तालिबान्यांची भीती अशीही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2021   
Total Views |

Taliban_1  H x
 
 
२००१ साली तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बामियान येथील इ.स. सहाव्या शतकातील १८० फूट उंच बुद्धांची मूर्ती अक्षरशः स्फोटके लावून उडवली होती. का तर म्हणे ती बुद्धमूर्ती बिगरइस्लामी होती. मात्र, ज्या ठिकाणी बुद्धमूर्ती फोडल्या होत्या, ते स्थान २०२१ साली तालिबानी पर्यटनस्थळ म्हणून सांगत आहेत. इतकेच नव्हे, तर या तुटलेल्या बुद्धमूर्तीचे अवशेष किंवा या स्थानाचे कुणाला दर्शन घ्यायचे असेल, तर तालिबान्यांनी त्यासाठी पाच डॉलर शुल्कही निर्धारीत केले आहे.
 
 
२००१ ते २०२१ या कालावधीमध्ये २० वर्षे गेली. सध्या तालिबानी अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आहेत. आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेल्या तालिबान्यांना सत्ता राबवण्यासाठी पैसा हवा आहे. अशावेळी जगभरातून आर्थिक मदत मागताना तालिबान्यांनी पैसे कमवण्यासाठी काही उपक्रम राबवले. दैव बघा, २००१ साली तालिबान्यांनी ज्या ठिकाणी बुद्धमूर्ती फोडल्या होत्या ते स्थान तालिबानी पर्यटनस्थळ म्हणून सांगत आहेत. जगभरातून श्रद्धाळू तथागतांच्या मूर्तीचे अवशेष का होईना पण पाहायला येतील आणि त्यातून पैसे मिळतील असे तालिबान्यांच्या एका गटाला वाटते, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे की, इस्लामिक राज्यात बिगरइस्लामचे काय होते हे पाहण्यासाठीचे उत्तम उदाहरण म्हणजे हे स्थान आहे. कट्टर इस्लाम धार्मिकतेबद्दल आकर्षण असलेले आणि अशा पद्धतीचे अनुयायी असलेले लोकही जगभरात आहेत, तर असे लोक खास तालिबान्यांचे शौर्य पाहण्याच्या इच्छेनेही या ठिकाणी येत आहेत. या म्हणण्यात तथ्य आहे कारण, काही हौशी लोकांनी या स्थळाला भेट देणाऱ्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी एकाने मनोगत व्यक्त केले की, "ज्यावेळी या मूर्ती फोडल्या तेव्हा मी लहान होतो. आता मी या मूर्त्यांचे अवशेष आणि खंडहर पाहून कृतकृत्य झालो कारण, आमच्या धर्मांत पुतळा आणि बिगरइस्लामला मान्यता नाही." हे सगळे ऐकून वाटते, जग अगदी आकाशगंगेतल्या प्रत्येक ग्रहावर जरी पोहोचले तरी हे विध्वसंक विचार मांडणाऱ्या आणि कृत्य करणाऱ्या लोकांमध्ये काही बदल होणार की नाही? असो, बुद्धमूर्तीचा संदर्भ यासाठी दिला आहे की, सध्या पाकिस्तान आणि तुर्कस्तानमध्ये अशा चित्र-प्रतिकांवरून काही हिंसक घटना घडल्या आहेत.
 
आपणच मोठे इस्लामचे कैवारी या आवेशात असलेल्या पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचा कडक कायदा आहे. पख्तुनख्वा प्रांतामध्ये एका व्यक्तीने कुराणाची प्रत जाळली. पाकिस्तानी पोलिसांच्या मते ती व्यक्ती मनोरूग्ण आहे, तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात द्यावे म्हणत हजारो लोकांनी त्या पोलीस चौकीला घेराव घातला आणि पोलीस चौकीच पेटवून दिली. दुसरीकडे तुर्कस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणात वृद्धी व्हावी म्हणून शालेय पाठ्यपुस्तकात एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात मोहम्मद पैगंबर एका लहान मुलीला पाठ्यपुस्तक देऊन शाळेत पाठवत आहे असा मजकूर आणि चित्र होते, तर मोहम्मंद पैगंबरांचे चित्र काढलेच कसे? ही ईशनिंदा आहे म्हणत तुर्कस्तानात सगळ्या शालेय पुस्तकांची राखरांगोळी, तर केलीच केली वर तिथे हिंसा सुरू झाली. ईशनिंदा किंवा कुणाच्याही श्रद्धा दुखावणे वाईटच. पण जेव्हा आमच्या श्रद्धाच महान आणि तुमच्या श्रद्धा केवळ तोडण्यासाठी आणि अपमान करण्यासाठीच आहेत असा समज कुणाचा होतो तेव्हा ती गंभीर बाब असते. धार्मिक संदर्भातले चित्र-पुस्तक यावरून हिंसा करणाऱ्या मानसिकतेचे लोक जेव्हा तथागत गौतम बुद्धांच्या फोडलेल्या मूर्तीच्या अवशेषावरही पैसा कमवण्याची शक्कल लढवतात, तेव्हा त्यांच्या मानसिकतेबद्दल संतापासोबत कीवही येते.
 
 
तथागत बुद्धांचे नाव घेत आपल्या देशातही कार्य करणारे, चळवळी करणारे अनेक संस्था आणि व्यक्ती आहेत. महापुरूषांच्या पुतळ्याबाबत तेही संवेदनशील आहेतच. पण तालिबान्यांच्या बुद्धमूर्ती भंजन आणि सध्या मूर्ती अवशेषांचे प्रदर्शन यावर त्यांनी चकार शब्द उच्चारलेला दिसला नाही. ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ म्हणत अमेरिकेत घडलेली हिंसा असो की, रोहिंग्या मुस्लमानांना म्यानमारमध्ये मिळणारी अन्यायी वागणूक असू दे यासाठी सामान्य भारतीयांना वेठीस धरणारे काही मूर्ख महाभाग आपल्या देशात आहेत मग, आता तालिबान्यांच्या या बुद्धमूर्ती अवशेष प्रदर्शनीबद्दल यांचे काय मत आहे? की, तालिबानी नाव ऐकताच सगळे धर्मप्रेम, मानवहक्क, अभिव्यक्तीस्वातंत्र्य मरून गेले? छे! तालिबान्यांची भीती अशीही...
 
 
@@AUTHORINFO_V1@@