मुंबई : शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे पण अद्याप यावर महाविकासआघाडी सरकारमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही. संजय राठोड वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी गावात बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. याच मंदिरात येऊन धर्मगुरूंच्या साक्षीने आपली बाजू मांडणार आहेत. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार का ? भाजपच्या मागणीनुसार राठोडांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई केली जाणार का ?असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
शिवसेनेतील एक गट संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, या मताचा आहे. नैतिकतेचा भाग म्हणून संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे होते.त्यानुसार त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे. मात्र पक्षाने अधिकृतपणे अद्याप हे जाहीर केलेले नाही. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत काहीही माहिती नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले तर, आठ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने भाजपने आक्रमक पवित्र घेतला आहे.पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला आठ दिवस उलटून गेले आहेत. तरी तिच्या मृत्यूबाबतच्या ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. पूजाने आत्महत्या केली, तिची हत्या झाली की तिचा अपघाती मृत्यू झाला? याबाबत काहीही ठोस माहिती ना पोलिसांकडून दिली जाते ना गृहखात्याकडून. त्यातच रोजच पूजाच्या मृत्यूप्रकरणी नवनवे खुलासे येत असल्याने तिच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे. अद्यापही या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणात अरूण राठोड आणि शिवसेनेचे नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव प्रखरतेने समोर येतंय.या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या ज्यांच्या आधारावर विरोधीपक्षाने थेट संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केलीये. मात्र या आरोपानंतर मंत्री संजय राठोड अद्याप नॉटरिचेबल आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत यांनी समोर आलेल्या सर्व पुराव्यानुसार चौकशी करण्यात येईल असे सांगितले.“या संदर्भात अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की, नियमानुसारच चौकशी होणार आहे. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं म्हणत आहे तर पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. संजय राठोड कुठे आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रा समोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्यशासन निर्णय घेईल, असे अनिल देशमुख म्हणाले.