काटा रुते कुणाला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2021   
Total Views |
pm modi _1  H x
 
 
 
 
संसदेतील काही क्षण हे सुवर्णाक्षरांनी कोरले जातात अन् लोकशाहीच्या या मंदिरात ते चिरस्थायी होतात. मंगळवारी काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे संसद सदस्य म्हणून निरोपाचे भाषण झाले. यावेळी मोदींनीही भावूक होऊन आपल्या भाषणात आझाद यांच्याशी निगडित भावनांना वाट मोकळी करून दिली, असे विरोधी सलोख्याचे चित्र क्वचितच राजकारणात दिसते. या भाषणात आझाद आणि मोदी काय म्हणाले, हे आपण ऐकले, वाचले असेलच. आता या भाषणाचा अन्वयार्थही समजून घ्यायला हवा. गुलाम नबी आझाद हे राज्यसभेचे तब्बल २८ वर्षे, लोकसभेत दहा वर्षे खासदार आणि जम्मू-काश्मीरचे तीन वर्षं मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते. राजकारणातला, संसदेतील कामकाजाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव. इंदिरा, राजीव, सोनिया आणि आता राहुल गांधी, असे गांधी परिवाराचे ते अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते. पण, गेल्या काही वर्षांत सोनिया-राहुल गांधींशी त्यांचे संबंध काहीसे ताणले गेले. सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्षपदासंबंधी पत्र लिहिणार्‍या त्या २३ नेत्यांपैकी आझाददेखील एक. परिणामी, काँग्रेस कार्यसमितीचे ते आज सदस्यही नाहीत आणि हरियाणाचे प्रभारीपदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. गांधी परिवाराच्या निष्ठेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची, आझाद यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस ही अशी किंमत चुकवावी लागली. काँग्रेसची ही पूर्वापार चालत आलेली संस्कृतीच म्हणा. त्यामुळे आझाद यांनी भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे काटे रुतले ते काँग्रेसवासीयांनाच! काश्मीरवासी आझाद यांनी हिंदुस्थानी मुसलमान असल्याचा व्यक्त केलेला अभिमान हा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींसारख्या समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या काँग्रेसींना लगावलेली एक सणसणीत चपराकच म्हणता येईल. कारण, याच अन्सारींनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मुसलमान देशात सुरक्षित नसल्याचे बेताल विधान केले होते. आझाद यांनी आपल्या भाषणातून अन्सारींच्या या दाव्यातील सगळी हवाच काढून टाकली. शिवाय, काश्मिरी पंडितांचा विषय असो, मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक असो, जाता जाता काँग्रेसचे ‘गुलाम’ अर्थोअर्थी विचारांनी, गांधी घराण्याच्या दबावातून ‘आझाद’ झाले, असे म्हणणे वावगे ठरू नये.
 
 

नाना योग, नाना भोग...

 
आपल्याला पुन्हा राज्यसभेवर काँग्रेसतर्फे संधी मिळणार नाही, यांची गुलाम नबी आझाद यांना पूर्ण कल्पना होतीच, म्हणूनच आपल्या निरोपाच्या भाषणात अगदी मनमोकळेपणाने त्यांनी काही अनुभवांचा संदर्भ देत, अप्रत्यक्षपणे गांधी परिवारावर टोलेबाजी करत, पक्षप्रेमापेक्षा देशहितच सर्वोपरी असल्याचे दाखवून दिले. एकीकडे आझाद यांची ‘एक्झिट’, तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ‘नानायुगा’ची नांदी. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली अन् नानांनी काँग्रेसनिष्ठेचे प्रयोग सुरूही केले. पक्षश्रेष्ठींना खूश करण्याच्या नादात काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सत्ता मिळवून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवीन जबाबदारी म्हटलं की, कोडकौतुक हे आलंच. नानाही वारंवार दिल्लीवार्‍या करून सध्या आणखीन काय काय पदरात पाडता येईल, यासाठी प्रयत्नशील दिसतातच. पण, आज पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांचे जे काही महाराष्ट्रात झाले, तसेच काहीसे भविष्यात नानांच्या बाबतीतही घडले तर नवल ते काय? कारण, काँग्रेस हा अंतर्गत मतभेदांनी पोखरलेला पक्ष. त्यामुळे नानांच्या हातात राज्य काँग्रेसची धुरा आल्यानंतर इतर नेत्यांच्या गोटातून नाराजीचा सूर उमटणं अगदी स्वाभाविकच. त्यामुळे नानांना राज्य आणि केंद्र काँग्रेसची साथसोबत करून निर्णय घेण्याची तारेवरची कसरत करावी लागेल, यात शंका नाही. त्यात हे तिघाडीचे सरकार म्हटल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशीही नाना कितपत जुळवून घेतात, ते पाहावे लागेल. कारण, वयाची पन्नाशी ओलांडलेले नाना हे शेतकर्‍यांचे, ओबीसींचे नेते म्हणून खासकरून विदर्भात सुपरिचित आहेत. २०१४ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेवर निवडूनही आले. त्यांनी पराभव केला तो शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल पटेल यांचा. त्यानंतर भाजपच्या ध्येय-धोरणांवर टीका करत त्यांनी भाजपलाही राम राम ठोकला आणि पुन्हा स्वगृही परतले. शिवाय, विधानसभा अध्यक्ष म्हणूनही नानांचा आक्रमकपणा अनुभवास आलाच. तेव्हा, नानांची ही नवीन इनिंग राज्याच्या राजकारणात ‘नाना योग’ आणि ‘नाना भोगां’ची मेजवानी ठरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
@@AUTHORINFO_V1@@