उद्यमजगतातील बाबासाहेबांची प्रेरणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2021   
Total Views |

ambedkar.jpg_1  
 


 
दि. ६डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात रक्तविहीन सकारात्मक क्रांती करत कोटी कोटी कुळे उद्धरली! त्यामुळेच आधुनिक भारताच्या सामर्थ्यामध्ये शोषित, वंचित समाजगटातील व्यक्तीही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे.




ही सगळी डॉ. बाबासाहेबांची पुण्याई. या पुण्याईमुळेच उद्योग-व्यवसाय क्षेत्रात यश संपादन करणार्‍या उद्योजक आणि उद्योजिकांच्या कर्तृत्वाचा आलेखही असाच देदीप्यमान आहे. हे कर्तृत्ववान उद्योजक आणि उद्योजिका म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिप्रेत असलेला आत्मविश्वास आणि यश होय. त्यामुळेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ यावर्षी उद्योजक बंधु-भगिनींच्या कर्तृत्वाला समर्पित ‘बाबासाहेबांची उद्यमप्रेरणा’ या विशेषांकाचे प्रकाशन करीत आहे. मी ‘प्रथम भारतीय’ आणि ‘अंतिमही भारतीय’ असे म्हणणार्‍या बाबासाहेबांनी देशाच्या एकात्मतेसाठी सर्वोच्च योगदान दिले. संविधानरूपी ऐक्याचे अमृत आपल्या देशाला दिले. कायद्याचा अर्थ लावताना देशातील शोषित-वंचित घटकांच्या विकासाचा आणि उन्नतीचा मार्ग मोकळा केला.





देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा विचार करणार्‍या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज देशात विविध स्तरांवर कार्य करणार्‍या संस्था आणि व्यक्ती यशस्वी होताना दिसत आहेत. ‘आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं...’ अशी सत्य धारणाही समाजाच्या मानसिकतेत आहे. मात्र, बाबासाहेबांमुळे समाजाला माणूस म्हणून जगण्यासोबतच माणसांच्या गर्दीतही समाजशील आणि राष्ट्राभिमानी माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले. चाकोरीबद्ध जगण्यात, पारंपरिक व्यवसाय किंवा जुन्या रूढी-परंपरेंच्या चौकटीतले अर्थार्जन यांनाही योग्य ते सकारात्मक वळण मिळाले आहे.





 
गुणानुसार आणि आपल्या आवडीनुसार व्यक्ती अर्थार्जन करू लागल्या आहेत. या अर्थार्जनासाठी कोणतीही जातीय चौकट नाही. आपल्या महाराष्ट्रात तर असे साधारण म्हटले जाते की, मराठी माणूस ना? व्यवसाय-उद्योग हा काही त्याचा पिंड नाही. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज समाजात विविध व्यवसाय-उद्योगांमध्ये सचोटीने आणि प्रामाणिकपणे यश मिळवणारे अनेक उद्योजक आहेत. त्यांच्या उद्योगाची आणि समर्थ स्वावलंबनाची प्रेरणा केवळ बाबासाहेबांचे विचारच आहेत. जातीय समीकरणापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने उद्योग-व्यवसायात स्वत:चा ठसा उमटवणार्‍या या सर्व भीमनिष्ठ उद्योजकांस मानाचा जय भीम...










@@AUTHORINFO_V1@@