मुंबई : संपूर्ण राज्यभर खळबळ माजविणाऱ्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात विदर्भातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजप नेत्या चित्र वाघ यांनी थेट आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
परळी येथील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मात्र यानंतर ११ ऑडिओ क्लिप्स सोशलमीडियावर व्हायरल झाल्या. हे संभाषण अरुण राठोड आणि मंत्री संजय राठोड यांच्यातील असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. याआधी फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या आहेत. त्यामुळे राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यावरूनचा भाजप नेत्या चित्र वाघ यांनी पुन्हा ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, राठोड यांचे ‘आयुष्य उद्ध्वस्त’ होणार या भीतीने खुद्द मुख्यमंत्री चिंताक्रांत आहेत. मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या त्या ऑडीयो क्लीप ऐकल्या असत्या तर कोण आयुष्यातून उठले आहे आणि कोणामुळे हे त्यांच्या लक्षात आले असते."
यापूर्वी मुख्यमंत्र्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना कदाचित घटनेचं गांभीर्य लक्षात आलेलं नसावं. त्यांनी कदाचित या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लीप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असं फडणवीस म्हणाले.