शर्जिल मोकाट, हिंदुत्ववादी नेते अटकेत

    11-Feb-2021
Total Views |
sharjil _1  H x
 
 

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन करतानाच भाजप कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई: महाराष्ट्रात येऊन हिंदूंविरोधी गरळ ओकणार्‍या शरजील उस्मानी याच्या अटकेची मागणी करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांनाच पोलिसांकडून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करत असतानाच शिवाजी पार्क येथे ही अटक करण्यात आली.
 
 
शरजील उस्मानी याच्या अटकेसाठी भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे अध्यक्ष संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून ‘मातोश्री’समोर धरणे धरण्यात येणार होते. मात्र, मोर्चा काढण्यापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करत असतानाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला नाशिकच्या गोदावरीत सोडून दिले असले, तरी भाजप उत्तर भारतीय मोर्चा शरजील उस्मानीला अटक होईपर्यंत शांत बसणार नाही. शांततापूर्ण आंदोलन करत राहील, असा इशारा संजय पांडे यांनी दिला आहे.
 
 
 
“भाजप कार्यकर्त्यांना बुधवारी झालेली अटक म्हणजे हिंदूंविरोधी असलेले महाविकास आघाडी सरकार हिंदूंबाबत कुठल्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचले आहे, हे सिद्ध होत आहे. हिंदूंविरोधी बोलणार्‍या देशद्रोही शरजील उस्मानीला अटक करण्याच्या मागणीसाठी येणार्‍या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कला पोहोचण्याच्या आधीच अटक करण्यात आली. तसेच शिवाजी पार्कला स्मृतिस्थळावर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना वंदन करीत असतानाच ताब्यात घेण्यात आले. ही धरपकड हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पाहत असतील, तर त्यांनाही त्यांचा पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रकारच्या कृत्याने दुःख होत असेल. हिंदूंसाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या बाळासाहेबांना त्यांच्या मुलाच्या सरकारमध्ये हिंदूंनाच अटक केली जात असल्याने त्यांना नक्कीच वेदना होत असतील.
 
 
 
शरजीलच्या अटकेची मागणी करणार्‍या हिंदू बंधू-भगिनींना अटक करण्याकरिता पोलिसांनी जी तत्परता दाखविली, तीच तत्परता शरजील उस्मानीच्या बाबतीत दाखविली असती तर तो महाराष्ट्रच काय, पुण्याच्या सीमेबाहेरदेखील जाऊ शकला नसता,” असेही पांडे म्हणाले. पोलिसांनी बुधवारी अटक केली असली तरी आमचा लढा चालूच राहील. शरजील उस्मानीला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही संजय पांडे यांनी दिला.