साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची नुकतीच जन्मशताब्दी संपन्न झाली. सा.‘विवेक’ने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाची निर्मिती केली असून, त्याचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १० डिसेंबर रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. हा प्रकाशन सोहळा ३.३० वाजता सा. ‘विवेक’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’चे फेसबुक पेज असलेल्या ‘महाएमटीबी’वरही आपल्याला ‘लाईव्ह’ पाहता येईल. सदर ग्रंथातील एक लेख आज त्यानिमित्ताने प्रकाशित करत आहोत.
साहित्य ही एका संवेदनशील मनाची कलाकृती असते. कलावंत समाजातील भल्याबुर्यात घटितांची नोंद आपल्या स्मरणपटलावर घेत असतो. त्या नोंदींचे साद-पडसाद त्याच्या मेंदूवर पडत असतात. त्याची प्रतिभा प्रतिमांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून एक कलात्मक चित्र निर्माण करत असते, तीच ती कलाकृती! साहित्य, कला आणि संस्कृती हे त्या कलाकृतींची निर्मिती स्थळ असते. कलावंताला संवेदनशील मनासोबत सामाजिक बांधिलकीची चाड असेल, तर त्याची कृती परिवर्तनाचे दिशादर्शन करते. त्याच्या दिशादर्शनाने ललित कलासुद्धा अंधाराच्या वाटा तुडवत प्रकाशाची पेरणी करत जाते. अशा अंधारल्या वाटांवर, विविध पातळ्यांवर उजेड पेरणारा, परिवर्तनाची मशाल तेवणारा साहित्यिक, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा धनी शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मराठी साहित्य प्रांतात अढळ असे स्थान आहे, हे आता स्पष्ट झाले आहे आणि यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
अण्णा भाऊंच्या उण्यापुर्या ५० वर्षांच्या आयुष्यात प्रचंड ऊर्जा निर्माण करून लढण्याचे तत्त्वज्ञान मांडणारे साहित्य त्यांनी निर्माण केले. त्यांच्या साहित्याचा विचार करता ते खरेपणाच्या कसोटीवर उतरते. साहित्याची एक परिभाषा आहे. जे साहित्य हिताचे आहे; म्हणजे समाजहिताचे आहे ते साहित्य! अण्णा भाऊंचे सर्वच साहित्य समाजहिताचे आहे. ते प्रचारकी साहित्य नाहीच नाही. त्यांच्या वगनाट्यांचा, शाहिरींचा, लावण्या, कथा-कादंबर्यांचा आणि नाटकांचा विचार केल्यास दु:खाची किनार आणि शोषणाची झालर आहे आणि म्हणूनच त्यांची लेखणी दु:ख पुसून टाकण्यासाठी, शोषण संपविण्यासाठी संघर्षाचा लाल बावटा हातात घेऊन क्रांतीचे वस्त्र पांघरते म्हणून अण्णा भाऊ मराठी साहित्यातील आगळेवेगळे रसायन आहे आणि म्हणूनच त्यांच्या काळातील तथाकथित पांढरपेशा समीक्षकांनी त्यांची दखल घेतली नाही. झापडबंद समीक्षेने त्यांना दोन हात दूरच ठेवले. परंतु, दलित साहित्याच्या निर्मितीनंतर जाणीवपूर्वक अण्णा भाऊंच्या साहित्याकडे आपसूकच लक्ष वेधले गेले आणि ‘साहित्यसम्राट’, ‘साहित्यिकांचे साहित्यिक’ अशी बिरुदे लावून अण्णा भाऊंचे अनुयायी त्यांना सन्मान प्रदान करतात. अतिशयोक्तीचा यात भाग नाही. तो आतड्याचा संबंध आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या काळातील साहित्यिक कदाचित पडद्याआड जातीलही, पण अण्णा भाऊंच्या साहित्याचे तसे होणे नाही. कारण, त्यांचे अनुयायी, अभ्यासक, विचारवंत आणि शासन हे खंबीरपणे त्यांच्या साहित्याचे पुरस्कर्ते आहेत.
