स्वावलंबी व्हा, स्वाभिमानी व्हा, डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक विचार हाच संदेश देत असतो. लोअर परेलच्या चाळीत राहणारे मयुर देवळेकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांची कार्यप्रेरणा घेऊनच आयुष्याचे गणित सोडवले असेच म्हणावे लागेल. ‘साईन बोर्ड मेकिंग’च्या दुनियेत बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि आपल्या कष्टाने आणि ठसा उमटवणारे मयुर देवळेकर यांच्या उद्योजकतेचा घेतलेला आढावा... अमूक जातीत जन्मल्याने अमूकच व्यवसाय करावा, असा साधारण एक अलिखित नियम समाजात होता. आज तो कमी झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवळेकर कुटुंबीयांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला छेद देत आधुनिक जगाच्या दिशेने पाऊल उचलले. ‘साईन बोर्ड मेकिंग’च्या दुनियेत प्रवेश केला. लोअर परेलच्या दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे एक कुटुंब काका गणपत देवळेकर ‘साईन बोर्ड मेकिंग’च्या कामात ’मेटलमॅन’ होते. मुले कळतीसवरती झाली की, त्यांना पोटापाण्यासाठी काम करावे लागत असे, तरच मुंबईत निभाव लागायचा. काकांच्या ओळखीने १९९०साली या कुटुंबातील मुले ‘साईन बोर्ड मेकिंग’च्या कामात आली. मयुर शिवराम देवळेकर हे त्या भावांमधील एक आज यशस्वी उद्योजक आहेत. रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष आहेत. मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे, सामाजिक भान जपणारे सुजाण नागरिक आहेत. त्यांच्या या वाटचालीविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.मयुरजी म्हणाले, “कितीतरी कठीण प्रसंग आले, व्यावसायिक जीवनातअडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्या जीवनात प्रेरणा होऊन आले आणि मी स्वतःसोबतच समाजाचे देणे लागतो, मला थांबून चालणार नाही, हे उमजत गेले.”लहानपणापासून मागासवर्गीय समाजातील गरीब लोकांमध्येच देवळेकर राहिले. तेथील रोहिदास समाज पंचायत संघात विविध व्याख्याते येत असत. कितीतरी कार्यकर्ते आपापसात चर्चा करीत असत. त्यातूनच बाबासाहेबांचे स्फूर्तिदायक विचार त्यांच्या मनावर ठसले. विशेषतः बाबासाहेबांनी दिलेला पुढील संदेश त्यांच्या जीवनाचा दीपस्तंभ ठरला.बाबासाहेब म्हणत असत, जन्माला येऊन जगातील दुःख, दारिद्—य आणि दास्य यांनी वेढलेले, अवनत आणि अपमानित जीवन तुम्ही जगत आहात, हे ईश्वरी संकेतानुसार आहे, असे तुम्ही समजत असाल, तर या जगातून नाहीसे होऊन जगाच्या दुःखाचे ओझे का कमी करत नाही? अरे, तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वतःच्याकर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे, हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून स्वाभिमानपूर्ण जीणे जगायचे असेल, तर स्वावलंबन आणि शिक्षण हाच आत्मोन्नतीचा मार्ग आहे, हे कायम लक्षात ठेवा.या प्रेरणादायी संदेशाने सुरू केलेली वाटचाल मग थांबलीच नाही. १९९४ साली ‘कॅडबरी’, आईस्क्रीमच्या जाहिरातीसाठीची मोठी ऑर्डर मिळाली. ते काम उत्तम प्रकारे करून दिल्यावर मुंबई, गोवा आणि मध्य प्रदेशातील काम पण मिळाले. ‘टर्न ओव्हर’ वाढला.
