समाजासाठी माणूस घडवण्याचे ध्येय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2021   
Total Views |

Ramesh Ovalekar_1 &n
 
 
 
चेंबुर आणि परिसरात रमेश ओवळेकर यांचे नाव आदराने आणि तितक्याच स्नेहाने घेतले जाते. संघ समर्पित जीवन जगताना समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या रमेश ओवळेकरांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
 
"तुम्ही घर सांभाळा, कार्यासाठी माणसं उभी करा, नक्कीच करू शकाल,” असे त्यावेळचे मुंबई महानगराचे कार्यवाह अनंतराव देशपांडे म्हणाले. त्यामुळे माझाही हुरूप वाढला. वनवासी कल्याण आश्रमासाठी काम करण्यासाठी चेंबुर भागातून जबाबदार कार्यकर्ता शोधले, तयार केले, असे म्हणू शकत नाही. पण, हे कार्यकर्ते खरोखरच समर्पित भावनेने आज काम करत आहेत, असे चेंबुर भाग संघचालक रमेश ओवळेकर सांगतात, अर्थात त्यात तथ्य आहेच. आज चेंबुर भागाच्या समाजजीवनात आणि रा.स्व.संघाच्या वनवासी कल्याण आश्रमकार्यात रमेश ओवळेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे साधारण १९६० साली रा. स्व. संघाशी ते परिचित झाले. तेव्हापासून समाजचिंतन आणि समाजसेवा हा त्यांच्या जीवनाचा आत्मा बनला.
 
 
चेंबुरमधल्या चरई गावात यशवंतराव आणि भानुमतीबाई या पाठारे प्रभू समाजाच्या दाम्पत्यांना सहा अपत्ये, त्यापैकी एक रमेश होय. यशवंतराव माझगाव डॉकमध्ये वायरमन म्हणून कामाला. आर्थिक संपन्नता नव्हती. मात्र, भानुमतीबाईंनी नेटाने संसार चालवला. भानुमतीबाईंनी मुलांना अशा पद्धतीने वाढवले की, मुलांना घरच्या आर्थिक परिस्थितीची कधी जाणीव होऊ दिली नाही. त्याकाळी दूध देण्यासाठी ओवळेकरांच्या घरी केशनारायण नावाची उत्तर भारतीय व्यक्ती यायची. त्यांनी यशवंतराव आणि भानुमतीबाईंना सांगितले की, “गावात रा. स्व. संघाच्या शाखा चालतात, तुम्ही आपल्या मुलांना तिकडे का पाठवत नाही?” भानुमतीबाईंनी या शाखेबाबत माहिती करून घेतली. आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि शिस्त लागेल यासाठी मग मुलांना शाखेत पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी शाखेमधल्या खेळांमुळे रमेश शाखेमध्ये रमू लागले. शारीरिक शिक्षण त्यांचा आवडता विषय झाला. चेंबुर भागातले संघाचे मान्यवर विजय चेंबुरकर, वामनराव नवरे यांचा प्रभाव रमेश यांच्यावर पडला. रमेश त्यावेळी बालक होते. पण, ते पाहत होते की संघाचे शिक्षक, इतर मान्यवर हे नोकरी करून घरदार सांभाळून संघाचे काम करायचे. संघाचे काम म्हणजे काय तर? प्रत्येक घराला समाजशीलतेशी, राष्ट्रनिष्ठेशी जोडायचे. कुणी गरजू असेल तर त्याला मदत करण्यासाठी हजारो हात उभे करायचे. या सगळ्यांना हे करताना काय मिळायचे? तर समाजासाठी खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य. पण, हे सगळे कधीही कसलीही वैयक्तिक तक्रार करत नसत. आपला जन्म समाजासाठीच झाला असे त्यांचे वागणे. रमेश अशा ऋषितुल्य व्यक्तींच्या संस्कारात वाढत होते. वार्षिक परीक्षा सुरू झाल्या की, विजयराव चेंबुरकर रमेश आणि इतर मुलांना घेऊन परीक्षार्थींच्या घरी जायचे, त्यांना शुभेच्छा द्यायचे. काही सूचना करायचे. जास्त वेळ घ्यायचे नाहीत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठीही हे सगळे जात. लहानपणी रमेश यांना प्रश्न पडे की, हे का करायचे? त्यावर विजयराव म्हणाले, “आपले बांधव आहेत. त्यांच्या जीवनाच्या महत्त्वाच्या वेळी आपण त्यांच्या सोबत असायला हवे. सगळा समाज आपला आहे.” हे वाक्य रमेश यांच्या मनात कोरले गेले.
 