हे वर्ष अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. सर्वच स्तरांवर (सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक-राजकीय) अण्णा भाऊंची जन्मशताब्दी साजरी करून त्यांना सलामी देण्याचा प्रयत्न होत आहे. आमचेही अभिवादन!मराठी साहित्य एक समृद्ध साहित्य आहे. या मराठी साहित्याच्या दालनात अण्णा भाऊंचे साहित्य कोंदणातील हिर्याप्रमाणे शोभून दिसते, असे आपण म्हटले तर त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये अभ्यासणे महत्त्वाचे आहे.अण्णा भाऊ लौकिक अर्थाने दीड दिवसांची शाळा शिकून माणसं वाचायला शिकले. ‘अनुभूती आणि संवेदना’ यातून निर्माण झालेले साहित्य खर्या अर्थाने माणसाच्या वेदनेचे गीत ठरले. सामाजिक बांधिलकी स्वीकारल्यामुळे माणुसकी तुडवणार्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी साहित्यातून एल्गार पुकारला, म्हणूनच कलावंताच्या भूमिकेतून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. भल्याभल्यांना जे साध्य होत नाही ते अण्णा भाऊंच्या साहित्याने, त्यांच्यातील कलावंताने एकाच वेळी जनप्रबोधनाचे कार्य केले. म्हणूनच कथा, कविता, कादंबरी, नाटक, वगनाट्य, कार्यकर्ता, कलावंत, सामाजिक व सांस्कृतिक कार्य त्यांनी केले. पांढरपेशांप्रमाणे अंबारीत बसून केवळ मनोरंजन किंवा कल्पनेचे मनोरे त्यांनी साहित्याच्या माध्यमातून रंगवले नाही, तर इथल्या मातीशी नाळ बांधून त्यांनी एक वैचारिक भूमिका आपल्या साहित्यातून मांडली जे अन्य कथाकार, कादंबरीकार यांंना जमले नाही. त्यांच्या काळात जे कुणी प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान होते, त्या सर्वांपेक्षा अण्णा भाऊंचे निराळेपण डोळ्यांत भरते, हे त्यांचे वैशिष्ट्य.
त्यांच्या साहित्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या सामाजिक परिवेशात त्यांचा जन्म झाला, त्या गावाकुसाबाहेरचा माणूस त्यांच्या साहित्याचा नायक बनला. डॉ. रामचंद्र काळुंखे आपल्या ‘ग्रामीण कादंबरी (आकलन आणि विश्लेषण)’ या ग्रंथात लिहितात - “अण्णा भाऊ साठे यांनी अलक्षित अशा समाजघटकांचे दर्शन आपल्या अनेक कादंबर्यांतून घडविले. रूढ अशा लौकिक जीवनात नाकारलेली, अव्हेरलेली, गुन्हेगार ठरवलेली माणसे त्यांच्या दारिद्य्र आणि पराक्रमासहित कादंबरीत आणून अण्णा भाऊंनी क्रांतिकारी स्वरूपाचे लेखन केले. ‘फकिरा’ (१९५९) ही कादंबरी तर अतिशय लोकप्रिय झाली. दारिद्य्रात असूनही शूरवीर, पराक्रमी आणि हृदयात माणुसकीचा पाझर असणार्या या व्यक्तिरेखा सामान्यातून निर्माण झालेल्या असल्या तरी लक्षणीय ठरल्या.” हे विधान लक्षात घेतले, तर तत्कालीन कादंबरीकारांच्या तुलनेत नजरेत भरणारे अण्णा भाऊंचे साहित्य आहे. कादंबरी संदर्भात ‘फकिरा’ (१९५९), ‘वारणेच्या खोर्यात’ (१९५१), ‘वैजयंता’ (१९५९), ‘चंदन’ (१९६२), ‘वारणेचा वाघ’ अशी त्यांच्या कादंबर्यांची मालिकाच तयार होते. १९५१ ते १९६९ हा त्यांचा कादंबरीनिर्मितीचा काळ. एकूण ३२ कादंबर्या त्यांनी लिहिल्या आणि ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’कडून त्या क्रमश: पुनश्च प्रकाशित होत आहेत, हे दुसरे वैशिष्ट्य!
