेक्टनेस' धोकादायक असल्याचा सूर जगातून उमटू लागला आहे. तथाकथित डावे, पुरोगामी, उदारमतवादी असे लोकच या 'कॅन्सल कल्चर'ला रुजवू पाहतात. त्यामुळे प्रत्यक्ष संवेदनशीलतेपेक्षा प्रतीकात्मक संवेदनशीलतेला जास्त महत्त्व प्राप्त होते. मुंबईत महिलांना पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. परंतु, पथदर्शकावर पुरुषाच्या आकृतीसह स्त्रीची प्रतिकृती दिसणार, ही आदित्य ठाकरेंनी केलेली घोषणा अशीच प्रतीकात्मक संवेदनशीलता समजली पाहिजे. तर असे हे 'कॅन्सल कल्चर' मानवजातीसमोर एका गंभीर चर्चेचा विषय बनले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@