नवी दिल्ली : २००८मध्ये मालेगावमध्ये झालेल्या ब्लास्टप्रकरणी आपल्याला आणि काही हिंदू नेत्यांना अडकवण्याचा कट रचणाऱ्या कॉंग्रेसने देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
विशेष न्यायालयासमोर एका साक्षीदाराने, 'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह रा. स्व. संघाच्या चार नेत्यांची नावे घेण्यासाठी आपल्याला राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धमकावले,' अशी साक्ष देताच कॉंग्रेसचा खोटेपणा उघड झाला असून आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
"दहशतवाद्यांना प्रवृत्त करणारी आणि पोसणारी काँग्रेस देशाशी कसा खेळ करते आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही.' असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. "यापूर्वी काँग्रेस सत्तेत असताना दहशतवाद्यांना प्रेरित आणि पोसत होती आणि हिंदू संघटनांवर खोटे गुन्हे दाखल करत होती.
आज सत्तेबाहेर असताना विकास आणि जनहिताच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करते," असा गंभीर आरोप त्यांनी केला. "तुम्ही जर महाराष्ट्र एटीएसचा जबाब पाहिला असेल, तर त्यावेळी भाजप आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांना आणि इतर हिंदू नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये कशा प्रकारे अडकवण्याचे काम करण्यात आले होते? हे आता समोर आले आहे," असे मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.