अण्णा भाऊंचे वैशिष्ट्य आणखी हे की, ते समाजापुढे क्रांतिकारी समाजनायक उभा करून संघर्षाची दिशा आपल्या समाजाला देतात. त्यांच्या साहित्यातून संघर्षतत्त्वे सहज शोधता येतात. ‘फकिरा’सारखी कादंबरी याचे उत्तम उदाहरण आहे. या कादंबरीला मराठी साहित्यात ‘मानाचे पान’ लाभले आहे. मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अण्णा भाऊंची ‘फकिरा’ ही कादंबरी! या संदर्भात समीक्षक डॉ. भालचंद्र फडके मत नोंदवताना लिहितात, “अण्णा भाऊ जे लिहितात ते त्यांनी भोगलेले असते. ज्यांच्याविषयी ते लिहितात ती सारी त्यांची माणसे असतात.” म्हणूनच तथाकथित तत्कालीन श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यकृतीत असणारा सत्याचा फोलपणा अण्णाभाऊंच्या साहित्यात आढळत नाही. म्हणून मनोरंजन कमी, प्रबोधन अधिक अशी त्यांच्या लेखणीची किमया आहे.
अण्णा भाऊंच्या कथा, कादंबरीतील कथानायिका यासुद्धा लक्षणीय आहेत. त्यांच्या स्त्रीप्रधान वा पुरुषप्रधान कथानकातील नायिका ही गरिबीशी एक वेळ तडजोड करील. परंतु, आपल्या अब्रूसाठी ती तडजोड करत नाही. शील तिचं सर्वस्व असतं. शीलरक्षणासाठी ‘मरायला प्रसंगी मारायला’ ती तयार असते. त्या वीरांगना आहेत, काटक आणि कष्टाळू आहेत. त्यांच्या जगण्याचं स्वतंत्र एक तत्त्वज्ञान आहे. त्या आपल्या संसारासाठी, आपल्या माणसासाठी त्याग करायला तयार आहेत. त्या प्रेम करतात. परंतु, त्यात त्या वाहवत जात नाहीत. त्यांना जबाबदारीची जाणीव आहे. म्हणून त्या बेजबाबदार नाहीत. पांढरपेशांच्या साहित्यातील लेचीपेची, प्रेमवेडी वा पुरुषांना हार जाणार्या नाहीत, तर मनगटाच्या जोरावर आपले इप्सित साध्य करणार्या नायिका आहेत आणि या सर्व नायिका अठरापगड जातींतल्या, डोंगरदर्यांतल्या, गरिबी पाचवीला पुजलेल्या आहेत, हे अण्णा भाऊंचे निराळेपण!
अण्णा भाऊंना एक दृष्टी होती. त्यांच्या विचारांत सूत्रबद्धता होती. त्यांची स्पष्ट भूमिका होती की, ‘दलित, शोषित, पीडित समूहाचे जीवनबिंब आजच्या प्रस्थापितांच्या मराठी साहित्यात स्पष्ट दिसत नाही.’ म्हणून या शोषितांचे स्पष्ट चित्रण त्यांनी आपल्या कथा-कादंबर्यांतून केले. ‘दलितांचे जीवन दूर उभे राहून समजून घेता येणार नाही. कारण, त्यांचे जीवन हे खडकातून झिरपणार्या झर्याप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा.’ परंतु, हे प्रस्थापित मराठी लेखकांना जमलं नाही. म्हणून अण्णा भाऊंच्या लेखणीचे प्रयोजन! ते स्पष्टच म्हणतात, “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर ती दलितांच्या, कष्टकर्यांच्या तळहातावर तरलेली आहे” आणि हे वास्तव आहे. आज जो काही विकास आहे, जे काही मनुष्यनिर्मित सौंदर्य दिसते आहे, ही सारी कष्टकर्यांच्या हाताची किमया. म्हणून कष्टकर्यांना न्याय मिळावा, त्यांचे शोषण थांबवावे म्हणून कष्टकर्यांचा नायक न्यायासाठी महानायक बनतो. हे प्रस्थापितांच्या मराठी साहित्यात कुठे दिसते? हेच आणखी अण्णा भाऊंच्या साहित्याचे निराळेपण नाही का?
