आम्ही देशाला काय देणार?

    05-Dec-2021
Total Views |

independence.jpg_1 &



स्वातंत्र्य योद्ध्यांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि यातनांचे ऋण चुकते करण्याची जबाबदारी आता आली आहे, ती आजच्या पिढीवर... ‘स्वातंत्र्याचे ७५वे अमृतमयी वर्ष’ साजरे करताना अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आली आहे की, खरंच त्या बलिदानाचे मोल आम्ही कसे करणार आहोत? त्याबदल्यात आज आम्ही देशाला काय देणार?




स्वातंत्र भारतात स्वातंत्र्याची गोड फळे चाखणारी सध्याची पिढी सर्वांत भाग्यवान म्हणायला हवी. लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्यापासून हवे तिथे राहाण्याचा अधिकार, हवा तो व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकार, हवे ते शिक्षण आणि हवी तितकी संपत्ती कमावण्याचा अधिकार हे सर्व विशेष अधिकार मूलभूत हक्कांसह आजची आपली पिढी मुक्तपणे उपभोगते आहे.मोकळ्या आकाशाखाली मोकळा श्वास घेताना आपला देश स्वतंत्र असणे म्हणजे काय आणि एक नागरिक या अर्थाने आपल्याच देशाच्या भूमीवर मनमोकळेपणे वावरणे म्हणजे काय, याचे मोल स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहाणार्‍या आधीच्या पिढीला विचारले; तर कळतील त्या काळ्या अंधार युगात दडलेल्या असंख्य यातनामय कहाण्या...




 
या सार्‍या यातनांमधून बाहेर येण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा लढताना ब्रिटिशांचा अतोनात छळ त्या पिढीने सहन केला, तो फक्त पुढच्या पिढ्यांच्या नशिबी अशी गुलामगिरीची लाचारी येऊ नये म्हणून! त्यांच्या त्या त्यागाचे, संघर्षाचे आणि यातनांचे ऋण चुकते करण्याची जबाबदारी आता आली आहे, ती आजच्या पिढीवर... ‘स्वातंत्र्याचे ७५वे अमृतमयी वर्ष’ साजरे करताना अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आली आहे की, खरंच त्या बलिदानाचे मोल आम्ही कसे करणार आहोत? त्याबदल्यात आज आम्ही देशाला काय देणार?प्रत्येक भारतीयाला जिवापाड प्रिय असलेले आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळून बघता-बघता या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होतील. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन सारा देश अतिशय उत्साहात साजरा करतो. आता हे ‘अमृतमहोत्स’वी वर्ष, म्हणून हा उत्सव तितकाच यथार्थपणे साजरा व्हायला हवा! त्याअनुषंगाने दि. १५ ऑगस्ट, २०२१ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ हे संपूर्ण वर्ष ‘स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष’ म्हणून मोठ्या दिमाखदार पद्धतीने व्यापक स्वरूपात देशभर साजरे होत आहे.





 
सरकारी पातळीवर अनेक उपक्रम राबवले जातीलच, पण तुम्ही-आम्ही, प्रत्येक सामान्य देशवासीय आपल्या कल्पनेनुसार काही न काही संकल्प घेऊन या उत्सवाचा एक कृतिशील भाग होऊ शकतो. स्वातंत्र्यसंग्रमात लढलेल्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेची आणि कर्तव्यपूर्तीची भावना जागायला हवी. त्यासाठी जनजागृतीचे अनेक कार्यक्रम काही संस्थांनी हाती घेतल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत.भारतीय स्वातंत्र्याचा तेजोमय इतिहास पुन्हा एकदा उजळून काढण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. कुणी व्याख्यानमाला आयोजित करीत आहेत, कुणी लेखमाला किंवा पुस्तकमाला यांचे संकल्प सोडले आहेत. एकूणच जागृतीचे हे पर्व मोठी चैतन्यमय वातावरण निर्मिती करायला हातभार लावणार आहे. आपणही प्रत्येकजण या कार्यात कुठे न कुठे स्वतःला जोडून घ्यायला हवे. ७५ वर्षांची ही देशाची वाटचाल मागे वळून पाहताना लक्षात येते की, स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क, तर मिळाला, मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने मिळाला... पण, कर्तव्याच्या कठोर रस्त्यावर मात्र तेवढ्या जिद्दीने चालणं पुढच्या पिढीला जमलंय का, ‘स्वराज्या’चे ‘सुराज्य’ करणे म्हणावे तेवढे साध्य झाले आहे का, या प्रश्नांचा शोध घेता घेता ‘अमृतमहोत्सव’ साजरा करताना उत्सवाच्या आनंदाबरोबरच कर्तव्याची भावनाही तितकीच प्रबळ हवी.






