गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त व संघाचे स्वयंसेवक अच्युत कऱ्हाडकर यांचे निधन
डोंबिवली : गणेश मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष व विश्वस्त आणि बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले अच्युत मधुसुदन कऱ्हाडकर यांचे मंगळवारी सायंकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आनंद आणि श्रीनंद,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
कऱ्हाडकर हे डोंबिवलीतील पेंडसेनगर मध्ये वास्तव्याला होते. डोंबिवलीतील सार्वजनिक जीवनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते डोंबिवली नागरी सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष आणि माजी संचालक होते. त्यांनी नागरी बॅकेचे संचालक म्हणून जवळपास वीस वर्ष काम पाहिले होते. डोंबिवली नागरी सहकारी बॅकेच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा सक्रीय सहभाग होता. संघाची डोंबिवली शहर रचना होती त्यावेळी ते शहराचे कार्यवाह होते. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री म्हणून त्यांनी काही काळ पदभार सांभाळला होता. अभ्युदय प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. संघाच्या प्रत्येक कामात त्यांचा सहभाग होता. गणेेश मंदिर संस्थानने सुरू केलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत ते सक्रीय सहभागी होते. श्रीराम मंदिरासाठी निधी संकलनाचे कार्यात त्यांनी हिरारीने सहभाग घेतला होता. अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रतील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यांनी निधी संकलन करण्याचे काम त्यांचे सुरू होते. श्रीराम मंदिरासाठी निधी संकलनाचे त्यांचे काम अखेरच्या श्वासार्पयत सुरू होते. डोंबिवलीत सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना ते गुरूस्थानी होते. तसेच अनेकांसाठी ते पितृतुल्य असे व्यक्तीमत्त्व होते.
-----------------------------------------------------------------