देशासाठी लढणारी माणसं, उदात्त भावना आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून जगणारी माणसं अण्णा भाऊंच्या साहित्यात दिसतात. इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड करणारा, भांडवलदारांच्या विरोधात लढणारा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवतेसाठी झगडणारा नायक अण्णा भाऊंनी उभा केला आहे. त्यामुळे सामाजिक समरसतेचे सूतोवाच अण्णा भाऊंच्या कथा-कादंबर्यांतून होते. म्हणूनच रवींद्र गोळे म्हणतात, “अण्णा भाऊंनी आयुष्यभर आपदांचाच सामना केला, उपेक्षा सहन केली. मात्र, त्याविषयी खेद किंवा नाराजी व्यक्त करणारे एक वाक्यही मिळत नाही. उलट आपदा, उपेक्षा यांचा सकारात्मकपणे सामना करत स्वत:चे जीवन सुखी, समाधानी कसे बनवता येते, अशा प्रेरणा जागवणारे विपुल साहित्य अण्णाभाऊ साठेंनी प्रसवले. जगण्याचे बळ आणि भविष्याचा वेध घेणारे साहित्य निर्माण करताना अण्णा भाऊंनी समन्वयाचे सूर छेडले.” एक समरस समाज कसा तयार होईल, याचा विचार अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून मांडला, हे एक त्यांचे तत्कालीन साहित्यकारांपेक्षा निराळेपण!
‘परस्परातील प्रेम, हेवेदावे, दुष्टावे लयाला जावोत, ही जनता सुखी, समाधानी व्हावी, जुन्या पण चांगल्या प्रथा पुन्हा सुरू व्हाव्यात, या महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे, असे स्वप्न पाहत मी लिहितो. कारण, माझ्या आयुष्यात ही माणसं मला कधी ना कधी भेटली आहेत. ही माणसं माझ्या वास्तवातील आहेत,” असे अण्णा भाऊ एका कादंबरीच्या अढळ साहित्याचा निर्माता मनोगतात म्हणतात. असा जीवनानुभव मांडणारा साहित्यिक तत्कालीन साहित्यकारांपेक्षा निश्चितच मोठा आहे, आगळा आणि वेगळा आहे. या संदर्भात रवींद्र गोळे यांचे विधान पुन्हा उद्धृत करणे भाग आहे. “अण्णा भाऊ साठेंची लिखाणामागची प्रेरणा उदात्त आहे. परिस्थितीशी दोन हात करताना, आपदांशी झगडा करताना अण्णा भाऊ साठेंनी साकारलेल्या व्यक्तिरेखा विद्रोहापेक्षा विवेक आणि समन्वयाची कास धरताना दिसतात. विखार आणि विद्वेषाला बाजूला सारत समता आणि बंधुतेचा मार्ग चालतात” आणि इथेच समतेच्या मार्गाचा अवलंब करून समाज जोडण्याचे काम अण्णा भाऊ साहित्यातून करताना दिसतात. कारण, आपण माणूस आहोत, त्यामुळे माणसाला माणूस म्हणून आवश्यक असणारी प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम अण्णा भाऊ साहित्याद्वारे करतात. करुणा, शील, स्वातंत्र्य, समता, समरसता अशा चिरंतन मूल्यांना ते आपल्या साहित्यात मानाचे पान देताना दिसतात. त्यांच्या पात्रांचा संघर्ष, झगडा हा माणूसपणासाठी असतो. ती पात्रे माणुसकीच्या प्रतिष्ठापनेसाठी झगडताना दिसतात. त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी ‘माणूस’ आणि त्याची ‘माणुसकी’ हाच आहे. मला वाटतं, हे तत्कालीन लेखकांपेक्षा अण्णा भाऊंचा विचार श्रेष्ठत्वाकडे घेऊन जाणारा आहे. हे त्यांच्या कथा-कादंबर्यांचे अध्ययन करताना दिसून येते. हेच त्यांचे निराळेपण नाही का?
अण्णा भाऊंचे साहित्य एककल्ली कधीच नव्हते. ते बहुआयामांना स्पर्श करणारे होते. म्हणून ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते की, आंबेडकरवादी विचारसरणीचे होते, या वादात बुद्धी खर्ची करण्यापेक्षा ते ‘मानवतावादी’ होते, हे एकदा मान्य केले की, त्यांच्यातील वैचारिक मोठेपणा दिसून येतो. जे जे चांगले आहे ते ते मानवी कल्याणासाठी पोषक आहे. त्यांचाच विचार अण्णा भाऊ करतात. अण्णा भाऊंच्या भाषणातून जसा साम्यवादाचा पुरस्कार दिसतो, तसाच संत ज्ञानेश्वर, चक्रधर, तुकाराम या संतमतांशी त्यांचा विचार जुळतो. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संवैधानिक विचारांचा प्रभाव त्यांच्या विचारात दिसतो. त्यांच्या साहित्यात पुरुषाचा स्वाभिमान, स्त्रीचे शील आणि देशाचे स्वातंत्र्य यांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. एक समतायुक्त, शोषणमुक्त, एकात्म समाज-निर्माण ज्यांना करावयाचा आहे, त्या सर्वांनी एकदा तरी अण्णा भाऊंच्या साहित्यातील वैचारिक ठेवा जाणीवपूर्वक वाचलाच पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. असा आग्रह त्यांच्या काळातील तथाकथित श्रेष्ठ साहित्यकारांच्या संदर्भात आम्ही करू शकत नाही. हे अण्णा भाऊंच्या साहित्याचे वेगळेपण आहे, असे आम्हास वाटते.