 
१९४७ साली मोठ्या कष्टाने प्रदीर्घ संघर्ष उभारून, हजारों हुतात्म्यांच्या प्राणांची आहुती देऊन, अखेरीस जनआंदोलनाच्या ताकदीने बलाढ्य इंग्रजांना नामोहरम करीत देशाला स्वातंत्र्य मिळाले. या अद्वितीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास एकापेक्षा एक अशा त्यागमय कहाण्यांनी भरलेला आहे. यात कोणी प्रचंड धाडसी क्रांतिवीर होते, कोणी घरादारावर तुळशीपत्र ठेवलेले निःस्पृह स्वातंत्र्यसेनानी होते, कुणी तळहातावर प्राण घेतलेले देशभक्त होते... यापैकी अनेकांनी आपले संसार पणाला लावले. तुरूंगवासात हालअपेष्टा भोगल्या. फासावर हसत हसत लटकले. त्या त्यागाला सीमाच नाही! एकूणच तो मंतरलेला काळ होता... स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या होमकुंडात जिवाची समीधा अर्पण करायला प्रत्येकजण आतुरला होता. सामान्यांतला सामान्यही, असामान्य त्याग करायला तयार झाला होता. या प्रत्येकाचे एकच ध्येय होते, परदास्याच्या शृंखला तोडून ही भारतभूमी स्वतंत्र करायची. एकच ध्यास होता, या देशवासीयांना परक्यांच्या जुलमी गुलामगिरीतून सोडवून मोकळा श्वास घेण्यासाठी अवकाश निर्माण करायचे. अर्थात भारतीय स्वातंत्र्याची ही चळवळ फक्त या देशाच्या भूमीच्या तुकड्यासाठी नव्हती किंवा ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नाही, अशा इंग्रजांच्या वसाहतवादी वृत्तीचा विरोध म्हणूनही नव्हती, तर कोण कोठून आलेले ते परके शासक एतदेशियांवर करीत असलेल्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी होती. या पारतंत्र्यात सर्वात जास्त दुःखद भाग होता, तो स्वत्त्वावर बसलेला घाला! हरवलेले ते स्वत्त्व परत मिळवणे आणि पिचून गेलेला स्वाभिमान पुन्हा तेजस्वी करणे, यासाठी हा सारा लढा लढवावालागला.







