मासेमारीच्या तलावात वावर
मुंबई (प्रतिनिधी) - बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामागील मासेमारीच्या तलावात मगरीचे दर्शन घडले आहे. तलावातील पाणी आटू लागल्याने ही मगर दिसण्यात येत आहे. या तलावाशेजारी क्रिकेटचे मैदान असल्याने मानव-मगर संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी या मगरीला सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयामागे मोठे पाणथळ क्षेत्र आहे. यामध्ये बहुतांश करुन स्थानिकांकडून मासेमारी केली जाते. याठिकाणी क्रिकेट मैदानाच्या शेजारी स्थानिक मच्छीमार नागेश पाटील यांचे मासेमारीचे तलाव आहे. या तलावात गेल्या काही महिन्यांपासून मगर दिसून येत आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात आलेल्या पूराच्या पाण्यातून मगर या तलावात आली असावी. दरम्यानच्या कालावधीत मगर त्यांना दिसत होती. यासंदर्भात वन विभागाला माहिती देण्यात आली. वनधिकाऱ्यांनी जागेवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलावात पाणी असल्याने आणि आसपास झाडे-झुडपे वाढल्याने मगरीला पकडणे अशक्य होते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये तलावातील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्ह शेकण्यासाठी ही मगर गाळावर येऊन बसते. काही दिवसांपासून तिचे दररोज दर्शन घडत आहे.
नवी मुंबईत अशा प्रकारे मगर दिसण्याची ही पहिलीच घटना आहे. मगरीचे अस्तित्व असलेल्या मासेमारीच्या तलावाशेजारी एका बाजूस उरण-बेलापूर रेल्वे मार्गिका आणि दुसऱ्या बाजूस क्रिकेटचे मैदान आहे. तलावातील पूर्ण पाणी आटल्यानंतर मगर बाहेर पडण्याचा प्रयत्न करु शकते. अशावेळी मगरीबरोबर मानवाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.