अण्णा भाऊंच्या विचारात प्रांजळपणा आहे. तसा प्रांजळपणा तत्कालीन तथाकथित श्रेष्ठ समजणार्या पांढरपेशांच्या साहित्यात तो दिसत नाही. व्यवहारात वा प्रत्यक्षात अण्णा भाऊंइतकी उंची या साहित्यकारांना गाठता आली नाही. समाजप्रबोधनार्थ त्यांच्या कथा, कादंबर्यांवर अनेक चित्रपट निघाले. रशियन पुरस्कार मिळाला. परदेशवारी झाली. परंतु, अण्णा भाऊ मातले नाहीत. विनम्रता त्यांच्या विचारात होती म्हणून ती त्यांच्या साहित्यात उतरली. ते म्हणतात, “मी माझी मराठी शिकलो नि मग लिहू लागलो. म्हणून मला आश्चर्य वाटतं... जे जीवन जगलो, जे जीवन अनुभवलं व जे जीवन पाहिलं तेच मी आता लिहीत आहे. त्यात दोष आहेत, पण माझा मंगल महाराष्ट्र हा कसदार आहे. माझ्या उणिवा पोटात घेऊन तो आजपर्यंत माझ्या साहित्याचं कौतुक करीत आला आहे. म्हणूनच मी लिहीत आहे... जे चांगलं असेल ते या महाराष्ट्राचं नि जे वाईट असेल ते माझ्या पदरात घालावं. माझा पदर सदैव पसरलेला आहे. एवढंच...” इतकी विनम्रता असणारा साहित्यिक त्या काळात आणि आजही कुणी अनुभवला का? अहो, आकाशात उडून रशियाचा प्रवास करणारा हा साहित्यिक, पण अखेर त्याचे पाय मातीवरच होते, ही जाण आपण स्वीकारली पाहिजे. ‘विद्या विनयेन शोभते’ हे वचन अण्णाभाऊंच्या संदर्भात शोभून दिसते. तत्कालीन ताठर मानेच्या साहित्यकारांपेक्षा अण्णा भाऊंची विनम्रता नजरेत भरते. सर्व लेखक, कवींना अनुकरणीय वाटते. प्रसिद्धीपराङ्मुखतेला जवळ करणारा हा साहित्यिक निराळाच होता तरीही तो श्रेष्ठत्तम ठरला.
