नाशिक: "नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हावा, नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय व्हावे यासाठी माझ्यासह नाशिकच्या प्रत्येक नागरीकाने स्वागताध्यक्षाच्या भूमिकेतून संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यावी" असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ९४ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन सोसायटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ बोलत होते. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह नाशिक शहरातील मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनस्थळाला ‘कुसुमाग्रज नगरी’ म्हणून नामकरण केले असल्याचे, भुजबळ यांनी यावेळी जाहीर केले.
या संमेलनास शासनामार्फत ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार निधी मधूनही मदत दिली जाणार आहे. येत्या ५० दिवसांत सूक्ष्म नियोजन करुन संमेलनाची परिपूर्ण नियोजन करण्यात यावे. तसेच संमेलनासाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्या लवकरात लवकर गठीत करण्याची सूचनाही भुजबळ यांनी आयोजकांना केली. नाशिकमध्ये होणारे संमेलन वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. तसेच यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.