आता सूर्यफुलांसारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2021   
Total Views |

namdev dhasal_1 &nbs



दि.१५ फेब्रुवारी कवी नामदेव ढसाळ यांची जयंती. नामदेव त्यांच्या काव्यात त्यातून ‘बेबंद’पणे उमलणार्‍या बंडखोरीतून आणि समाजशीलतेतून जीवंत आहेत. नामदेव ढसाळांच्या कविता शोषित-वंचित माणसाच्या जगण्याचे महाकाव्य आहे. सुखाच्या पलीकडे रडत कुढत जगणार्‍या माणसांचे भावविश्व त्यांच्या कवितेत, त्यांच्या साहित्यात निर्दयपणे मांडले आहे. त्यांच्या कविता कोणत्याही क्षेत्रातील प्रस्थापितांपुढे झुकल्या नाहीत. त्यांचे शब्द कधीही दुसर्‍यांची प्रेरणा घेऊन लिहिते झाले नाहीत. शब्दकळाही अशी की ती ज्याच्यासाठी लिहिली त्याचे अवघे जगणे आणि भोवताल त्यात उमटतो. या महाकवीच्या विचारांचा जागर...


नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही
गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा,
आयभैन न ओळखण्याचा
गुन्हा करू नये
आभाळाला आजोबा अन्
जमिनीला आजी मानून
त्यांच्या कुशीत
गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे

नामदेव ढसाळांच्या कवितेतला एक विचार इथे मांडला. नामदेव या कवितेत श्लिल अश्लिलतेच्या परिघाबाहेरचा विनाश लिहितात. शब्द नुसते कर्दनकाळ होऊन अंतरंगात पिडा देतात. त्या शब्दांनी मर्यादा केव्हाच ओलांडलेली दिसते. पण ते शब्द मनात अक्षरशः घर करतात. अनंत विनाश आणि भयानक विद्वेषाच्या संचारानंतर कवी नामदेव सुचवतात की, सगळं करा पण शेवट मात्र आभाळाला आजोबा अन् जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे. खरेच आहे जातपात, वर्ण, वर्ग आणि न जाणे किती भेदात माणूस आज पार दबला गेला आहे. माणुसकीची कवाडे बंद झालेली दिसत आहेत. या कवितेतून नामदेव समाजाला संदेश देतात की, विसरा भेद. आकाश आणि जमीन यांचे नाते मानत गुण्यागोविंदाने राहा. अर्थात, नामदेव ढसाळ म्हटले की, सभ्य सुसंस्कृत समाजाने दाराबाहेर ठेवलेले शब्द सहज कवितेत पेरणारे अवलिया, असे एक समीकरण नजरेसमोर येते. पण माझ्या मते, त्या शब्दांत अश्लिलता नव्हती, तर समाजाच्या गावगाड्यात अठराविश्वे दारिद्य्र आणि त्यातून प्रवाहित होणार्‍या अनंत विवंचनांचा तो साठलेला ज्वालामुखी होता.
त्या शब्दावरून किती गदारोळ माजला. पण ते शब्द त्यापाठच्या भावना मात्र जराही डगमगल्या नाहीत. आजही त्या ‘जैसे थे’ आहेत.


नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी, १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोट्या गावी झाला. नामदेव यांचे वडील खाटीककाम करायचे. त्यांच्यासोबत नामदेव लहानपणीच मुंबईत आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. वेश्यावस्तीतही काम केले. टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळ एकदा एका कविसंमेलनाला गेले होते. त्यांनाही कविता वाचायची होती. पण त्यांचा अवतार पाहून उपस्थितांना वाटले, हा काय कविता वाचणार? पण तेवढाच ‘टाईमपास’ म्हणून त्यांना कविता म्हणायची संधी दिली गेली. पण त्यांच्या कवितेतला समाजभाव तोही आग ओतणार्‍या शब्दांतून. ती कविता ऐकून सारेच आश्चर्यचकित झाले. त्यांची कविता कोणत्या छंदातली होती? तर ती कोणत्याही छंदातली, मात्रेतली नव्हती. ती कविता होती, आत्म्याच्या रूदनाची. नामदेवांच्या कवितेबद्दल त्यावेळी ग. दि. माडगूळकर म्हणाले की, “आता रसाळ नामदेवांचा (संत नामदेव) काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.”


माडगुळकरांचे म्हणणे अंशतः खरे ठरले. कारण, संत नामदेवांचा काळ संपला नाही. मात्र, नामदेव ढसाळांचा काळ सुरू झाला. ‘गोलपिठा’ काव्यसंग्रहातल्या कविता शोषित, वंचित लोकांचा आवाज आहेत. ज्यांच्या जगण्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही अशा पिचलेल्या लोकांचेदुःखगान, आतला आवाज म्हणजे या कविता. नामदेवांच्या कविता या विद्रोहाच्या अंगाने जातात. पण तो विद्रोह कधीही माणूसपणाच्या चौकटी ओलांडत नाही. माणसाने माणसासारखं जगावं आणि वागावं असे सूत्र धरून त्या कविता समाजासमोर येतात. त्यामुळेच ‘गोलपिठा’ कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये साहित्यिक विजय तेंडुलकर लिहितात की, ”पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशोबांनी ‘नो मॅन्स लॅण्ड’-निर्मनुष्य प्रदेश-जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते.”



