साहित्यमेळा अखेर पार पडला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2021   
Total Views |

abmss.jpg_1  H


गोदाकाठी रंगलेला आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या यांच्या भाषेत आजवर सर्वात जास्त ‘वेठीस’ धरला गेलेला साहित्यमेळा अखेर पार पडला. अखिल भारतीय स्तरावरील उत्सवाचा सुरवातीपासूनचा प्रवास उलगडणारे ‘साहित्य संमलेन’ समालोचन...




गोदाकाठी रंगलेला आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या भाषेत आजवर सर्वात जास्त ‘वेठीस’ धरला गेलेला साहित्यमेळा अखेर पार पडला. ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ‘साजरे झाले’ किंवा ‘संपन्न झाले’ असे न म्हणता ते ‘पार पडले’. असेच म्हणावे लागेल. आज लिहिताना जरी साहित्य संमेलन समालोचन लिहित असलो तरी, खर्‍या अर्थाने या सोहळ्याचा समाचारच लिहावा, असेच वाटत आहे.त्याला कारणेही तशीच आहेत. एक माध्यमकर्मी म्हणून जे सत्य आहे, ते समोर आणणे हीच एक प्रांजळ भावना आहे. नाशिकच्या भूमीत बालपण गेल्याने, शिक्षण झाल्याने आणि आता नोकरी करत असल्याने मी नाशिककर आहेच. तेव्हा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय स्तरावरील उत्सवाची नेमकी बाजू मांडण्याचे एक नाशिककर म्हणून माझे नैतिक कर्तव्य आहे, अशीच माझी धारणा आहे.साधारणत: २०२०च्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागले. ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते असावे दिल्ली की, नाशिक याबाबत महामंडळात अनेक खलबते झाली. अखेर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी स्थापन केलेल्या ‘लोकहितवादी मंडळा’चे कारभारी यंदाचे संमेलन नाशिकलाच हवे म्हणून महामंडळाच्या कार्यालयात ठाण मांडून बसले. होकार आणि नकारच्या झुल्यावर झुलत अखेर संमेलनाचा मान नाशिकला मिळाला.आपल्या शहरात सारस्वतांचा मेळावा भरणार या कल्पनेने अवघे नाशिककर सुखावले. जागा निश्चिती, वाहन व्यवस्था, निवास व्यवस्था आदी सोपस्कार पार पाडण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांच्या भेटी आणि बैठका यांच्या फैरी झडू लागल्या.





१०० वर्षांचा देदीप्यमान इतिहास असणारी, जवळपास प्रत्येक नाशिककर ज्या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे हे अभिमानाने सांगतो, त्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात संमेलन घेण्याचे अखेर निश्चित झाले. पुढे कोरोनाचा नाशिकसह राज्यात उद्रेक वाढल्याने संमेलनाच्या आयोजनावर काळे ढग घोंघाऊ लागले.२०२१च्या मार्चमध्ये नियोजित असणारे संमेलन सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमार्गे येत अखेर दि. ३ ते दि. ५ डिसेंबरवर येऊन थांबले.फेब्रुवारी ते डिसेंबर या दहा महिन्यांच्या काळात मात्र, या संमेलनाचे खूप पाणी गोदावरीतून वाहून गेले. नाशिक येथील संमेलन हे सहज आणि आनंदाने साजरे होत कोणत्याही वादाची ठिणगी न पडता करता येऊ शकत होते. मात्र, ‘साहित्य संमेलन’ म्हणजे वाद झालेच पाहिजे हा अलिखित शिरस्ता यामुळे मोडायला नको याची पुरेपूर काळजी आयोजक आणि स्वागताध्यक्ष यांनी घेतली. त्यांच्या या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच!
संमेलन आयोजनापूर्वी शहरातील पत्रकार व आयोजक यांच्या झालेल्या बैठकीतच संमेलन कसे आनंददायी होईल यासाठी सूचना मांडण्यात आल्या होत्या. त्यात दै. ‘मुंबई तरुण भारत’ने सक्रीय भूमिका देखील घेतली होती.