आपण मराठी माणूस असूनही नेटाने व्यवसायात उतरू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. मग लाडक्या पुतणीच्या नावाने ’मनाली न्यूयॉन’ असे नाव व्यवसायाला दिले. आता कंपनीच्या नावाने ‘कॉन्ट्रॅक्ट’ घेणे, बिले देणे असे सुरू झाले. आपण १५-२० लोकांना रोजगार देऊ शकतो, याचा मनस्वी आनंद झाला. नव्या बदलत्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये प्राप्त केली.यादरम्यान जग बदलत चालले होते. लाकडी ‘साईन बोर्ड’पासून सुरुवात करणार्या कामगारांना नवनवीन गोष्टी शिकाव्या लागल्या. स्टील, एलईडी, न्यूयॉन साईन, अॅक्रेलिक आणि डिजिटल असे वैविध्य या व्यवसायात येत गेले. मॉल सुरू झाले. त्यांना जाहिरातीसाठी विविध प्रकारचे ‘साईन बोर्ड’ लागत असत. यातूनच २००७ फ्युचर ग्रुपशी करार करण्यात आला आणि व्यवसायदेखील या दरम्यान वाढत गेला. हळूहळू वरळीत गांधीनगर येथे आधी भाड्याने व नंतर स्वतःची जागा घेतली. आता ’मनाली न्यूयॉन साईन’चे रजिस्टर्ड नाव पाटर्नर सुमित मेहतासोबत ‘एम. एन. साईन’ झाले. नवीन तंत्रज्ञान वापरून मराठी माणसाला या व्यवसायात आणायचे. त्याला स्वतंत्र व्यवसाय करू शकेल, अशी प्रेरणा द्यायची, असे माणूस घडवणेसुद्धा देवळेकरांनी केले. कितीतरी मुले शिकून स्वत: कमावू लागली.लोकांना मोठे करत करत आपण मोठे झालो.व्यवसाय वाढला, ही समाधानकारक बाब होतीच. पण तरीही समाजाचे आपण देणे लागतो, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ते म्हणतात, “बाबासाहेब आंबेडकरांचे नाव माझ्यासाठी जादूची किल्ली आहे. मला भव्य रोहिदास भवन उभारण्यात यावे, असे वाटत होते. पुन्हा दलित म्हणून हिणवले जाऊ नये म्हणून नवीन पिढीसाठी आपण काही करावे, असे वाटत होते. त्याच वेळी शासनाने घोषणा केली की, ’बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने डॉ.आंबेडकरांनी जिथे सभा कार्यक्रम, केले तिथे स्मारके उभी करणार! आमच्या लाल मैदान परळ भागाला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला.आज १२ हजार सदस्य संख्या असलेल्या रोहिदास समाज पंचायत संघाचे देवळेकर अध्यक्ष आहेत. भवनाचे बांधकाम जोरात सुरू आहे.
आ. भाई गिरकर व आ. मंगेश कुडाळकर यांचे या महत्त्वपूर्ण कार्यात मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे. रोहिदास भवन कशासाठी? तर मयुर यांचे म्हणणे आहे की, बाबासाहेबांनी शोषित, वंचित समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी आयुष्यभर ध्यास घेतला. बाबासाहेबांना अभिप्रेत असणार्या सक्षम समाज घडवण्याचे उद्दिष्ट रोहिदास भवनाचे असणार आहे. बाबासाहेब सगळ्या शोषित, वंचितच नव्हे, तर समस्त भारतीयांच्या स्वप्नांना आवाज आणि अर्थ देणारे नायक आहेत. त्यांनी दिलेला शिक्षणाचा, ‘आत्मनिर्भरते’चा मार्ग या भवनातून प्रसारित होईल, असा प्रयत्न होणार आहे. थोडक्यात, समाजातून उच्चशिक्षित तरूण घडावेत, स्वावलंबी, समाजशील पिढी जी समाज आणि देशाला प्रगतिपथावर नेईल, असे उपक्रम या रोहिदास भवनामध्ये असतील. आ. भाई गिरकर यांच्या कार्यक्षेत्रातील वणंद दापोली येथील माता रमाई स्मारकाची पुनर्रचना,सुशोभीकरण मयुर देवळेकरांच्या देखरेखीखाली होत आहे. लवकरात लवकर लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.अठरापगड जातींचे लोक आपल्या समस्या घेऊन मयुर यांच्याकडे येतात. जातीचा दाखला मिळवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो. मध्य प्रदेशातील सरकारने शाळेतच ‘ऑथेन्टिक’ दाखला देण्याची सोय केली आहे. तशी इथे व्हावी या मागणीसाठी देवळेकरांनी सरकारच्या दारी धरणे धरली.या वाटचालीत त्यांच्या कुटूंबियांची त्यांना खंबीर साथ लाभली.
‘आपण नोकरी करणारे नाही, तर नोकरी देणारे व्हायचे’ असा विश्वास मनाशी बाळगून देवळेकरांनी आपले आयुष्य घडवले. आज त्यांची मुले नवल आणि सलोनी हेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजकतेच्या वाटेवर गतिमान आहेत. बाबासाहेब नावाचा प्रेरक मंत्र हा एका व्यक्तीला किती बाजूंनी समृद्ध समर्थ करू शकतो, याचे मयुर देवळेकर हे एक उदाहरण आहेत.
- रमा दत्तात्रय गर्गे