ठाणे : ठाणेकर क्रिकेटप्रेमींसाठी एक खुशखबर, ती म्हणजे तब्बल २५ वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडीयममध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा अनुभव क्रीडाप्रेमींना घेता येणार आहे. ८ डिसेंबरपासून विजय हजारे रणजी करंडक स्पर्धेचे सामने सुरु होणार आहेत. यासाठी संपूर्ण स्टेडियम सामन्यासाठी सज्ज असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, ठाणेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय हजारे रणजी ट्रॉफी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत नमूद केले.
यंदा विजय हजारे करंडकच्या ५ सामने ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. गेले दोन दिवस या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम संपन्न झाले असून ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणीना उजाळा दिला. "दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यापुढे आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी तसेच डे-नाईट सामन्याच्या दृष्टीने स्टेडियमच्या अत्याधुनिक करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी नगरविकास विभागाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येणार," असे त्यांनी संगितले. यासंदर्भात लागणाऱ्या गोष्टीचा सविस्तर प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या.
"ठाणे शहराचा विकास वेगाने होत असला तरी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका प्रशासन सदैव तत्पर असून विविध स्पर्धेचे यशस्वी आयोजन क्रीडा विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. अनेक खेळाडू या स्टेडियमवर येवून गेले असून त्या सर्वानी या खेळपट्टीचे कौतुक केले आहे,. असेदेखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेस महापौर नरेश गणपत म्हस्के, मुंबई क्रिकेट प्रीमियर लीग गव्हर्रनिंग कौन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर, उप महापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, नगरसेवक विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नामवंत क्युरेटर नदिम मेमन, उप आयुक्त मनीष जोशी, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आदी उपस्थित होते.