शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या जतनाचा प्रस्ताव?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2021   
Total Views |

fort.jpg_1  H x
शिवनेरी, राजगड, तोरणा, सुधागड, विजयुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले मराठेशाहीतील निर्णायक क्षणाचे साक्षीदार असून ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडून या वर्षीच्या जुलै महिन्यात केलेला आहे. हा प्रस्ताव पर्यटनाला प्रोत्साहन देईल. परंतु, किल्ल्यांची दुरुस्ती व डागडुजीची कामे लवकर हातात घ्यावी.


महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे ४००हून अधिक किल्ले (३५० किल्ले सरकारच्या नोंद वहीमध्ये दाखल केलेले आहेत) आजही देशवासियांना स्फूर्ती देत आहेत. राज्य सरकारने आता ठरविले आहे की, त्यातील खास सहा किल्ल्यांचे जतन करण्यासाठी व जरुरी पडेल तेथे त्यांची योग्य अशी दुरुस्ती करून हे किल्ले पर्यटनाच्या व लोकशिक्षणाच्या उद्दिष्टाने आकर्षित करावेत. मुंबईकरांना या किल्ल्यांची नावे माहित असली तरी त्यांची थोडक्यात ऐतिहासिक व रंजक माहिती आपण या लेखात बघू या. महाराष्ट्रातील किल्ले एकेकाळी त्यांची गौरवशाली परंपरा व उत्कृष्ट स्थापत्याचा पुरावा म्हणून ओळखले जात.

सरकारकडून या किल्ल्यांचे जतन करण्यासाठी व डागडुजीचे निर्णय घेण्यासाठी एक २४ सदस्यांची समिती या वर्षीच्या जुलै महिन्यात नेमली गेली आहे. या जतन समितीचे अध्यक्ष राहणार आहेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणखी इतर सदस्यही असणार आहेत. निर्देशित सहा किल्ल्यांपैकी पाच किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळाकरिता सरकारने तयार केलेल्या प्रस्तावाच्या यादीतही समाविष्ट केलेली आहेत.या ठरविलेल्या सहा किल्ल्यांची माहिती खाली दिली आहे. यातील पहिले चार गिरीदुर्ग व पुढील दोन जलदुर्ग आहेत.

१. किल्ले शिवनेरी

हा किल्ला १७व्या शतकात बांधला गेला. तो पुणे शहरापासून ९० किमी अंतरावर आहे. या किल्ल्याविषयी विशेष म्हणजे या किल्ल्यातच महाराजांचा जन्म झाला. या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदीर आहे व या देवीच्या नावावरुनच या किल्ल्याचे नाव दृढ झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीला घोषित केले आहे की, या किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता सरकारकडून रु. २३ कोटी मंजूर झाले आहेत. या दुरुस्तीमधून किल्ल्याचा विकास साधला जाणार आहे व त्यात राजमाता जिजाईंकडून बाळ शिवबाला जी शिकवण दिली गेली त्याविषयी ‘शिवसंस्कार सृष्टी’चे दर्शन साधले जाणार आहे. महाराज लहान असताना त्यांच्या मातोश्री जिजाई यांनी शिवबाला शिक्षण देऊन स्वराज्याविषयी आभिमान निर्माण व्हावा, असे ज्ञान दिले. ‘शिवसृष्टीदर्शन’मध्ये शिवाजी महाराजांचे ते लहान असल्यापासूनचे, रोहिडेश्वर येथील त्यांचे स्वराज्य स्थापण्याविषयी शपथविधीचे दर्शन व इतर इतिहासाचे दाखले त्यात दाखविण्यात येतील.या किल्ल्यावर ज्येष्ठ नागरिकांना सहजगत्या पोहोचण्याकरिता रोप-वे बांधण्याची सोय करण्यात येणार आहे.



२. किल्ले राजगड

 
महाराजांनी स्वराज्य विस्ताराकरिता अनेक आदेश या राजधानीसारख्या वसलेल्या राजगड किल्ल्यावरूनच दिले. त्यामुळे त्या २६ वर्षांच्या काळात एक मोठा रोमहर्षक इतिहास बनला आहे. राजगड किल्ल्यावर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. महाराजांचा दुसरा पुत्र राजाराम यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. महाराजांची पत्नी सईबाई यांचा मृत्यु या किल्ल्यावर झाला. तसेच महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यावर त्यांनी परत येथेच त्यांचे स्वराज्याविस्ताराचे काम पुन्हा सुरू ठेवले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या किल्ल्यावरही दुसरा रोप-वे उभारण्यात येणार आहे. १२ महिने येथे देश-विदेशातून शिवप्रेमी जनतेची वाढती गर्दी होत असते. रोप-वे बांधण्यासाठी ‘टाटा’ कंपनीसह दिग्गज कंपन्यांनी स्वारस्य दाखवून आधुनिक व वेगवान रोप-वे बांधण्यासाठी तयारी दर्शविली आहे. बांधा, चालवा व ताब्यात द्या (बीओटी) या तत्त्वावर हे काम करण्याचे ठरले आहे. कंत्राटदाराच्या निवडीनंतर रोप-वेसाठी जागा, खर्च, रोप-वेची क्षमता याबाबत सविस्तर अहवाल बनविण्यात येईल.


