वाजंत्री ते प्राध्यापक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2021   
Total Views |


rahul hivrade_1 &nbs

 
 
वाजंत्री ते उच्चविद्याभूषित प्राध्यापक हा प्रा. राहुल हिवराडे यांचा जीवनपट अत्यंत खडतर आणि तितकाच प्रेरणादायी आहे. स्वत:चा विकास करता करता त्यांनी समाजालाही दिशा दिली आहे. त्याविषयी...
 
"मी आमच्या तालुक्यातील मशिदीमध्ये जाऊन मुस्लिमांशी बोललो की, कुर्बानी म्हणून बकरा कापू नका. तसेच मी भंडारा ठेवणार्‍या हिंदू बांधवांना पण सांगतो की, अन्नदान श्रेष्ठ आहेच, पण अन्नदानासोबतच गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण किंवा गरीब बापाच्या मुलीचे लग्न लावण्यासही मदत करायला हवी. सृष्टीच्या निर्मितीचे आभार आहेतच, पण त्याच्या नावाने अवडंबर नको,” असे प्रा. राहुल हिवराडे म्हणतात. राहुल हे नागपूरच्या ‘सेंट्रल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ एज्युकेशन’मध्ये साहाय्यक प्राध्यापक आहेत. एमए, बीएड, नेट-सेट आणि एमफील असे त्यांचे शिक्षण असून ‘मराठी’ आणि ‘शिक्षण’ या दोन विषयांत त्यांनी ‘एमफील’ ही पदवी प्राप्त केली आहे. ते ‘ग्लोबल व्हिजन फाऊंडेशन’, ‘महाराष्ट्र राज्य प्रेस संपादक व पत्रकार कल्याण परिषद नागपूर’चे जिल्हाध्यक्ष, ‘कदंबेश्वर समाजपयोगी व व्यवसायाभिमुख सहकारी संघटने’चे संस्थापक आहेत. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद आणि अण्णा भाऊ साठे या दोन विभूतींच्या विचारांवर आणि जीवनकार्यावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. राहुल हिवराडे हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. त्यांच्या आयुष्याचा पट उलगडताना जाणवते की, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही उक्ती त्यांना सार्थ लागू होते.
 
नागपूरच्या कडवेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी गावचे हिवराडे कुटुंब. शंकर हिवराडे आणि संगीता हिवराडे यांना चार अपत्यं. त्यापैकी एक राहुल. शंकर हे बॅण्ड पथकात वाजंत्री म्हणून काम करायचे. ते दहावी शिकलेले, तर संगीता या आठवी शिकलेल्या. शंकर यांची कमाई जरी बर्‍यापैकी असली तरी व्यसनाधिनतेमुळे ती कमाई घरी येईपर्यंत ९० टक्के वजा होत असे. उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये संगीता घर चालवत. असे जरी असले तरी वडिलांनी मुलांना एक शिस्त लावली होती, ती म्हणजे अभ्यासाची. मुलांनी अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावे, हा त्यांचा आग्रहच! जर तसे झाले नाही, तर शंकर मुलांची गय करत नसत. त्यामुळे घाबरून का होईना, मुलं चांगला अभ्यास करत. इतर मुलांसारख्या टिवल्याबावल्या करत नसत. राहुल यांची आजी परिसरातील लोकांच्या घरी बालकांना किंवा महिलांना तेल-मालिश करायला जाई. तिथे तिला जुने-नवे कपडे किंवा वस्तू मिळत. ती सर्व या मुलांना आणून देत असे. राहुल यांना कपडे तर असेच आजीकडून मिळालेले असत. पण, घरात खाण्यापिण्याची वानवाच!
 
