पुढच्या संमेलनासाठी काही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2021   
Total Views |

marathi sammelan_1 &
साहित्य संमेलनाची अशी मज्जा मज्जा...
एकापेक्षा एक कज्जा कज्जा...
संमेलनाचा उडाला का फज्जा फज्जा...
 
वा वा संमेलनाच्या निमित्ताने का होईना, पण टला प जोडून कविता लिहिली. हो, मग कविताच लिहिली. साहित्य संमेलन म्हटले की, असे नुसते कसेसेच होते. त्यातून अशा सुंदर कविता सुचतात. साहित्य संमेलनाचा वाण नाही, पण गुण लागतोच ना? तर विषय काय होता साहित्य संमेलन. वा वा काय ते रूसवे काय ते फुगवे? काय ते शाई फेकणे, बहार आली. साहित्य संमेलनाचा याचसाठी केला होता अट्टाहास...
‘अमृतातेही पैजा जिंके’ असे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आहेत. पण आज मराठी अस्मितेचा डांगोरा पिटणाऱ्या राज्यकर्त्यांच्या काळात मराठी भाषेचे साहित्य संमेलन हे उखाळ्या-पाखाळ्या आणि प्रत्यक्ष माय मराठीची अवहेलना करणारे एक माध्यम व्हावे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना मराठीपेक्षा इंग्रजी भाषा समृद्ध वाटते म्हणे. यावर काहीजण त्यांच्या म्हणण्याचे समर्थनही करत आहेत. मराठी साहित्यामध्ये विज्ञानवादी साहित्य नाही. इंग्रजीमध्ये विज्ञाननिष्ठ साहित्य आहे. त्याची तुलना करता मराठीत असे साहित्यच नाही. त्यामुळे नारळीकरांचे म्हणणे बरोबर आहे, असे त्यांचे मत.
मात्र, यावर काही जणांचे म्हणणे की, साहित्याची वर्गवारी करताना एका प्रकारात जर साहित्य प्रकाशित झाले नसेल, तर त्यात त्या भाषेची चूक आहे का? विज्ञानवादी साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित व्हावेत किंवा विज्ञाननिष्ठ लेखक निर्माण व्हावेत, याची जबाबदारी कुणाची आहे? भाषेची की त्या भाषेचा भावनावाही म्हणून वापर करणाऱ्या तिच्या वारसदारांची? काहीही म्हणा, पण शास्त्रज्ञ वगैरे असलेल्या नारळीकरांचे मराठी भाषाविश्व केवळ विज्ञाननिष्ठ अंगानेच आहे का? आता विज्ञाननिष्ठांनी देव जाणे? या शब्दावर वर आक्षेपबिक्षेप घेतला नाही म्हणजे झाले. कारण, सध्या साहित्य संमेलनाला जगभरच्या उचापती करणाऱ्या चावडीचे स्वरूप आले आहे. हं... आता यावर कुणीही वाद-चर्चा करण्याची नाही. यावर प्रश्न तर अजिबात विचारायचे नाहीत. का? म्हणजे काही उखाळ्या-पाखाळ्या, रूसवे-फुगवे आणि वाद-भांडण पुढच्या साहित्य संमेलनाला ठेवाल की नाही?
 

साहित्य संमेलनाचे असाहित्य!

 
आमच्या साहित्यामध्ये सध्या पुरोगामित्व काय आहे? साहित्य संमेलनातून कोणते प्रश्न सोडवले जात आहेत? साहित्य संमेलनातून कोणता लोकोपयोगी विषय मांडला जात आहे? असा प्रश्न सर्वसामान्य वाचकांना साहित्य रसिकांना पडू शकतो. पण वाचकांना आणि साहित्य रसिकांना विचारतो कोण? त्यांच्यासाठी साहित्य संमेलन असते का? यावर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने काय साधले? मराठी भाषेचा उत्कर्ष? मराठी भाषेच्या समृद्धीसाठीचे प्रयत्न? मराठी साहित्याच्या समृद्धीचे प्रकटीकरण? काय बरं साध्य झाले? नेहमीप्रमाणे काव्य-गझल कट्टे रंगले. पुस्तकांचे स्टॉल लागले. यांत्रिकीकरणासारखे सगळे सोपस्कार पूर्ण झाले. पण माणसात सगळे असावे, पण त्यात जीव नसावा, तसे काहीसे वातावरण होते, असे या संमेलनाला भेट देणार्‍यांचे म्हणणे होते. कारण, राजकारण्यांनी या संमेलनाच्या माध्यमातून डावपेच आखले. साहित्य संमेलन हे काही कुणा राजकीय पक्षाची जहागिरदारी नव्हती. राजकारणाचा भाग सोडून देऊ. कारण, कुणी आणीबाणीच्या काळाची आठवण देऊन थेट दुर्गाबाई भागवत किंवा पु. ल. देशपांडेंसारख्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय साहित्यकारांचे दाखले देतील. पण खरेच साहित्य संमेलनाचा हेतू काय होता? हे कुणी सामान्य जनांना सांगेल का?
 
‘हो जाए कुछ तडक भडक’ किंवा ‘कोरोनामुळे सगळे कसे थंड झालेय, चलो कुछ तो तुफानी हो जाए’ यासाठी संमेलनाचा घाट होता का? असेलही बुवा. या सगळ्या संमेलनात जे काही घडले-बिघडले ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काही महिन्यात विस्मृतीतही जाईल. मात्र, संमेलनात यावर्षी गदारोळाच्या आड एक गोष्ट घडली. ती अनावधानाने नाही, तर दरवर्षीची प्रथा व्हावी म्हणून घडवली गेली आहे. ते म्हणजे विद्येची देवता म्हणून ज्या सरस्वतीदेवीचे पूजन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्हायचे ते पूजन यावेळी केले गेले नाही. हे कशासाठी? ”तर देशात भले तुमची लोकसंख्या ७० टक्क्यांच्या वर असेल, सरस्वतीला विद्येची देवता मानणारे भले तुम्ही ५० टक्क्यांच्या वर असलात तर काय झाले? तुमच्या श्रद्धेला, तुमच्या मान्यतेला आम्ही मानीत नाही. हम करेसो कायदाच.” हे सांगण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वापर व्हावा, यासारखे दुर्दैव नाही. साहित्य संमेलनात साहित्य सोडून असाहित्य सारे काही होते, हे मात्र नक्की...!
 
@@AUTHORINFO_V1@@