लुका छुपी बहुत हुई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2021   
Total Views |

China_1  H x W:
सन २०२०च्या प्रारंभीपासून ते आजतागायत ज्या एका शब्दाने अख्ख्या जगाला त्रस्त केले ती ‘कोविड-१९’ महामारी. कोरोना...कोरोना आणि फक्त कोरोना... जीवनाच्या सर्वंकष पैलूंवर या कोरोनाने आक्रमण केले. मानवी आयुष्यातील कोणतीही गोष्ट या कोरोनापासून वंचित राहिली नाही. घरात, कार्यालयात, बाजारात आणि जिथे म्हणाल तिथे या कोरोना विषाणूने सर्व नियमच बदलून टाकायला मानवजातीला भाग पाडले. लाखोंच्या तोंडचे अन्न पळवले, तर कोट्यवधींवर जगभरात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा या सर्वविनाशी महामारीला जबाबदार चीनला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे, हा विचारप्रवाह जगभरात अगदी या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून प्रचलित झाला. चीनविरोधी जागतिक आक्रोशाचे वातावरणही तयार झाले. परंतु, चीनने कायमच कोरोनाचा प्रसार रोखण्यास त्यांना आलेले अपयश झाकण्याचाच प्रयत्न केला. जागतिक आरोग्य संघटनेशीही चीनने असहकार्याची भूमिकाच घेतली. त्यामुळे चीनविषयी या महामारीला जन्म देण्याचे संशयाचे वातावरण अधिकच दृढ होत गेले. कोरोनाच्या जवळपास वर्षपूर्तीनंतर जागतिक आरोग्य संघटनेचा एक चमू चीनमध्ये कोरोनाच्या उत्पत्तीच्या चौकशीसाठी दाखल झाला. चीनने जरी त्यासाठी परवानगी दिली असली तरी एकूणच हा देश आणि तेथील कम्युनिस्ट हुकूमशाहीखाली दबलेले प्रशासन याकामी कितपत सहकार्य करेल, याबाबत अमेरिकेसह जगाने मात्र साशंकताच व्यक्त केली आहे.
 
 
जागतिक आरोग्य संघटनेने खरंतर ऐन महामारीच्या प्रारंभीकाळातच चीनमध्ये आपत्कालीन चौकशीसाठी डेरेदाखल होणे अपेक्षित होते. पण, चीनच्या दबावाखाली तसे घडले नाही. आज या महामारीला वर्ष उलटून गेल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे चौकशीपथक चीनमध्ये जानेवारीचे चार आठवडे ठाण मांडून होते. या चौकशीतील निष्कर्ष आगामी काळात समोर येतीलही, पण त्यातून फार काही निष्पन्न होण्याची शक्यता तशी धुसरच! काळ्याचे पांढरे करण्यात पटाईत असलेला चीन एका वर्षानंतर स्वत:च्या कुकर्मांचे पुरावे मागे ठेवेल, अशी अपेक्षाच बाळगणे मुळी हास्यास्पद ठरावे, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वुहानमध्ये चौकशीसाठी हिरणे-फिंडणे केले. कोरोना झालेल्या पहिल्या ४० वर्षीय रुग्णाची भेटही घेतली. त्या रुग्णाने मात्र डिसेंबरपूर्वी किंवा त्यादरम्यान वुहानबाहेर कुठलाही प्रवास केला नसल्याचेही चौकशीतून समोर आले. म्हणजेच काय तर कोरोनाचे उगमस्थान हे वुहान शहरच असल्याच्या तथ्यावर शिक्कामोर्तब झाले. या पथकाने वुहानच्या ‘त्या’ बाजाराचाही फेरफटका मारला. या सगळ्यातून या पथकाने तोच निष्कर्ष अधोरेखित केला की, २०१९च्या डिसेंबरमध्येच कोरोनाचा फैलाव वुहानमध्ये मोठ्या प्रमाणात झाला होता. पण, का? कसा? कोणामुळे? यांसारख्या बाबी मात्र अद्याप अनुत्तरितच आहेत. त्याचबरोबर या पथकाचे प्रमुख पीटर बेन इम्ब्रेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेतून आणि प्राण्यांमधून कोरोनाचा फैलाव झाला, या दोन्ही गृहितकांची कोणतीही पुष्टी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रश्च उपस्थित होणे साहजिक आहे की, प्राण्यांमधूनही नाही, प्रयोगशाळेतील प्रयोगांतूनही नाही, तर मग कोरोना विषाणू आला तर आला कुठून? हे सगळे की कमी काय म्हणून, जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वुहानमधील कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची चीनकडे तपासणीसाठी मागणी केली. पण, चीनने वुहानवासीयांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पथकाला सुपूर्द केलेले नाहीत. त्यामुळे चीन निश्चितच कोरोनाच्या उगमाचे आणि प्रादुर्भावाचे ठोस कारण जगासमोर येऊ नये, यासाठी लपवाछपवीचाच मार्ग अवलंबताना दिसतो.
 
पण, चीन असो अथवा जागतिक आरोग्य संघटना, या जगत्व्यापी महामारीची कारणमीमांसा त्यांना आज ना उद्या करावीच लागेल. जगाला या महामारीमागचे ठोस कारण सांगावेच लागेल. तसे न केल्यास, आधीच आपली विश्वासार्हता चीनच्या दबावाखाली गमावून बसलेली जागतिक आरोग्य संघटना अधिक प्रभावहीन ठरेल, तो दिवस दूर नाही. तसेच भविष्यातही महामारीसारखी भीषण परिस्थिती कोणताही देश दडवून-दडपून टाकणार नाही, म्हणून कडक नियमावली, निर्बंधांचा विचारही करायलाच हवा; अन्यथा महामारीरुपी जैविक अस्त्राचा वापर मानवकल्याणाच्या उज्ज्वल भविष्याचा कर्दनकाळ ठरू शकतो.
 
@@AUTHORINFO_V1@@