भीमराज की बेटी उद्योजिका उज्ज्वला कांबळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2021   
Total Views |

annapurna 2.jpg_1 &n



एखाद्या समाजाची प्रगती कशी मोजावी, तर त्या समाजामध्ये स्त्रीचे स्थान काय आहे? यावरून त्या समाजातील महिलांची परिस्थिती कशी आहे, यावरून असे डॉ. बाबासाहेबांचे मत होते. डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने समाजकारण राजकारण आणि इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात अत्यंत स्थितीतली व्यक्ती आपलाठसा उमटवत आहे. जातपात पंथ, भाषा आणि लिंगभेदाची सीमा लांघून आज माणूस म्हणून भारतीय नागरिक सर्वच क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यशील असलेल्या उज्ज्वला कांबळे त्यापैकी एक होत. ‘अन्नपूर्णा पर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ या उद्योगातून त्यांनी उद्यमशीलतेचा नवा अध्याय समाजासमोर मांडला आहे. त्यांच्या उद्यमतेचा घेतलेला मागोवा...




आभाळ असं चौकटीतलं
असेना का?
चौकटीबाहेरचा सूर्य
बाबासाहेब आहेत,
त्या सूर्याची प्रेरणा
मी आता आभाळच
निर्माण करत आहे...


 
 
समाजातल्या आयाबायांचे दु:ख सर्वसाधारणपणे एकच असते. रूढीपरंपरा, ठराविक साचेबद्ध आयुष्याची चौकट आणि महिला म्हणून जाणतेअजाणतेपणी नाकारली गेलेली संधी, असे मत सार्वत्रिक आहे आणि महिलांचा अनुभवही सार्वत्रिक आहे. मात्र, या चौकटीबद्ध रूढीवादी जगण्यातही स्वत्वाची प्रेरणा देणार्‍या महापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार प्रेरणा हीच देशातल्या तमाम महिलांच्या अभिव्यक्ती आणि आत्मशक्तीची जाणीव आहे, हे नक्की. या आत्मप्रेरणेची जाणीव घेऊनच उद्योजक उज्ज्वला कांबळे यांच्या कार्यशैलीचे आगळेवेगळेपण निर्माण झाले आहे. ‘नाही रे’ गटातून ‘आहे रे’ गटात सकारात्मक रीतीने पदार्पण करताना रडगाणे नाही की निराशेची कटूता नाही. आहे केवळ जे आहे ते स्वीकारण्याची वृत्ती. प्रत्येक परिस्थितीला भिडण्याची प्रवृत्ती.





आयुष्यात जे ठरवतो तेच होते असे नाही, तर कधी कधी अनपेक्षितपणे आयुष्यात वळणं येतात आणि त्या वळणानुसार माणाला मार्गक्रमण करावे लागते. या बदलाला सामोरे जाणे सोपे नसते. उज्ज्वला यांच्या आयुष्यातही अशीच वळण आली. जे ठरवले होते ते परिस्थितीअभावी झालेच नाही. मात्र, जे अपेक्षित होते ते साध्य झाले नाही म्हणून थकून हरून उज्ज्वला बसल्या नाहीत. आयुष्यातल्या प्रत्येक अंधार्‍या समस्येला उज्ज्वलेतेने सामना करत त्यांनी आपले नाव सार्थ केले. ‘अन्नपूर्णा पर्स मॅनुफॅक्चरिंग कंपनी’ या कंपनीच्या उज्ज्वल यशामध्ये उज्ज्वला यांचा सिंहाचा वाटा.ज्वेलरी पाऊचेस, डायमंड पाऊचेस, कॉईन पाऊचेस, सौंदर्य प्रसाधन पाऊचेस, परप्युम पाऊचेस, सिल्व्हर युटेनशिअल पाऊचेस, ऑप्टिकल पाऊचेस आणि चॉकलेट पाऊचेस बनवणे हे काम ‘अन्नपूर्णा पर्स मॅनुफॅक्चरिंग कंपनी’ करते. कंपनीच्या तीन शाखा आहेत.