आज पुन्हा एकदा हा स्वत्त्व आणि स्वाभिमानाचा लढा देशाला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी जिद्दीने लढावा लागणार आहे. जुन्या खुणांचा मागोवा घेत घेत पुढच्या सोनेरी भविष्याची योजना आखावी लागणार आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीपूर्वीही या देशावर अनेक आक्रमणे झाली. कुठून कुठल्या टोळ्या आल्या, या भूमीतलं सोनं लुटून घेऊन गेल्या. पण, प्रत्येकवेळी हा देश आक्रमकांना पुरून उरला. इथला धर्म, संस्कृती,परंपरा कधीच नष्ट झाल्या नाहीत. युद्धखोरीपेक्षा शांतताप्रिय असलेला इथला समाज नेहमीच स्वतःला प्रगतीच्या दिशेने नेत राहिला. इथल्या कला, साहित्य, संस्कृती यांचे जतन, संवर्धन करीत राहिला.देशाला वैभव प्राप्त करून देणारे अनेक पराक्रमी, जाणते राजे-महाराजे मध्ययुगात होऊन गेले. शस्त्रविद्या आणि युद्धकलेत निपुण असलेल्या परकीयांसमोर हा देश टिकला. कारण, इथल्या हवा आणि पाण्याचा गुणधर्म आहे शौर्य आणि स्वाभिमानाचा!! या देशाची प्राचीन परंपरा आणि इथले महान तत्त्वज्ञान इथल्या जगण्याचा पाया भक्कम करणारे आहे. आपल्या ॠषीमुनींच्या ज्ञानाची त्याचबरोबरीने विज्ञानाची दृष्टी जगाला चकीत करणारी आहे. आपले पूर्वज अनेक परकीय हल्ले परतवून लावू शकले. कारण, देशाभिमान आणि पराक्रम हा इथला स्थायीभाव प्रत्येक पिढीने आपल्यापरीने जोपासला. पण, इंग्रजी राजवटीत मात्र आपल्या या मूळ स्थायी भावनेवरच हल्ले झाले. सततचा अपमान, छळ, अवहेलना, उपेक्षा आणि तुच्छता या सूड भावनेने जेत्याच्या थाटात वावरणारे क्षुल्लक इंग्रज अधिकारी आपल्या अत्यंत उच्च कोटीची गुणवत्ता असलेल्या एकापेक्षा एक अशा स्वातंत्र्यसैनिकांना मानहानीची वागणूक देत राहिले. भारताच्या अतुलनीय ज्ञानाचा वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. इथल्या परंपरा नष्ट करण्याचा नतद्रष्टपणा केला गेला.






तो प्राचीन मौलिक वारसा पुन्हा एकदा उजागर करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेद, योगोपचार या विषयांचे भारतीय ज्ञानाचे वैभव, तर आपण जगाला देऊ शकतो, हे आज सिद्ध झालेच आहे. पण, अणुविज्ञान असो की शस्त्रास्त्रविद्या, गणित असो की स्थापत्यशास्त्र, तंत्रज्ञान असो की, संशोधन आम्ही कशातच कमी नाही आणि नव्हतो; याची जाणीव येत्या पिढीला करून देण्यासाठी ही ज्ञानसंपदा पुन्हा एकदा नव्याने समोर आणायला आजच्या पिढीने पुढाकार घ्यायला हवा आहे.परकीय शक्तींशी प्राणपणाने या देशाने दिलेली झुंज, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी उभारलेला लढा, त्यासाठी वेळोवेळी करावे लागलेले प्राणार्पण, धीरोदात्तपणे केलेला त्याग, परकीयांची गुलामगिरी सहज न स्वीकारता प्रत्येकवेळी केलेला प्रतिकार, सर्वशक्तीनिशी संघर्ष करीत स्वत्त्व जपण्याचे प्रयत्न, हे पुढच्या पिढीला अभिमानाने सांगण्याची हीच ती वेळ आहे. असे लढे सर्वकाळ सर्व समाजाने दिलेले आहेत.शेतकरी, कामगार, वनवासी अशा सर्वच सामाजिक स्तरावर चळवळी आणि लढे एकेकाळी उभे राहिले होते. यात अनेक अनामवीरांनी हौतात्म्य पत्करले. या संग्रामात महिलांही मागे नव्हत्या. त्यांचा मोलाचा वाटा विसरता येण्याजोगा नाही. त्या सर्वच अनामवीरांच्या स्मरणार्थ एक दिवा, एक पणती लावायला हवी.




