८१ वर्षांच्या आजींचे पक्षीप्रेम; १ एकर ज्वारीचे शेत ठेवले पक्ष्यांसाठी राखून

    15-Feb-2021
Total Views |
bird_1  H x W:



मुंबई (प्रतिनिधी) -
पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या ८१ वर्षांच्या सरस्वती भीमराव सोनावणे या आजींचे पक्षीप्रेम वाखणण्याजोगे आहे. कारण, या आजींनी थोडेथोडके नव्हे, तर आपले एक एकर ज्वारीचे शेत पक्ष्यांसाठी राखीव ठेवले आहे. आजींनी राखून ठेवलेल्या या शेतात पक्षीही मनमुरादपणे हुरडा पार्टीचे मज्जा लुटतात.
 
 
पक्ष्यांप्रती असलेली संवेदना व्यक्त करण्यासाठी सोनवणे आजींनी आपला दिलदारपणा दाखवला आहे. या आजींची इंदापूर तालुक्यात अडीच एकरांची शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी ज्वारीच्या पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी लागणारे पाणी विकत घेतले. आता हे ज्वारीचे पीक बहरून आले आहे. म्हणूनच लहानपणापासून पक्ष्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्यामुळे आजींनी जवळपास आपले एक एकरावरील ज्वारीचे पीक पक्ष्यांच्या नावे करुन टाकले आहे. माझ्या जीवामध्ये जीव असेपर्यंत या पक्ष्यांसाठी आपल्या शेतामधील काही भाग राखीव ठेवणार असल्याचे त्या सांगतात. तशी ताकीदही त्यांनी आपल्या मुलांना दिली आहे.
 
 
 
सोनावणे आजींनी राखीव करुन ठेवलेल्या या शेतात दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाट असतो. साळुंखी, चिमणी, पारवा, हुदहूद, शिंपी, तांबट, सुर्यपक्षी, सातभाई, राख, सुरंगी, तितर, राखी वटवट्या, वेडा राघू, घुबड, कोकीळ, मिनिया, सुगरण असे प्रजातींचे पक्षी या शेताला भेट देतात. खाण्याबरोबरच पाण्याचीही सोय आजींनी आपल्या शेतात करुन ठेवली आहे. हजारो पक्षी ज्वारीच्या या पिकावर ताव मारून पाणी पिऊन पुन्हा आपल्या घरट्यात परतात. वयाच्या या टप्प्यावरील आजींच्या जगण्यातील उमेद आणि निसर्गाबद्दल असलेले प्रेम दिसून येते.