 
एक घाटकोपर नित्यानंदनगर येथे, दुसरी भायखळा येथे आणि तिसरी आसनगाव येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने काही दशकांपूर्वी सुरू झालेली ही कंपनी. ही कंपनी कशी सुरू झाली याचीही कहाणी. विद्या कांबळे यांनी नकारात्मक परिस्थितीमध्ये मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्या अन्नपूर्णा देवीच्या भक्त. देवीवर त्यांची नितांत श्रद्धा. तशा त्याही अन्नपूर्णाच. कुटुंबांना संस्कार आणि स्थिरता देण्यासाठीचे त्यांची भूमिका अन्नपूर्णा मातेसारखीच होती. त्यांचे पुत्र सुनील हेही अत्यंत समजदार आणि जबाबदार. वयाच्या १४  व्या वर्षापासून सुनील काबाडकष्ट करून घराचा भार उचलत होते. त्यासोबतच शिक्षण घेत होते. पुढे मित्रांच्या ओळखीने त्यांना पाऊचेस, पर्स वगैरे बनवण्याचे तंत्र आत्मसात केले. एक छोटासा गृहउद्योगच सुरू केला. त्या उद्योगाला अर्थातच नाव दिले अन्नपूर्णा! ज्याप्रमाणे अन्नपूर्णा मातेचा हात कधीही वैभवसंपन्न असतो, तसाच ‘अन्नपूर्णा’ कंपनीही वैभवसंपन्न असावी, अशी इच्छा. या इच्छेसोबतच होती ती डॉ. बाबासाहेबांच्या स्वाभिमानी विचारांची प्रेरणा. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंंत्र.






या सुनील कांबळे यांच्या पत्नी उज्ज्वला आभणे. उज्ज्वला या मूळच्या औरंगाबादच्या शिवाजीराव आभणे आणि सुमन आभणे यांच्या कन्या. आभणे कुटुंब मूळ नंदूरबारचे. पण कामानिमित्त औरंगाबादला स्थायिक झालेले. अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंब. बाबासाहेबांनी समाजाच्या समतेसाठी अस्तित्वासाठी लढा दिला. त्या समतेचा मध्यममार्ग या कुटुंबाने जपलेला. उज्ज्वला यांचे लहानपण सर्वसामान्य घरच्या मुलींसारखेच होते. आपण वकील व्हावे, असे त्यांना वाटायचे. पण आयुष्यात जसे ठरल्यासारखे झाले नाही. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना एका हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण करता करताच त्यांनी त्यांचे कलाशाखतेले शिक्षणही सुरूच ठेवले. पुढे त्या नर्स म्हणून नोकरीही करू लागल्या. गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचा विवाह मुंबईच्या सुनील कांबळे या सुविद्य आणि उद्योगी तरुणाशी झाला.




 
औरंगाबादमधून मुंबईच्या नित्यानंदनगरमध्ये सासरी आयुष्य जगताना उज्ज्वला यांना सुरुवातीला जडच गेले. कारण, औरंगाबाद आणि मुंबई शहरांची भौतिकता, जडणघडण वेगळी. या सगळ्या काळात पती सुनील यांनी समर्थ साथ दिली. उज्ज्वला यांनी ठरवले की, आपणही काहीतरी काम करावे. पण घर आणि नोकरी दोन्ही सांभाळताना कसरत करावी लागे. शेवटी पती सुनील यांच्या सल्ल्याने त्या घरच्या व्यवसायात जबाबदारी घेऊन काम करू लागल्या. पाऊच कसे बनतात? त्याची विक्री कशी आणि का होते? याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. पण आलेले प्रत्येक आव्हान स्वीकारण्याचे बळ उज्ज्वला यांच्यामध्ये होतेच. ‘भीमराव की बेटी मैं तो जयभीमवाली हूं’ हे वाक्य केवळ गाण्यात न राहता आयुष्यात उतरवण्याची धमक त्यांच्यात होती.





 
त्यामुळेच ‘अन्नपूर्णा पर्स मॅनुफॅक्चरिंग कंपनी’च्या पाऊच उत्पादनाची त्यांनी पूर्ण माहिती घेतली. मुंबई शहर नवीन होते. या शहरात हे पाऊच घेण्याच्या ऑडर्स मिळवायच्या कुठून तर? मोठ्या ज्वेलरी शॉपमधून, मोठमोठ्या कंपनीमधून. या ठिकाणी मराठमोळा निम्नवर्गातला माणूस जाण्यासही विचार करतो. जावे की न जावे? मग मुळात शहरात नवीन असलेल्या उज्ज्वला यांनाही हे आवाहन होतेच. पण त्यांनी शहरातील या दुकांनाचा आणि कंपन्यांचा अभ्यास केला. आपण बनवलेल्या उत्पादनांना कुठे भाव मिळेल? कुठे मागणी मिळेल, याचा अंदाज घेतला आणि त्यांनी काम सुरू केले. सुरवातीला अनेक टक्केटोमणे खावे लागले. अंदाज चुकले तर काही तांत्रिक अडचणीही आल्या. सुरुवातीला एक ‘ऑर्डर’ मिळाली. दागिने ठेवण्याचा पाऊचची ऑर्डर. उज्ज्वला यांनी ती ‘ऑर्डर’ घेतली. त्या पाऊचवर काय ‘प्रीटिंग’ असावे, आकार रंग कसा असावा? सगळे अगदी उत्साहात समजूनही घेतले. पतीच्या मदतीने कंपनीतून या ऑर्डरनुसार पाऊचही तयार केले. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस कोसळत होता. त्या सगळे पाऊच घेऊन त्या दुकानदाराकडे गेल्या.