अण्णा भाऊंच्या साहित्याचा विचार करताना प्रस्थापितांच्या साहित्यापेक्षा अण्णा भाऊंचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. कारण, साहित्यमूल्यांच्या संदर्भात प्रस्थापितांनी एक चौकट आखून दिलेली होती. ती चौकट अण्णा भाऊंनी तोडली. दलित साहित्याची नव्या मूल्यधारणेतून साहित्यनिर्मिती व्हावी, असा आग्रह अण्णा भाऊ आणि दलित साहित्य यांनी धरल्यामुळे मराठी भाषेला नवे साहित्यमूल्य आणि सौंदर्यमूल्ये याचा नव्या संदर्भात कालानुरूप विचार करणे अगत्याचे होते. साचलेल्या डबक्याचे रूपांतर वाहत्या प्रवाहात करणे अगत्याचे होते. डॉ. स. हा. कर्हाडेंच्या शब्दांतच सांगायचे झाल्यास, “काळानुरूप कलामूल्ये बदलली तरीही वाङ्मयाचे म्हणून एक शाश्वत मूल्य असते ते अमान्य करता येणार नाही. प्रगत साहित्य सभेने साहित्याविषयी व्यापक भूमिका स्वीकारली आहे. जीवनमूल्ये आणि कलामूल्ये यांचा समन्वय वाङ्मयीन कलाकृतीत असावा म्हणून नव्या कलामूल्यांइतकीच शाश्वत मूल्यांवरही प्रगत साहित्यसभेची निष्ठा आहे आणि या निष्ठेतूनच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा विचार व्हावा असे वाटते.” या विधानांचा विचार करताना अण्णा भाऊंच्या साहित्याची तत्कालीन तथाकथित समीक्षकांनी दखल घेतली नाही. थोर समीक्षक कुसुमावती देशपांडे यांनी मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिताना अण्णाभाऊंच्या कथा, कादंबर्यांचा विचारच केला नाही. याउलट दलित साहित्याचा समग्र इतिहास मांडताना डॉ. योगेंद्र मेश्राम यांनी मात्र ‘दलित साहित्य-उद्गम आणि विकास’ या ग्रंथात जाणीवपूर्वक नोंद घेतली. यावरून हेच स्पष्ट होते की, अण्णा भाऊंचे साहित्य जीवनमूल्य आणि कलामूल्य यांचा समन्वय साधून निर्माण झाले आहे. म्हणून अण्णा भाऊंच्या साहित्याचे वेगळे स्थान आहे.
अण्णा भाऊंच्या साहित्याला नैतिकतेचे अधिष्ठान आहे, हे विसरता येत नाही. डॉ. स. दा. कर्हा(र्हा)गडे एका पुस्तकात लिहितात, “मानवी मनातील मूलभूत प्रवृत्तींना आव्हान करण्याचे सामर्थ्य साहित्यात असते, श्रेष्ठ साहित्यात असते. हे सामर्थ्य अण्णा भाऊंनी ओळखले होते. त्यांच्या कथा-कादंबर्यांत हे सामर्थ्य आहे. अण्णा भाऊंच्या कथा-कादंबर्यांतील अनेक व्यक्तींना असे नैतिक मूल्यांचे पाठबळ आहे. याचा अर्थच असा की, प्रथम या कलावंताने नैतिक मूल्याचे सामर्थ्य जाणले होते आणि सुखसमृद्धी, सभ्यता याची मंगल स्वप्ने साकार व्हावयाची असतील, तर नैतिक मूल्यांची जोपासना व्हायला हवी, अशी अण्णाभाऊंची श्रद्धा होती. या श्रद्धेचे अधिष्ठान त्यांच्या वाङ्मयाला आहे.” यावरून एक स्पष्ट होते की, अण्णा भाऊंच्या काळात आणि आताही नैतिक मूल्यांचे अध:पतन मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. अशा वेळी भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मूल्यांवर आधारित आहे आणि या पायाला अनैतिकतेचे खिंडार पडू नये म्हणून अण्णा भाऊंच्या साहित्याची संस्कारशीलता आजही अभ्यासनीय आहे. कारण, हे संस्कारक्षम साहित्य आहे. हे अण्णा भाऊंच्या साहित्याचे मोठेपण आहे.
अण्णा भाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, ते एक कलावंत आणि शाहीरही होते. त्यांच्या काळातील तथाकथित श्रेष्ठ लेखकांमध्ये हा गुण होता काय? तर नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी अण्णाभाऊ होते. त्यांच्यात वैचारिक आणि कलात्मक तसेच जन्मजात परंपरेची शाहिरी व जन्मजात तीव्र जीवनभोगाचे अनुभव यांची मौलिक पुंजी होती. गरजणारा आणि गाजणारा शाहीर या मराठी मायभूमीचा अस्सल भूमिपुत्र होता. म्हणूनच व्यंकटेश स्तोत्रासोबत मुक्तेश्वर संत साहित्य यांचे दर्शन घडवत मराठी मातीचा रंगगंध त्यांच्या शाहिरी-साहित्यिक अभिव्यक्तीत अगदी सहजगत्या उमटत होता. ‘सह्याद्रीचे भव्य शिल्प, वारणा-कृष्णाचे जीवनदायी वाहते बिलवर, मराठी वृक्षवेलींच्या अंगीखांदी बागडणारी मराठी पशुपक्ष्यांची घराणी’ यांचे अपूर्व दर्शन या कलावंताने आपल्या निर्मितीतून अमर केले.’ आपल्या कलेची अवघी रंगत मराठी बाण्याची, मराठी वाणीची, मराठी सौंदर्याची करण्यात अण्णाभाऊंनी यश प्राप्त केले. या मराठी मातीची कलाभिरुची, रसिकता अण्णाभाऊंच्या प्रतिभेचे एक समर्थ वैशिष्ट्य होते. “विषमतेच्या सामाजिक जगात जगत असताना त्यांनी रसिकतेचा हा बंद सतत जतन केला. या जातिवंत कलावंताच्या मनोवृत्तीला जे जीवप्रेमी वळण लागते ते त्यांच्यातील असलेल्या विचारधारेमुळे. त्यामुळे त्यांच्या पुढे असलेल्या प्रश्नांना, समस्यांना, शोषणाला या जन्मजात कलावंताने त्याच्या जिण्याचे आणि कलेचे एक प्रयोजन दिले. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचा ध्यास घेणारा हा मनस्वी कलावंत श्रमजीवनाचा एक सुंदर, समृद्ध युटोपिया उभा होता,” असे मत प्र. श्री. नेरुरकर नोंदवतात, ते समर्थनीय आहे.
