गृहिणी नव्हे, पाककलेची ‘रोहिणी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2021   
Total Views |

MANSA


 
स्वयंपाकासारख्या अंगभूत कलेद्वारे देश-परदेशात रेसिपीची ‘रोहिणी’ बनलेल्या रोहिणी जगताप-गाडे या सुगरणीची वाटचाल गृहिणींसाठी प्रेरणादायी ठरेल!

 
 
मुंबईत जन्मलेल्या ‘रोहिणी’ यांचं माहेरचं आडनाव जगताप. घरात भावंडांमध्ये ज्येष्ठ असल्याने आपसुकच कौटुंबिक जबाबदारीही मोठी होती. वडील व भाऊ पोलीस खात्यात नोकरीला असल्याने घरात कडक शिस्तीचे वातावरण होते. जेमतेम दहावीचे शिक्षण सुरु असतानाच योगायोगाने त्यांना पोलीस खात्यातील ’स्थळ’ चालून आले आणि लग्नानंतर त्या ‘रोहिणी मधुकर गाडे’ बनून ठाण्याच्या रहिवाशी बनल्या. पती, एक मुलगा,एक मुलगी असं त्यांचं चौकोनी सुखवस्तू कुटुंब. रोहिणी यांना माहेरपासूनच स्वयंपाकात फार रूची होती, तसेच घरबसल्या काही ना काही धडपड करीत राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे घरातच त्यांनी हॉबी क्लासेस, ब्युटी पार्लरच्या व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली.



पण, पुढे मुलांच्या संगोपनात कुटुंबासाठी वेळ अपुरा पडु लागल्याने त्यांच्या या धडपडीला खिळ बसली. जशी मुले मोठी झाली, तसा घरात भरपूर फावला वेळ मिळू लागला. ही संधी सत्कारणी लावण्यासाठी त्यांनी पाककलेत रस घेऊन विविध रेसिपींचे प्रयोग सुरु केले. यामुळे एकदिवस त्यांनी थेट एका खासगी दुरचित्रवाणीवरील ’आम्ही सारे खवय्ये’ मध्ये धडक मारली. अन एक साधी गृहिणी, रेसिपिची ’रोहिणी’ बनली. सध्या त्या वेगवेगळ्या प्रकारचे केक्स बनवण्याचे शिकवणी घेतात. ‘रोहिणी केक प्रिमिक्स’या नावाने त्यांचा व्यवसाय देश-परदेशात पोहोचला असून त्यांचे स्वतःचे रेसिपीचे ‘युट्युब चॅनेल’ही लोकप्रिय असल्याचे त्या सांगतात.



आपल्या यशस्वी भरारीविषयी बोलताना रोहिणी सांगतात, “माझ्या दोन्ही मुलांनीच माझ्यातील कलेची जाणीव करून देत प्रोत्साहन दिले. मग रेसिपींचा श्रीगणेशा करून नव्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड पूर्वीपासूनच असल्याने याच क्षेत्रात काही तरी भव्यदिव्य करायचे, असा निर्धार केला. ’आम्ही सारे खवय्ये’मुळे अनेकजण ओळखू लागल्याने रेसिपिंचेही कौतुक होऊन एकप्रकारे हुरूप वाढला.”



आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास दुणावला. ‘युट्युब’वर इतरांच्या रेसिपींचे व्हिडिओ पाहून त्यांनाही वाटायचं की, आपल्या रेसिपींदेखील अशाच दिसाव्यात.तेव्हा, त्यांच्या मुलाने ‘युट्युब चॅनेल’उघडण्याची कल्पना सुचवली. मग याच निश्चयाने ‘युट्युब चॅनेल’ सुरू करण्याचा विचार केला. पण, त्यातलं काहीच कळत नव्हतं! चॅनेल कसं सुरू करायचं, काय करायचं? मग याबाबतचे व्हिडिओ पाहून २०१८ साली स्वतःच ‘रोहिणीज रेसिपी मराठी’ या नावाने ‘युट्युब चॅनेल’ सुरू केलं. पहिली मोदकाची रेसिपी त्यांनी अपलोड केली. तेव्हा त्यांची मुलगी मोबाईलने शूट (चित्रण) करायची. पण, ते व्हिडिओ ‘एडिट’ कसे करायचे हे ‘युट्युब’वर बघून शिकले आणि तेही जमू लागलं.



पण, नंतर मुलीला दरवेळी शूट करणं जमायचं नाही मग त्यावरही उपाय शोधला. सेल्फी स्टॅण्ड लावून शूट करून व्हिडिओदेखील अपलोड करू लागले. या उपक्रमाला दर्शकांचा, खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागल्याने, ‘सबस्क्राईबर’ वाढले. ‘युट्युब’च्या संदर्भात व्हिडिओ पाहायचे. तेव्हा कळलं की, चॅनेल ‘मॉनिटाईज’ करायचं असतं, तरच, त्यातून पैसे पण मिळतात. मग हे ही त्या ‘युट्युब’वरच बघून शिकल्या अन् ‘युट्युब’कडून पहिली आमदनी झाली तेव्हा त्यांना आणखी हुरुप चढला.



सुगरणीचा असा प्रवास सुरू असताना त्यांनी केक बनवण्याचे तंत्र आत्मसात करून प्रमाणपत्र मिळवलं आणि केकच्या ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली. तब्बल १४ फ्लेवरचे केक प्रेमिक्स तयार केले आणि हा प्रयत्न यशस्वी ठरल्याने ‘रोहिणी केक प्रिमिक्स’ असा ब्रॅण्ड तयार करून त्याचे रजिस्ट्रेशन केले. आज हा ब्रॅण्ड सोशल मीडियाद्वारे चांगलाच लोकप्रिय होत असल्याचा दावा करणार्‍या रोहिणी यांनी गरजू महिलांनाही या ब्रॅण्डच्या विक्री व्यवसायासाठी जोडून घेतले आहे. इतकेच नव्हे, तर केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-परदेशातही या प्रिमिक्सला मागणी असल्याने व्यवसायाची उलाढाल वाढत असल्याचे त्या सांगतात.



कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मध्ये केक मेकिंगचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन क्लासेस घेऊन सकळजणींनास त्यांनी ’सुगरण’ बनवले. तसेच अनेक महिलांना रोजगार देण्यास हातभार लावला. व्यवसायासोबतच शिकवणीचा हा शिरस्ता अव्याहत सुरु आहे. उद्योजिका बनलेल्या रोहिणी यांना पाककलेचे मोठे पुरस्कार मिळाले नसले तरी सहभाग घेतलेल्या सर्वच स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिक पटकावल्याचे त्या सांगतात. भविष्यात हा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असून एखादे ‘क्लाऊड किचन’ सुरू करून नवनवीन खाद्यपदार्थाना ‘ई-कॉमर्स’द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस त्या व्यक्त करतात.



कुठलंही ध्येय गाठण्यासाठी संयम बाळगून मेहनत करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, घरात आई-वडिलांकडे एखादी कला असेल, तर त्यांना ती जोपासण्यासाठी मदत करा.एकजुटीने काम केल्यास यश नक्की मिळेल. असा संदेशही त्या गृहिणी व युवतींना देतात. अशा या हरहुन्नरी पाककलेतील रोहिणीलापुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@