नामदेव ढसाळांच्या कवितेत विद्रोह ठासून भरला आहे. त्या कवितेत कधी असेही सूर दिसतात की,
ती पाहा रे ती पाहा,मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्याही आक्यानेझिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
आता या शहरा-शहराला आगी लावीत चला...
पण त्यांनी किंवा त्यांच्या साहित्याने समाजासाठी संघर्ष केला, धर्मविद्वेषाने देश तोडण्याचा मनसुबा कधीही व्यक्त केला नाही. आज विद्रोहाच्या नावाने जे लोक देश तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांना समर्थन करतात, तसे समर्थन नामदेवांची कविता कधीही करत नाही. त्यांची कविता बाबासाहेबांना समाजासमोर आहे, तसे मांडते. ते म्हणतात :
तू अक्षरांचा धनी :
मूकनायकांना, तू शिकवली
प्रत्येक शब्दोच्चारावर तुझा संस्कार
आमच्या प्रत्येक ओळीओळींत तू सामावलेला ओतप्रोत
तसेच बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज मांडताना नामदेव लिहतात :
‘सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर
हजारो वर्षानंतर लाभला
आता सूर्यफुलांसारखे
सूर्योन्मुख झालेच पाहिजे’



नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही कवितांबद्दल लिहिले, तर कदाचित महाखंड तयार होतील. पण व्यक्तिश: मला त्यांच्या ‘गोलपिठा’तील ‘मंदा’ या व्यक्तिरेखेबद्दलची कविता खूप अस्वस्थ करते. ती कविता वाचताना नकळत डोळ्यात अश्रू उभे राहतात. नामेदव एक विद्रोही म्हणून नाही, तर एक सखा, एक शुभचिंतक, कदाचित एक प्रियकर नव्हे नव्हे, एक 100 टक्के माणुसकी असलेला माणूस म्हणून मंदाला जे सांगतो ते आता लिहितानाही मनात प्रचंड कल्लोळ होतो. वेश्या व्यवसायात ढकलली गेलेली एक अल्लड निष्पाप षोडशा. तिने वेश्या व्यवसाय स्वीकारावा म्हणून तिच्यावर होणारा बलात्कार. त्यानंतर उन्मळून पडणारी ती. तिला समजावताना नामदेव म्हणतात :
तुझी सुकी-ओली बोट चराचराला लाव
आणि बघ किमया तुझ्यातल्या निस्तेजपणाची
विसरून जाशील तू अकाली झालेली कत्तल
मंदा माझ्या मोरणी
खिडकीतून बाहेर पायलं की नव्या जगाचा जन्म होतो
पुढे तिला तिच्या स्वत्वाची जाणीव करून देताना नामदेव म्हणतात की,
मंदा माझ्या मोरणी
तुला डांबून ठेवणारी म्हातारी तिला लोक नियती म्हणतात
ती प्राण्याला ताब्यात घेते आणि माती करते
तिला खाऊन उरणारी माणसं
मृत्युंजय असतात आणि जगण्याचे नेतृत्व करतात


‘गोलपीठा’नंतर ढसाळ यांचे ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले’, ‘तूही यत्ता कंची’, ‘खेळ’, ‘गांडू बगीचा’, ‘आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’, ‘तुझे बोट धरुनी मी चाललो आहे’, ‘आंधळे शतक-मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले. ढसाळ यांनी लिहिलेल्या ‘हाडकी हाडवळ’ आणि ‘निगेटिव्ह स्पेस’ या कादंबर्‍या तसेच ‘अंधारयात्रा’ हे नाटकही प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक वैचारिक साहित्यही निर्माण केले आहे. त्यांना ‘पद्मश्री’, लेखनासाठीचे राज्य शासनाचे पुरस्कार, ‘सोव्हिएत लॅण्ड नेहरू पुरस्कार’, ‘साहित्य अकादमी’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ आदी पुरस्कार आणि सन्मान मिळाले होते. पण या सगळ्या पुरस्कारांपेक्षाही त्यांचा मोठा सन्मान म्हणजे आजही शोषित-वंचित समाजासाठी सर्जनशीलतेने आवाज उठवणार्‍या साहित्यिक कवींमध्ये नामदेव ढसाळ हे नेहमीच अग्रणी आहेत. जे समाजाला सांगतात की,
आता सूर्यफुलांसारखे
सुर्योन्मुख झालेच पाहिजे’




@@AUTHORINFO_V1@@