देशात ‘ओमिक्रॉन’चे २२ रुग्ण!

महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ९ जणांना संसर्ग

    06-Dec-2021
Total Views | 104

omicron_1  H x
 
 
नवी दिल्ली : ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग देशात झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ‘ओमिक्रॉन’चे नऊ रुग्ण आढळून आले. महाराष्ट्र आणि राजस्थानातील नव्या रुग्णांमुळे देशातील ‘ओमिक्रॉन’ची एकूण रुग्णसंख्या आता २२वर जाऊन पोहोचली आहे.
 
देशात सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ‘ओमिक्रॉन’चे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये एक आणि डोंबिवलीत एका रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्येही ‘ओमिक्रॉन’चा रुग्ण आढळून आला आहे. रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही ‘ओमिक्रॉन’बाधित रुग्ण आढळून आले. पुणे शहरात एक, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा आणि आळंदी येथे एक तसेच डोंबिवली येथे एक असे एकूण मिळून महाराष्ट्रात आता नऊ रुग्णांची नोंद झाली आहे.
 
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भात सायंकाळी माहिती दिली. पुणे शहरातील ‘ओमिक्रॉन’बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण दि. १८ ते २५ नोव्हेंबर काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याची चाचणी केली असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी या रुग्णाची ‘ओमिक्रॉन’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली.
 
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील बाधित
 
नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षांची महिला, तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी-चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांना ‘ओमिक्रॉन’ची बाधा झाल्याचा अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) रविवारी संध्याकाळी दिला.
 
राजस्थानमध्ये एकाच दिवसात ९ जणांना संसर्ग
 
राजस्थानमध्ये आढळलेले सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. यातील चौघे अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याची माहिती आहे. या चारजणांच्या संपर्कात कुटुंबातील पाच व्यक्तीही आल्याने त्यांनाही ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे समोर आले.
‘डेल्टा’चा अमेरिका, युरोपात हाहाकार
 
‘ओमिक्रॉन’सोबतच अमेरिका आणि युरोपात ‘डेल्टा’चाही फैलाव होत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत सलग पाचव्या दिवशी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या पाच दिवसांत अमेरिकेत रोज कोरोनामुळे १५०० पेक्षा अधिक बाधितांचा मृत्यू झाला. लस न घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
 
नाताळच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता
 
बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, त्यानंतर ब्राझिल, अमेरिका, कॅनडा व युरोप अशा अनेक देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चे बाधित आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबियासह ४० देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा फैलाव झाल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. ‘ओमिक्रॉन’चा सर्वांत जास्त फैलाव ख्रिश्चनबहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढण्याची भीती तज्ज्ञ मंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे. कारण, नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लो शहरामध्ये नाताळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत जवळपास १२० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यातील १३ कर्मचाऱ्यांना ‘ओमिक्रॉन’ची लागण झाली आहे. हा आकडा ६०च्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121