पण, राहुल हुशार होते. त्यांना शिक्षकांनी ‘स्कॉलरशिप’च्या परीक्षेला बसवले. आपण उत्तीर्ण झालो होतो, हे त्यांना सातवीला आल्यावर कळले. पण, त्यांना ‘स्कॉलरशिप’चे पैसे मिळत नव्हते. त्यांनी चौकशी केली, तेव्हा कळले की, ‘स्कॉलरशिप’चे पैसे शाळेला मिळत होते. पण, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नव्हते. या घटनेने राहुल यांचे विचार बदलले. त्या दिवसापासून ते सामाजिक परिस्थितीचा विचार करू लागले. आर्थिक तंगी, त्यात सामाजिक परिघात उतरंडीची जात. या दोघांचेही चटके राहुल यांना बसतच होते. खाण्याची आबाळ, वह्या-पुस्तकांनाही पैसे नाहीत. घरी एकवेळची भाकरी मिळते हेच नशीब! राहुल यांनी ठरवले की, आपणही वाजंत्री म्हणून बॅण्ड पथकात जायचे. ते बॅण्ड पथकात वाजंत्री म्हणून गेले. राहुल हुशार असल्यामुळे वर्गातली मुले त्यांच्याशी मैत्री करत. राहुल त्यावेळी रंगाने उजळ होते आणि आजीने आणलेल्या गुजरीच्या कपड्यात टापटीपही राहायचे. ते कोणत्या जातीचे आहेत, याबाबत कुणालही अंदाज बांधता येत नसे. मात्र, वाजंत्री म्हणून काम करत असताना नेमके त्यांच्या वर्गमित्रांनी त्यांना पाहिले. दुसर्‍या दिवशी त्या सगळ्यांनी राहुल यांच्याशी बोलणे सोडले. दुसरीकडे त्यांच्या वडिलांनीही राहुलना खरपूस चोप दिला. ते राहुलला म्हणू लागले, “या कामामध्ये तू का आलास? तू शिक. मोठा हो.” हा दिवस राहुल यांचा परिवर्तनाचाच दिवस होता. सामाजिक स्तर हा खूप महत्त्वाचा असतो. तो स्तर आपण मिळवायलाच हवा, असे त्यांनी ठरवले.
 
ते दहावी उत्तीर्ण झाले. पण, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. शिकायचे तर होतेच. मग त्यांनी गावापासून १६ किलोमीटर अंतरावरील महाविद्यालयात प्रवेश घेतला. कारण, तिथे प्रवेश शुल्क नव्हते. दररोज चालत महाविद्यालयात जायचे. एके दिवशी राहुल आणि मित्र महाविद्यालयाच्या एका वर्गातून बाहेर पडले. बाजूच्या कोपर्‍यात एक मुलगी कावरीबावरी होऊन काहीतरी करत होती. तिला काय झाले असेल? पण, या मुलांना पाहून ती खालीच बसली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. आपल्याला घाबरली असेल म्हणून ही मुले बाजूला झाली. नंतर कळले की, महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी शौचालय नाही. त्या मुलीला मासिक पाळी आली होती. ती कपडे बदलण्यासाठी तिथे होती. हे ऐकून राहुलना खूप अस्वस्थ वाटले. आपली बहीण असती तर? या विचारांनी त्यांनी मित्रांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधणी हा उपक्रम सुरू केला. आजी-माजी विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा केली. या महाविद्यालयात गवंडी काम करणारे विद्यार्थीसुद्धा होते. त्यांच्या मदतीने मग महाविद्यालयात शौचालय बांधण्यात आले. राहुल यांनी या उपक्रमासाठी नेतृत्व केले, मार्गदर्शन केले. दिवस असे चालले होते. मात्र, राहुल यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे जिकिरीचे वाटत होते. मग त्यांनी पुन्हा वाजंत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मिळणार्‍या पैशांतून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. हेही दिवस जातील. शिक्षण महत्त्वाचे, शिक्षणासाठी कितीही कष्ट करायला लागले, तरी थांबायचे नाही, हा विचार त्यांना संजीवनी देत होता.
 
शेवटी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. उच्चशिक्षण घेऊन ते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. आता सध्या ते पीएच.डी आणि एलएलबी करत आहेत. सर्वच समाजातील गरजू मुलांना उच्च शिक्षणाचे व्यासपीठ मिळावे म्हणून कार्यरत आहेत. मुलांनी नोकरीपेक्षा व्यवसाय करावा, त्यातून स्वत:चा आणि समाजाचा उत्कर्ष करावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राहुल हिवराडे यांसारखे तरुण समाजाला दिशा देतात, हेच खरे!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@