कथित ‘लिबरल्स’वर ‘पार्लर’वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2021   
Total Views |

parlor_1  H x W
गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान डोनाल्ड ट्रम्प यांचा आकड्यांच्या गणिताने पराभव झाला आणि जो बायडन विजयी झाले. मात्र, त्यानंतर ट्रम्प सत्तेवर होते तोपर्यंतचे जगाचे राजकीय-सामाजिक-वैचारिक चित्र पालटू लागले आणि ‘उजव्या’ म्हटल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना वा व्यावसायिक आस्थापने, माध्यमे-समाज माध्यमांना फटका बसला. त्यातच व्यक्तीच्या ‘अभिव्यक्ती’साठीच्या ‘पार्लर’ या समाजमाध्यमी मंचाचा समावेश होतो. सध्याच्या घडीला आपण ‘ट्विटर’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वगैरे बलाढ्य कंपन्यांची वैचारिक हुकूमशाही पाहतच आहोत. आमचे व्यासपीठ केवळ आमच्याच विचारांना (अविचारांनाही) ‘अभिव्यक्त’ होण्यापुरते मर्यादित आहे, अन्य विचारांनी त्यावर ‘अभिव्यक्त’ होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा गळा घोटायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा दादागिरीचा पवित्रा या समाजमाध्यमी मंचांनी घेतल्याचे नुकतेच दिसून आले. ते साहजिकच म्हणा, कारण ‘ट्विटर’, ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आदी समाजमाध्यमी मंच स्वतःला ‘उदारमतवादी’ (अर्थात डावे) म्हणवून घेतात आणि त्याचा अर्थ आमचा उदारमतवाद फक्त आमच्याच कळपापुरता, असाच असतो, तिथे इतरांना प्रवेश नसतो. ते आधीही होत होते, पण डोनाल्ड ट्रम्प सत्तेत असल्याने उजवे म्हणून नाव घेतले जाणारे समाजमाध्यमी मंच त्यावेळी निदान कार्यरत तरी होते. पण ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि ‘पार्लर’सारखे समाजमाध्यमी मंच ठप्प पडेल, याची तजवीज तथाकथित उदारमतवाद्यांनी केली. इतकेच नव्हे, तर ट्रम्प यांची ट्विटरादी खातीही बंद करण्यात आली.
 
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊनही त्यांच्यावर अमेरिकन संसदेत ‘महाभियोगा’चा प्रस्ताव सादर करण्यात आला, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतर ट्रम्प पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आणि अशातच ‘पार्लर’ हे समाजमाध्यमी व्यासपीठही पुन्हा सक्रिय झाले. आता तर दोघे मिळून २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांची आतापासूनच तयारी करत आहेत की काय, असे वाटते. कारण, डोनाल्ड ट्रम्प आकड्यांच्या खेळात पराभूत झालेले दिसत असले, तरी त्यांच्या पाठीराख्यांची-मतदारांची संख्या गेल्या वेळपेक्षाही अधिक आहे आणि आपला विचारप्रसार पुन्हा एकदा अधिक जोमाने करण्यासाठी त्यांच्या हाती ‘पार्लर’सारखा मंचही आहेच. तत्पूर्वी, साधारण महिनाभर ‘पार्लर’ बंद होते आणि उल्लेखनीय म्हणजे, जेफ बेझोस यांच्या मालकीच्या ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिस’ या ‘वेब सर्व्हर’वरून ‘पार्लर’ला हटवण्यात आले होते. तसेच ‘पार्लर’ला ‘एडब्ल्यूएस’वरून घालवून दिल्याने उजव्यांच्या इंटरनेट प्रसाराला गतिहीन केल्याचे डाव्यांच्याच कंपूचा एक भाग झालेल्या ‘अ‍ॅमेझॉन’चे मत होते. पण आसुरी आनंद फार काळ टिकत नाही आणि झालेही तसेच, ‘पार्लर’ पुन्हा परतले एका नव्या ‘वेब सर्व्हर’च्या साहाय्याने. तसेच बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात दोन हात करण्यासाठी ‘पार्लर’ला नवा ‘सीईओ’देखील मिळाला. आतापर्यंत जॉन मॅट्झ ‘पार्लर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, ‘पार्लर’बद्दलची त्यांची भक्ती नक्कीच कौतुकास्पद होती, पण ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबरीने समाजमाध्यमी व्यासपीठे चालण्याविरोधात होते. तसेच त्यांच्या निष्क्रियतेमुळेही ‘पार्लर’चे पुनरागमन लांबणीवर पडले होते. अशातच कंपनीने मॅट्झ यांना ‘सीईओ’पदावरुन बरखास्त करत मार्क मेकलर यांच्याकडे ‘पार्लर’च्या प्रमुखपदाची सूत्रे दिली. मेकलर यांची ओळख ट्रम्पसमर्थक अशी असून त्यांनी वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितविषयक व अन्य धोरणांची, निर्णयांची प्रशंसा केली, लेख लिहिले. तेच आता ‘पार्लर’च्या सर्वेसर्वापदी आल्याने उजव्या ठरवल्या गेलेल्यांनाही नक्कीच अभिव्यक्तिस्वातंत्र्य लाभेल, असे वाटते.
 
दरम्यान, ट्रम्प यांचे सत्ताच्युत होणे व बायडन यांचा शपथविधी या काळात अमेरिकेच्या ‘कॅपिटल हिल’वर प्रचंड हिंसाचार माजला. त्यावरुन बलाढ्य समाजमाध्यमी मंचांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद केले व आता ‘महाभियोग’ प्रस्ताव रद्द झाला, तरी त्यांचे तिथे पुन्हा स्वागत होईल, असे नाही. या पार्श्वभूमीवर ‘पार्लर’चे पुनरुत्थान येत्या काळातील अनेक घटनांचे संकेत देते. जसे की, ‘पार्लर’ डाव्या टोळीवाल्यांनी लादलेल्या विचारांविरोधात लढाई लढेल. तसेच अराजकतेच्या माध्यमातून सत्तापदे बळकावू इच्छिणाऱ्या तथाकथित डाव्या-उदारमतवाद्यांविरोधातील एक प्रमुख हत्यार म्हणूनही ते पुढे येईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@