अण्णाभाऊंच्या काळात नवकथा-नवसाहित्य यांचा बोलबाला असल्यामुळे मराठी साहित्यात लघुकथेच्या तंत्र-मंत्रावर उच्चभ्रू विद्यापीठाधिष्ठित व अन्य मातब्बर समीक्षकांकडून जी लेखी-तोंडी चर्चा होत होती, त्या चर्चेची झळ अण्णा भाऊंना पोहोचली नाही. इंग्रजी किंवा पाश्चात्त्य वाङ्मयातील ढीगभर कथा वाचून त्यांची कथा त्यांना स्फुरली नाही, तर तत्कालीन मराठी साहित्यातील प्रचलित कथा वाचून, श्रवण करून त्या आधारे कथेचे तंत्र-मंत्र अवगत केले. म्हणूनच प्र. श्री. नेरुरकर परखडपणे लिहितात, “भलतेच शैलीचे आविष्कार साधण्यासाठी आणि कथेच्या आकाराचे व प्रकाराचे पारंपरिक दंडक व पठडी तोडून मोडून आकाराचे नवे तांत्रिक व कलात्मक प्रयोग करण्यासाठी त्यांनी आपली कथा लिहिली नाही. त्यांचे कथालेखन हे त्यांच्या जीवनानुभूतींच्या अपरिहार्यतेतून ते नि:संकोचपणे, परंतु स्वाभाविकत: लिहिले गेले.” केवळ नवे प्रयोग करायचे म्हणून त्यांची कथा जन्माला आली नाही, तर त्यांनी जे जग पाहिले व अनुभवले, जी माणसे पाहिली, ज्यांच्या सुखदु:खाशी समरस झाले, ज्या सामाजिक विषमतेने, भांडवलशाहीच्या शोषण व्यवस्थेने तळागाळातल्या माणसांना दारिद्य्राच्या चिखलात गाडले, त्याला हीन-दीन केले, त्यांना शोषणमुक्त करण्यासाठी, त्यांच्या उत्थानासाठी यशापयशाचा विचार न करता, त्यांनी समाजाला जागे करण्यासाठी हातात लेखणी घेतली आणि अण्णा भाऊंची कथा जन्माला आली. केवळ प्रसिद्धी, नावलौकिक, साहित्य अकादमी अशा पुरस्कारांसाठी त्यांची कथा जन्मली नाही. अण्णा भाऊंनी पांढरपेशा लेखकांप्रमाणे सभोवार पुस्तकांची दुकाने मांडून आपल्या सुरक्षित निवासाच्या हस्तिदंती हवेेलीत राहून आपली कथा लिहिली नाही, तर अण्णा भाऊंनी ‘डफ’ आणि ‘लेखणी’ हातात घेऊन ‘शाहिरी आणि साहित्य’ लोकजागरणासाठी लिहिले. हेच त्यांचे मोठेपण आहे. म्हणून त्यांच्या कथेत शोषित समाज, गुन्हेगारी समाज, मांग, गारुडी, बेरड आणि अशा किती तरी अस्पृश्य जाती, गरीब कामगार, शेतमजूर यांना तथाकथित सरकार, सुसंस्कृत समाज यांच्या शोषणी वाटा बंद करण्यासाठी त्यांची कथा जन्माला आली. म्हणूनच पांढरपेशांच्या कथांचे मूल्यमापनाचे मापदंड अण्णाभाऊंच्या कथेसाठी तोकडे पडतात. यासाठी अण्णाभाऊंच्या जगण्याच्या वाटचालीचा आणि त्यांच्या सामाजिक भानाचा विचार करावा लागेल, हे एक निराळेपण!