दुकानदाराने पाऊच आकार रंग सगळे पाहिले आणि तो म्हणाला, ‘ही ऑर्डर कॅन्सल. या पाऊचवर प्रिंट केलेला मोबाईल नंबर चुकीचा आहे. असा चुकीचा मोबाईल नंबर दिलेला पाऊच आम्ही का म्हणून घ्यायचे आताच्या आता हे सगळे पाऊच घेऊन निघा इथून.” हे ऐकून उज्ज्वला यांना काय वाटले हे त्यांच्या त्याच जाणोत. पण इतक्या उत्साहाने मेहनतीने आणि काही अपेक्षेने पूर्ण केलेली ऑडर्स ही अशी नुकसान करून रद्द झाली. आता पती सुनील काय म्हणतील? हे नुकसान कसे भरून काढणार? पण डॉ. बाबासाहेबांच्या सम्यक् क्रांतीला मनापासून मानणारे सुनील उज्ज्वला यांना म्हणाले, “जाऊ दे. झाले ते झाले. पुढच्या वेळेपासून जास्त काळजीने काम करू.” त्या दिवसापासून उज्ज्वला यांनी ठरवलेे की आपण आपले काम विशेष मेहनत आणि लक्ष देऊन करायला हवे. हे मला माहिती नाही, ते जमणार नाही वगैरे म्हणणे टाळून सगळे शिकायला हवे. इथूनच पुढे उज्ज्वला यांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली.






 
सुनील आणि उज्ज्वला यांनी काम वाटून घेतले. सुनील यांनी पाऊच बनवण्यासंदर्भात उत्पादन क्षेत्र पाहायचे, तर उज्ज्वला यांनी त्यासंदर्भातला खरेदी-विक्री विभाग पाहायचा. सुरुवातीला नित्यानंदनगर येथे असलेल्या कंपनीच्या शाखा वाढू लागल्या. कर्मचार्‍यांची संख्या वाढू लागली. एका कंपनीच्या तीन कंपन्या झाल्या. या सगळ्या कर्मचार्‍यांशी आपुलकीने आणि स्नेहाने वागावे, ही पद्धत मात्र आजही कंपनीत आहे. कंपनीची ही घोडदौड सुरू असताना उज्ज्वला यांना वाटले की, बाबासाहेबांनी सांगितले होते की, समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या महिलेच्या प्रगतीवरून पाहावी. घाटकोपर नित्यांनद नगर किंवा मुंबईमध्ये समाजाच्या वस्त्यांमध्ये महिलांची स्थिती काय होती? याचा अंदाज उज्ज्वला यांना आला होता. त्यांनी पाऊच बनवण्याचे काम वस्तीतील महिलांना द्यायला सुरुवात केली. त्यासंदर्भातले प्रशिक्षणही त्यांनी महिलांना दिले. महिला स्वावलंबी झाल्या. त्यांच्या कुटुंबात थोडेतरी आर्थिक स्थैर्य आले.





 
उज्ज्वला म्हणतात, “एक महिला स्वावलंबी झाली. जागृत झाली तर अख्खं कुटुंब प्रगती करते. माता रमाईने डॉ. बाबासाहेबांना जी साथ दिली. ती साथ किती मोलाची आहे? डॉ. बाबासाहेबांनी रमाईला जो आदर, प्रेम दिले ते किती मोलाचे आहे! आज बाबासाहेबांना आठवताना त्यांच्या या वेगळ्या पैलूंचाही विचार करायलाच हवा. कुटुंबाच्या नात्याची विण घट्ट करताना रमाईने जे कष्ट उपसले त्या कष्टाची जाण बाबांना होती. त्यामुळेच समाजातल्या आयाबायांसाठी बाबांनी हक्काची सनद दिली. ही सनद तळागाळात मला पोहोचवायची आहे. शालेय शिक्षण महिलांना मिळते, पण आर्थिक साक्षरता तळागाळात घराघरात पोहोचावयची आहे. ‘भीमराज की बेटी’ म्हणून आर्थिक साक्षरतेच्या दुनियेत प्रत्ेयक महिला यशस्वी व्हायला हवी!”








@@AUTHORINFO_V1@@