नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश आणि अयोध्येच्या रामजन्मभूमी खटल्याचा ऐतिहासिक निकाल देणारे रंजन गोगोई यांनी बुधवारी त्यांचे आत्मचरित्र 'जस्टिस फॉर द जज' प्रकाशित करताना अनेक मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या निर्णयात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, १६ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. मात्र, त्या दिवशी एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करून निर्णयात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
सध्याचे राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनीही सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावणारा एक वकील न्यायव्यवस्थेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा खुलासा केला. माजी न्यायमूर्ती गोगोई यांच्या आदेशानंतर त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहण्यास मनाई करण्यात आली होती. न्यायमूर्ती गोगोई म्हणाले की, त्या व्यक्तीचा उद्देश केवळ सुनावणीत अडथळा आणण्याचा होता हे लक्षात आल्याने हे करावे लागले.
रंजन गोगोई यांनी यावेळी सांगितले की, "जर तो माणूस न्यायालयात दाखल झाला असता, तर त्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावर झाला असता. न्यायालयाला या प्रकरणाला स्थगिती द्यावी लागली असती. मी त्याची ओळख कधीच उघड करणार नाही." १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सेवानिवृत्त झालेल्या रंजन गोगोई यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला बोबडे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि इतरही उपस्थित होते.
यादरम्यान, अयोध्या प्रकरणाला प्राधान्य देणे आणि काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणाला प्राधान्य न देणे आणि कलम ३७० रद्द करणे या प्रश्नांवर गोगोई म्हणाले की, अयोध्या प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित होते. त्यावर सुनावणी करण्यासाठी त्यांनी खंडपीठ स्थापन करून ते निर्धारित वेळेत पूर्ण केली.