नाशिकची ओळख काय? असा जर प्रश्न समोर आला, तर गोदावरी, त्र्यंबकेश्वर, प्रभूरामचंद्र यांचा सहवास, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर अशी काही नावे अगदी सहज सामान्यपणे समोर येतात. अभ्यासक, तज्ज्ञ, जाणकार मंडळी या पंक्तीत कवी गोविंद, जोया, लक्ष्मीबाई टिळक, वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल अशा अनेक महनीय आणि वंदनीय मंडळींच्या नावांचा समावेश करतात.‘साहित्य संमेलन’ आयोजकांना याबाबत पूर्ण माहिती होती. कारण, सर्वच कारभारी हे कला, साहित्य, संस्कृती यांचे जाणकार होते.मात्र, अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे फेब्रुवारी २०२० पासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बाजूला ठेवणे, कोणी सूचना दिल्यास त्यावर केवळ एक स्मित हास्य करणे, निवेदन दिल्यास नक्कीच बघू, विचार चालू आहे. अशी ‘नरो वा कुंजरो वा’ धाटणीतील उत्तरे देणे यामुळे संमेलन वादाच्या किनारी येण्यास सुरुवात झाली.त्यातच जमलेला निधी व त्याचा होणारा विनियोग यामुळे संमेलन आयोजकांत मतभेद निर्माण झाले. त्यावर उतारा म्हणून खर्चाचा हिशोब संमेलन कार्यालयात लावण्यास सुरुवात झाली. त्यातही भरपूर चुका चाणाक्षांनी शोधून काढल्या. त्याच्यादेखील बातम्या झाल्या. ही दुसरी घटना होती की, जी भावनिक न राहता व्यावहारिक या संवर्गात मोडत होती आणि वादाचे कारण ठरत होती.




मधल्या काळात आयोजकांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत होते. एकही दिवस असा नव्हता की, संमेलनासंबंधी काही सकारात्मक ऐकावयास मिळाले.दरम्यानच्या काळात नाशिकसह राज्यातील कोरोनाची लाट आटोक्यात आली आणि पुन्हा एकदा गोदाकाठी ‘साहित्य संमेलना’चे पडघम वाजू लागले. संमेलन आयोजनाचे आता उमटणारे सूर श्रवणीय असतील, असे वाटत असतानाच त्याचे नगार्‍यात रुपांतरण कधी झाले, हे ना आयोजकांना समजले ना नाशिककर नागरिकांना.कारणही तसेच होते. अचानकपणे ‘साहित्य संमेलना’चे स्थान भुजबळ नॉलेज सिटी या स्वगताध्यक्षांच्या आप्तांच्या संस्थेच्या प्रांगणात निश्चित करण्यात आले. मास्कसह पार पडलेले, विद्यमान व माजी संमेलानाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत साजरे केले गेलेले आणि एका जागेवरून दुसर्‍या जागेवर स्थलांतरित झालेले हे बहुधा पहिलेच साहित्य संमेलन असावे.संमेलन आयोजकांनी अशा प्रत्येक पातळीवर साहित्यप्रेमी आणि सामान्य नागरिकांना गृहीत धरले होते का? हाच प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.




जसे जसे संमेलन जवळ येऊ लागले. तेव्हा महापुरुषांच्या आणि महनीय योगदान असणार्‍या व्यक्तींच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. यावेळीदेखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाला तीच वागणूक मिळाली, जी आधीच्या टप्प्यावर मिळत होती. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध होत असतानादेखील त्यांचे नाव प्रमुख पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे शहरातील वातावरण एकदमच बदलले गेले. या पातळीवर नाशिकचे संमेलन पुन्हा एकदा व्यावहारिक वादातून भावनिक उद्रेकाच्या केंद्रस्थानी आले.या सगळ्या प्रवासात नाशिक येथील ‘साहित्य संमेलन’ वादाच्या केंद्रस्थानी कसे राहील याचीच काळजी आयोजकांनी घेतल्याचे दिसून येते. अगदी सहज आणि साध्या उपाययोजनांनी निर्माण होणार्‍या प्रश्नाचे परिमार्जन करता येणे शक्य असतानादेखील वादाला हवा देण्याचाच प्रकार इथे घडला. याची प्रचिती तेव्हा आली, जेव्हा एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आयोजक कारभार्‍यांपैकी एकाने वाद झालेच नाही, तर मजा काय? अशी प्रतिक्रिया दिली. सरस्वतीच्या सोहळ्यात वाद व्हावेच असे आपणास का वाटते असा प्रतिप्रश्न केल्यावर मात्र, वादाची आणि प्रसिद्धीची दूरदृष्टि बाळगणार्‍या ‘संजयाची’ मात्र, बोलती बंद झाली.