नवकथेच्या कालखंडात अण्णा भाऊंची कथा बहरत होती. “ही मराठी नवकथा मध्यमवर्गीय पांढरपेशा सुखवस्तू समाजातील स्त्री-पुरुष पात्रांच्या अंतर्यामातील विकृत वास्तवाला जाऊन भिडत होती व त्याचे मनोविश्लेषण व शवविच्छेदन करीत होती. ती अमूर्ततेला रूप देऊ पाहत होती आणि प्रतिमा, प्रतीके व अलंकरणातून शैलीदार व चिवट अशा कलात्मक आकृतिबंधातून प्रकट होत होती. परंतु, अण्णा भाऊंच्या कथेतील पात्रांच्या जीवनात मुळी अंतर्बाह्य व अंतर्गत वास्तवाचे द्वैत व द्वंद्व पांढरपेशा पात्रांच्या अंत:कलहातील उंचीला व खोलीला नेता येईल, असे अस्तित्वात आलेले नसते. ही दगडधोंडे, माती, वने आणि जलस्थाने यांच्या पार्थिव रसायनातून निर्माण झालेली माणसे, मानवाच्या आदिम अवस्थेतून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या अजून मुक्त झालेली नसतात. बहिर्मुखतेला पारखी होऊन अंतर्मुखतेच्या भोवर्यात व जाळ्यात अडकलेली व आदळआपट झालेली नसतात. पारंपरिक धर्म व रूढींची अफू त्यांना ‘एक घाव दोन तुकडे’ या मानसिकतेतून बांधून ठेवायला पुरेशी असते.’ या विधानाची सत्यता पडताळून पाहिली तर अण्णा भाऊ साठे यांचे स्थान त्या काळातील साहित्यकारांत उच्च दर्जाचेच होते. कारण, त्यांच्या साहित्याची नाळ वेदनेशी जोडलेली होती. वेदनेचे महाकाव्य करण्याची क्षमता अण्णा भाऊंच्या साहित्यात होती. म्हणूनच मॅक्झिम गॉर्की हा रशियन लेखक तसेच अमेरिकन लेखक जॅक लंडन यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
एकंदरीत अण्णा भाऊंचे साहित्य तत्कालीन साहित्यकारांपेक्षा उच्च दर्जाचे होते. कारण, ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ या न्यायाने अण्णा भाऊंनी साहित्य निर्माण केले होते; नव्हे ते झाले, असेच म्हणावे लागेल. अजूनही बर्याच गोष्टी सांगता येतील. त्यांची भाषा, त्या भाषेचा रांगडेपणा, दगडधोंड्यांशी नातं सांगणारी पहाडासारखी माणसं, प्रादेशिकता अशा मुद्द्यांचा विचार करता, अंबारीत बसून लेखणी करणार्या व कल्पनेच्या पोकळ भरार्या घेणार्या साहित्यकारांत अण्णा भाऊ उठून दिसतात. कारण, वेदना ही सत्य असते. सत्य हे शिव असते आणि शिव असते म्हणूनच ते सुंदरही असते.
संदर्भ-
१. अण्णा भाऊ साठे - व्यक्ती आणि वाङ्मय : प्रा. डॉ. अंबादास सगट
२. फुले-आंबेडकर दलित साहित्य - प्र. श्री. नेरुरकर
३. ग्रामीण कादंबरी (आकलन आणि विश्लेषण) - डॉ. रामचंद्र काळुंखे
४. अण्णा भाऊ साठे - ‘जीवन आणि कार्य’ - रवींद्र गोळे.
५. अण्णा भाऊ साठे (निवडक वाङ्मय) - खंड :१, खंड : २; म. रा. साहित्य संस्कृती मंडळ
६. अण्णा भाऊंच्या आठवणी - दिनकर सहदेव साठे
७. फकिरा - डॉ. भालचंद्र फडके
- डॉ. ईश्वर नंदपुरे