 
असो, रमेश चेंबुर हायस्कूलचे विद्यार्थी. त्यावेळी घरच्या आर्थिक कोंडीमुळे त्यांनी नादारीचा फॉर्म भरला. पण, त्यावेळी ‘जेपी’ची सही लागायची. ती सही जेपीने दिली नाही. कारणही सांगितले नाही. त्यावेळी आईने कसे कसे करून रमेश यांचे शालेय शुल्क भरले. ते शुल्क काही फार नव्हते. पण, त्यावेळी तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. या प्रसंगाने रमेश शिकले की, गरजू-गरीब आणि गांजलेल्या लोकांची परिस्थिती समजून आपल्याकडून होता होईल तेवढी मदत करायची. आयुष्यभर त्यांनी हा विचार मंत्रासारखा स्वीकारला. याच कालावधीत त्यांना भास्करराव मुंडले, मधुकरराव मोघे, शिवराय तेलंग, माधवराव पंराजपे यांचेही मार्गदर्शन लाभले. असो, त्यावेळी अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर ते माझगाव डॉकमध्ये कामाला लागले. त्यावेळीही त्यांनी संघ समाजकार्याला प्रथम स्थान दिले. १९९७ सालापर्यंत त्यांनी संघाच्या विविध जबाबदार्‍या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रमा’साठी काम सुरू केले. संघाच्या वर्गाला शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून ते जात असत. एकदा नागपूरला संघशिक्षा वर्ग होता. ते वर्गाला गेले. तर प्रत्यक्ष सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले की, “या ओवळेकर, संघवर्ग सुरू झाला.” सरसंघचालकांनी इतक्या प्रेमाने आपल्याला बोलवावे, याचा रमेश यांना आजही आनंद आहे. दुसरा प्रसंग असा की, भैय्याजी जोशी हे मुंबईत प्रवासात असताना रमेश यांच्या घरी आले. आधीच ठरल्याप्रमाणे ते जेवणार नव्हते. भैय्याजींना काय खायला द्यावे, असा विचार करत रमेश यांनी कोनफळ हे वनवासी भागातले फळ खायला दिले. भैय्याजींनी अत्यंत आनंदाने ते खाल्ले. ‘साधं जीवन, उच्च विचारसरणी’चा हा जीवंत प्रत्यय रमेश यांना आला. त्यामुळे आयुष्यात कसलाच झगमगाट, अतिरिक्त लोभ हाव न करता जगावे, याकडे रमेश यांचा कल वाढला. आज ज्येष्ठ असतानाही रमेश यांची धडाडी वाखणण्यासारखी आहे. २०१८ ला भीमा-कोरेगाव दंगल झाली. त्यावेळी ज्या वस्तीत दंगल घडली, त्या सर्व वस्तीत रमेश गेले. संघ परिवारातील तिथल्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले. त्यांची विचारपूस केली. हे सगळे समाजरचनेत मागासवर्गीय वर्गात मोडत होते. हे का केले तर या कार्यकर्त्यांना एकटे वाटू नये यासाठी. रमेश यांना कुणीही जबाबदारी दिली नव्हती, त्यांनी याची कुठे वाच्यताही केली नाही. पण, सत्कार्यांचा सुगंध न सांगता पसरतोच. तर असे रमेश ओवळेकर. रमेश म्हणतात, “आम्हाला संघाने घडवले, माणसं समाजासाठी घडवणे, उभी करणे, हे माझे ध्येय आहे. या कामात माझ्या आईने आणि पत्नी मीनाने मला नेहेमीच सहकार्य केले.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@