अशा सर्वच बाबींनी घेरले किंवा घेरवले गेलेले संमलेन अखेर दि. ३ डिसेंबर रोजी उद्घाटनाच्या घटीकेच्या मंचावर येऊन पोहोचले. मात्र, तिथेदेखील महामंडळाच्या अध्यक्षांनी मुक्ताफळे उधळत यापुढे हेलता-पेलता अध्यक्ष निवडू असे भाष्य करत संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा उपमर्द केला. एकप्रकारे विज्ञानवादी लेखकाचा उपमर्द करण्याचा चंगच आयोजकांनी बांधला होता काय? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला.सकारात्मकतेपासून सुरुवात झालेले संमेलन कारभार्‍यांच्या कार्यशैलीमुळे नकारात्मतेच्या उंबरठ्यावर येऊन संपले. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची या वादात कोणतीही प्रत्यक्ष भूमिका दिसून आली नाही. मात्र, ते अज्ञात होते असे म्हणता येणार नाही. आयोजकांच्या कथित कारभाराला सावरण्यासाठी माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकारांना मैदानात येत मार्गदर्शन करावे लागले. त्यांनी ‘उत्तमा’ची आराधना केल्याने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या रौप्यमहोत्सवी वर्षातील काव्याचा यथोचित सन्मान झाला.केवळ, साहित्यिकाचे नाव माहित असून चालत नाही, तर त्यांच्या साहित्यकृतीची महानतादेखील माहित असावी लागते. हा संदेश या संमेलनामुळे आयोजकांना मिळाला असावा अशी माफक अपेक्षा.



एकहाती कारभार, विकेंद्रित व्यवस्थापनाचा अभाव, निर्णय क्षमतेची भासणारी उणीव, अगाध ज्ञानाचा असलेला फाजील आत्मविश्वास, मराठी भाषेच्या शुद्धलेखनाची नसणारी जाण, नकारात्मक प्रसिद्धीचा हव्यास यामुळे नाशिक येथील ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकदाचे पार पडले असेच म्हणावे लागेल.


हे ही नसे थोडके


 
९४व्या अखिल भारतीय मराठी ‘साहित्य संमेलना’त यंदा पहिल्यांदा ‘बाल साहित्य मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. थोर साहित्यिकांच्या नाशिक नगरीत पुढील पिढीतील साहित्यिकांना उत्तेजन देण्याचा यथोचित प्रयत्न या संमेलनात झाला. कवी कट्ट्याने जागतिक विक्रमाच्या दिशेने वाटचाल केली. सुमारे दोन कोटींच्या घरात पुस्तक विक्री झाली. स्टॉलधारकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या. संमेलनस्थळी धूर फवारणी, कोरोना लसीकरण, आरोग्य तपासणी आदी बाबी सक्षमतेने हाताळल्या गेल्या. सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे सफाई कर्मचार्‍यांनी आपले काम चोख बजावत परिसर स्वच्छ ठेवला. ‘१५१ वर्षांच्या नाशिकचा विकास कसा झाला आणि कसा असावा’ यावरील परिसंवाद नाशिककर जनतेसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरला. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रा’ने त्यांचे कार्य अनेकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. परिसंवादातील काही महत्त्वाच्या विषयांमुळे ‘साहित्य संमेलना’ने ज्ञानपर्वणी साधली गेली असेच म्हणावे लागेल.









@@AUTHORINFO_V1@@