 
गतकाळातील शूरवीर, त्यागी, पराक्रमी लोक शोधून इतिहासाच्या पानात दडलेल्या त्यांच्या कहाण्यांना पुन्हा एकदा प्रकाशात आणायला हवे. इतिहासातील अशा प्रेरक गोष्टींचे संचित घेऊनच आजचा वर्तमान अर्थपूर्ण करता येतो आणि उद्याच्या भविष्याची सोनेरी स्वप्ने विणता येतात.भारतीय स्वातंत्र्याची कथा अगदी विविधरंगी आणि विलक्षण आहे. ती वाचताना जाणवते की, ही भारतीयांच्या असीम धैर्याची, अलौकीक त्यागाची आणि महापराक्रमी शौर्याची गाथा आहे. या उदात्त कथेला कधी फंदफितुरी, कधी स्वार्थी अहंमन्यता, भोगवादी विलासी वृत्ती अशा दुर्गुणांचेही गालबोट लागले. हातातोंडाशी आलेले यशाचे घास अशा प्रवृत्तींनी गिळले. परम विजयाच्या पवित्र ध्वजाखाली घरभेद्यांची काळी कृत्येही दडलेली आहेत. आजही अशा प्रवृत्ती डोके वर काढून देशाच्या प्रगतीला खीळ घालत आहेत. राष्ट्राच्या महानतेला कलंक लावत आहेत. कधी उघड तर कधी लपून छपून वार करीत आहेत. दहशतवाद, शहरी आणि ग्रामीण नक्षलवाद, गुन्हेगारी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, अत्याचार, सत्तालोलुपता, स्वार्थांधता, धर्म-जात-पंथ यातील टोकाचे विद्वेष या सार्‍या अपप्रवृत्ती देशाच्या एकतेला आणि समरसतेला घातक आहेत. म्हणून अशा व्यक्ती आणि प्रवृत्ती ओळखून त्यांना ठेचून नेस्तनाबूत करण्याचे मोठे आव्हान आजघडीला या देशासमोर आहे. इतिहासातून हाही धडा घ्यावा लागेल. बाहेरच्या शत्रूबरोबरच देशातील शत्रूंचा बिमोड कुशलतेने करावा लागणार आहे.





सुदैवाने याबाबतीत मोठमोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आजचा भारत सक्षम आहे. स्वाभिमान आणि ‘आत्मनिर्भर’तेचा एक नवा अध्याय लिहिला जातोय. मान उंचावून आणि पाठीचा कणा ताठ ठेवून भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी नेतृत्त्व करण्यास सिद्ध होतो आहे. कोरोनासारखे भयानक आरोग्य संकट येऊनसुद्धा देश पुन्हा एकदा आर्थिक समस्येतून सावरून नव्या आशाआकांक्षेसह उभा राहतो आहे.एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वय वर्ष ७५ म्हणजे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरचे परिपक्व वळण... पण, एखाद्या राष्ट्राची ७५ वर्षं म्हणजे त्याच्या प्रगतीची आशादायी पहाट! अशी प्रगती आणि विकास एकमेकांच्या हातात हात घालून चालू लागले, तर देश यशोशिखराकडे वाटचाल करेल, यात शंकाच नाही. तळागाळापर्यंत विकासाचे हे अमृत झिरपत जाईल. खर्‍या अर्थाने स्वतंत्र भारत समर्थदेखील होईल. पण, भारताला असे समर्थ आणि शक्तीशाली करण्यासाठी पुन्हा एकदा फार मोठी चळवळ उभी राहायला हवी. त्याला जनआंदोलनाचे व्यापक स्वरूप लाभायला हवे. इंग्रजांसाठी जसा ‘चले जाव’चा नारा परिणामकारक ठरला, तसा आजच्या काळात प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरणार्‍या सगळ्या ’दुःष्प्रवृत्तींपासून मुक्ती’ चा नारा द्यावा लागेल. त्यासाठी पुन्हा ७५ वर्षांपूर्वीची देशभक्तीची जाज्ज्वल्य भावना इथे प्रत्येकाच्या मनात जागी व्हायला हवी. त्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीमुळे सुखलोलुप झालेल्या आणि तृप्तीची झापड आलेल्या समाजाला पुन्हा एकदा खडबडून जागे करावे लागणार आहे.





असे म्हणतात की, स्वातंत्र्यलढ्याच्या त्या भारलेल्या काळात मनामनात स्वातंत्र्याची ज्योत रात्रंदिवस पेटलेली राही.. एवढेच नव्हे, तर इथल्या दगड- मातीतूनही ’वंदे मातरम्’चा जयघोष ऐकू येईल...





देशभक्तीने भारलेला
तो काळ पुन्हा येईल का?
पुन्हा दगड-मातीत इथल्या
वंदे मातरम् जागेल का?





 - अमृता खाकुर्डीकर