३. किल्ले तोरणा


तोरणा वा प्रचंडगड एक उंच डोंगरी किल्ला आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यात तो वसला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे दिसते, पश्चिमेला कानद खिंड व पूर्वेला बाणब व खरीब खिंडी आहेत. महाराज स्वराज्याचे गठन करीत असताना हा किल्ला त्यांनी प्रथम जिंकला तो वयाच्या १६व्या वर्षीच! गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्याने या किल्ल्याचे तोरणा नाव पडले असावे परंतु, या गडाच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव नंतर ‘प्रचंडगड’ ठेवले गेले. या किल्ल्याच्या आजुबाजूच्या विस्तारित भागात त्यांनी अनेक स्मारकचिन्हे बांधली आहेत.


४. किल्ले सुधागड


सुधागड किल्ला अतिशय पुरातन असून इ. स. पूर्व दुसर्‍या शतकापासून अस्तित्वात आहे. या किल्ल्याचे प्रथमचे नाव ‘भोरपगड’ होते. महाराजांनी जेव्हा हा किल्ला आदिलशाहीकडून १६५७ मध्ये जिंकून घेतला तेव्हा त्याचे नाव त्यांनी ‘सुधागड’ ठेवले. किल्ल्याच्या परिसरात ‘ठाणारी लेणी’ आहेत. हा किल्ला फार मोठ्या आकाराचा आहे. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याला राजधानी म्हणून मानत होते. १९५० मध्ये सगळी संस्थाने खालसा केली गेली, तेव्हापासून या किल्ल्याकडे दूर्लक्ष होऊन त्याला अवकळा प्राप्त होऊन अनेक देवळे भग्नावस्थेत पोहोचली. परंतु, सुदैवाने ब्रिटीश लोकांच्या तावडीतून हा किल्ला सुटला आहे.हा सर्व प्रदेश वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यावर दोन तलाव, काही घरे, धान्याचे कोठार, वृंदावने, स्मशाने व कित्येक नष्ट होत असलेल्या वास्तू दिसत आहेत. या किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. त्यातील मोठ्याला ‘महादरवाजा’ म्हणून ओळखतात. येथून सारसगड, कोरीगड, घनगड व तैलाबैलागड या परिसरातील किल्ल्यांचे दर्शन होते. त्यामुळे हा किल्ला पर्यटकांच्या दृष्टिने जतन करावा लागणार आहे.


५. किल्ले विजयदुर्ग


विजयदुर्ग किल्ल्याला ८००हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याभोवती वाघोतन खाडी पसरलेली आहे. हा किल्ला सुंदर तर आहेच पण तो दुर्धर असल्याने कोणत्याही शत्रूला जिंकणे महाकठीण होऊन बसते. हा सिंधुदुर्गच्या देवगड भागात आहे. महाराजांनी मात्र, हा अजिंक्य किल्ला आदिलशाहाकडून १६५३ मध्ये जिंकला तेव्हा सर्व स्वराज्य-बांधवांनी जिंकण्यात पटाईत अशा महाराजांचे कौतुक केले. हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याच्या आरमाराचा एक घटक मानला जातो.मागील काही महिन्यांपासून किल्ल्याच्या तटबंदीचा भाग कोसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने त्याच्या दुरुस्तीच्या संबंधाने मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी संपर्क साधला आहे.



६. किल्ले सिंधुदुर्ग


सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात खुर्ते बेटावर मालवणच्या किनार्‍याजवळ बांधला गेला आहे. किल्ल्याचे बांधकाम १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर या सरदाराच्या पर्यावेक्षणाखाली पार पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात गोड्या पाण्याच्या दूधबाव, साखरबाव व दहीबाव अशा विहिरींची सोय बघून शिवाजी महाराजांनी हा गड तेथे बांधून घेतला. हा किल्ला मुंबईहून ४५० किमी दक्षिणेस आहे. किल्ला बांधण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला व तीन वर्षांचा कालावधी लागला. किल्ल्याचे बांधकाम दि. २५ नोव्हेंबर, १६६४ रोजी सुरू झाले. किल्ल्याच्या पायामध्ये मजबुतीकरिता ४००० पौंडाचे शिसे वापरले आहे. हा किल्ला २८ एकर जागेवर पसरलेला आहे. संरक्षणाकरिता त्याची संरक्षण भिंत तीन किमी लांब, ९.१ मी. उंचीची व ३.७ मी. जाडीची आहे. त्यामुळेच हा किल्ला दुर्धर अशा बांधकाम घटकांनी बनला आहे. हा किल्ला इतका भक्कम व गुप्त पद्धतीने बांधला आहे की, शत्रूला किल्ल्याचे प्रवेशद्वार शोधणे व आत जाणे समजू शकत नाही. तो मजबूत बांधल्यामुळे समुद्राच्या प्रचंड लाटाही या किल्ल्याचे काही नुकसान करू शकत नाहीत. किल्ला अनेक वर्षे उलटून गेल्याने जीर्ण झाला आहे व त्याच्या बांधकामामधील काही लोखंडी घटक आता दिसू लागले आहेत. त्यामुळे या किल्ल्याचीदेखील दुरुस्ती करणे आवश्यक आहे.


या किल्ल्याच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज व चाचे लोकांवर आणि जंजिर्‍याच्या सिद्दी जोहरवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा खूप उपयोग झाला.उपरोल्लेखित किल्ले मराठेशाहीतील निर्णायक क्षणाचे साक्षीदार असून ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणे आपले कर्तव्य आहे. हा प्रस्ताव सरकारकडून या वर्षीच्या जुलै महिन्यात केलेला आहे. हा प्रस्ताव पर्यटनाला प्रोत्साहन देईल. परंतु, ही किल्ल्यांची दुरुस्ती व डागडुजीची कामे लवकर हातात घ्यावी.






@@AUTHORINFO_V1@@