केविलवाणे इमरान खान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2021   
Total Views |

Imran Khan_1  H
 
 
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘नया पाकिस्तान’ निर्माण करण्याचा दावा इमरान खान यांनी केला होता. मात्र, त्या दाव्यातील हवा अवघ्या काही दिवसांतच उतरली होती. कारण, कितीही वल्गना केल्या तरीही पाक लष्कराला हवा तसाच पाकिस्तान निर्माण करावा लागणार आहे, याची जाणीव त्यांना ताबडतोब झाली. त्यामुळे तेव्हापासून पाक लष्कराच्या मेहेरबानीवर आपली सत्ता टिकविणे हाच इमरान खान यांचा एकमेव अजेंडा झाला आहे. तरीदेखील अधूनमधून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी इमरान खान काही उचापती करीतच असतात. मात्र, त्याकडे संपूर्ण जग आणि पाकिस्तानदेखील एखाद्या उनाड मुलाने केलेला ‘टाईमपास’ या नजरेने पाहत असतात. त्यातच इमरान खान यांच्याही कारकिर्दीत जागतिक समुदायामध्ये पाकची पत अधिकच घसरली आहे. विशेष म्हणजे, आता भारतीय उपखंडातील श्रीलंकेनेही इमरान खान यांना आणि पाकला त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे इमरान खान आता अधिकच केविलवाणे झाले आहेत.
 
 
तर झाले असे की, प्रत्येक गोष्टीत भारताची बरोबरी करण्याची सवय खान यांना लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे श्रीलंकेच्या संसदेला संबोधित केले होते, त्याचप्रमाणे इमरान खानदेखील येत्या दि. २४ तारखेला श्रीलंकेच्या संसदेत भाषण देणार होते. त्याची तयारीही त्यांनी केली होती. मात्र, अगदी ऐनवेळी श्रीलंकेने तो कार्यक्रमच रद्द करीत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी कारण दिले ते राजधानी कोलंबोमध्ये कोरोना विषाणू संक्रमण पुन्हा वाढल्याचे आणि त्यामुळे सर्व खासदारांना एकाचवेळी सभागृहात बोलाविता येणार नाही याचे. आता हे कारण अगदीच लंगडे आहे, यात कोणतीही शंका नाही. मात्र, त्यामुळे आनंदी झालेल्या श्रीलंकेतील मुस्लीम नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, श्रीलंकेला इमरान खान यांच्यापेक्षा भारताची नाराजी परवडणारी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कारण, इमरान यांचे संसदेतील भाषण रद्द करण्यामागे पाकची काश्मीरविषयक भूमिका कारणीभूत ठरली आहे. कारण, स्वस्त प्रसिद्धीसाठी इमरान खान आपल्या भाषणात जम्मू-काश्मीर, ‘कलम ३७०’ संपुष्टात आणणे हे मुद्दे बोलणार, याची श्रीलंकेला खात्री होती. त्यामुळे त्यांच्या भाषणाने पुन्हा भारतासोबत नवा वादंग निर्माण करण्याची श्रीलंकेची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय उपखंडात आपली प्रतिमा सुधारून पाकमध्येही आपले महत्त्व वाढविण्याचा इमरान खान यांचा प्रयत्न फसला आहे.
 
 
भारतीय उपखंडात असा अपमान होत असतानाच खुद्द पाकमध्येही इमरान केविलवाणे झाले आहेत. त्यांच्याविरोधात अन्य सर्व विरोधी पक्षांनी एक आघाडी उघडली आहेच. पाकमध्ये विविध ठिकाणी हजारोंच्या सभाही त्या आघाडीने घेतल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे इमरान खान हे लष्कराच्या हातातील बाहुले आहेत, अशी थेट मांडणी त्यांच्याकडून केली जात आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या कन्या मरियम शरीफ त्या आघाडीमध्ये आघाडीच्या नेत्या आहेत. त्यांनी गुजरांवालामधील वझिराबाद येथे नुकतेच एका सभेला संबोधित केले, त्यात जवळपास लाखभर लोक जमले होते. सभेत त्यांनी पाक लष्करालाच थेट इशारा देत म्हटले - इमरान खान यांची निवड करणाऱ्यांना आम्ही निर्वाणीचा इशारा देत आहोत. पाकिस्तानी जनतेचे जीवन बरबाद करणाऱ्याला पुन्हा सत्तेत बसविण्याची चूक करू नका. अन्यथा यापुढे आता जनताच रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला धडा शिकवला जाईल. पाक लष्कराला अशाप्रकारे थेट आव्हान देणे आता तेथील जनतेलाही आवडायला लागले आहे. कारण, आपल्या अशा स्थितीला लष्करच जबाबदार आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीने जनतेची नस अतिशय योग्यप्रकारे पकडली आहे. अर्थात, हे सर्व होत असताना इमरान खान जरी केविलवाणे वाटत असले तरीही त्यांचे पालक असलेले पाक लष्कर या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. कारण, राजकीय पक्षांना कसे वापरायचे आणि कसे चिरडून टाकायचे, याचा त्यांना व्यवस्थित अनुभव आहे. त्यामुळे केविलवाण्या इमरान खान यांच्याऐवजी नवा बाहुला शोधण्यास त्यांनीही एव्हाना सुरुवात केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@