अत्तराचा फाया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2021   
Total Views |

sp perfume_1
 
 
इथे चिरीमिरी १०० कोटींच्या प्रकरणात आमचे महाविकास आघाडीचे सोबतचे मंत्री अडकले. त्या तिकडे पाहा, काय तो अत्तराचा थाट!!! कार्यकर्त्यांच्या घरात इतके अत्तर, तर त्यांच्या साहेबांच्या घरात किती अत्तर असेल? विचार करुन करुन पार डोक्याचे अत्तर झालं आणि उत्तर मिळत नाही. आधी जर माहिती असते की, त्या परप्रातांत समाजवादी पक्षाचे अत्तर इतके भारी आहे, तर तिथे आम्ही त्यांच्यासोबतच निवडणुका लढवल्या असत्या ना!!
 
 
इथे ते फक्त त्यांच्या ‘सायकली’चे बॅनर दिसतात. महाराष्ट्रात असे अत्तर असते, तर मजा होती. आज आम्ही सोबत असतो. काय करणार? ‘नशीबच गां* तर काय करेल पांडू’ असे थोरमोठे सांगून गेलेत. त्यामुळे इथे नुसत्या ‘पंजा’ आणि ‘घड्याळ्या’च्या गर्दीत जीव कोंडवावा लागला.
 
 
जाऊ दे, आम्ही जसे प. बंगालमध्ये ममतादीदींना आंदण दिला तसा उत्तर प्रदेश आम्ही प्रियांका मॅडम आणि राहुल सरांना आंदण देणार आहोत. आता उशीर झाला. त्यातच मोदी अत्तराच्या राजकारणाबद्दल बोलले म्हणजे संपलेच समजा!! आता दूरदूरपर्यंत समाजवाद्यांच्या अत्तराचा दुर्गंध पसरला. पण, मी मोदींना म्हणालो, ‘हमाम मे सब नंगे होते है.’ काय म्हणता? ”मोदी आमच्या महामहीम सोनिया मॅडम आणि त्यांचे वारसदार राजकुमार, राजकुमारी तसेच बारामतीचे साहेब आणि वांद्य्राचे साहेब यांच्या बोलण्याकडे पण लक्ष देत नाहीत. तर मी कोण?” हो हो माहिती आहे. पण, बोलायला काय जाते? ‘उचलली जीभ लावली टाळ्याला!’ काय म्हणता, ’हमाम आणि नंगे’ हे वाक्य आधीपण जितेंद्र आव्हाड म्हणाले होते? मग आता काय करू?” काय म्हणता, त्यांच्यासारखा मला पण हमामच्या नंगेपणाचा अनुभव आहे. काय करावे? अत्तराची कुपी अशी फुटली. काश! इथल्या ‘सायकलवाल्यां’नी जरा कल्पना दिली असती, तर महाविकास आघाडीच्या तिघाडीत चौथी ‘सायकल’पण असती. जाऊ दे, अजून कुठे अत्तराचा सुगंध लपला असेलच ना? शोधायला हवे. दिल्लीच्या राजकुमारांना काकांना आणि साहेबांना सांगू का?
 
 
सुंगधाने झालो धुंद जीव झाला बेबंद
अत्तराचा फाया तुम्ही मला आणा
मॅडम, काकासाहेब!
 
 

नसीरूद्दीन शाह आणि बदल

 
"आम्हा २० करोड लोकांची ही मातृभूमी आहे. आम्हा २० करोड लोकांना कोणी नष्ट करू शकत नाही. जर असे कोणी बोलत असेल तर आम्ही लढू! मला विश्वास आहे की, अशा लोकांना चोख उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत.” सरफरोश चित्रपटात ‘होशवालों को खबर क्या’ म्हणत देशद्रोही व्यक्तीची भूमिका अगदी मनापासून रंगवणाऱ्या नसीरूद्दीन शाहचे वरील उद्गार! छत्तीसगढ येथे धर्म संसद झाली. तिथल्या विषयांचा मुद्दा घेऊन म्हणे त्यांना वाईट वाटले आणि संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी एका दैनिकाला म्हणे अशी प्रतिक्रिया दिली. अर्थात नसीरूद्दीनसारखे लोक या देशाला आता आपली मातृभूमी आहे वगैरे म्हणू लागले हा बदल महत्त्वाचा. कारण, त्याआधी त्यांना आणि सिनेसृष्टीतल्या, साहित्यसृष्टीतल्या काही तथाकथित ठरावीक पुरोगामी वगैरे लोकांना (म्हणजे देश आणि हिंदू समाजाबद्दल दुस्वास असलेले लोक) भारतात राहायची भीती वाटू लागली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, भाजप सत्तेत आले म्हणून त्यांना देश असुरक्षित आणि असहिष्णू वाटायला लागला होता. पण, आता नसीरूद्दीनसारख्या लोकांना भारतात राहायची भीती वाटत नाही आणि भारत आपली मातृभूमी आहे, हे जाहीर सांगण्याची इच्छाही झाली आहे.
 
 
पण, छत्तीसगढच्या धर्मसंसदेमध्ये कोण काय म्हणाले यावर आपले विचार मांडायला नसीरूद्दीन यांना वेळ आहे. मात्र, त्याआधी ‘एमआयएम’च्या ओवेसीने जे काही अकलेचे तारे तोडले, त्याबद्दल नसीरूद्दीन काही बोलल्याचे ऐकिवात नाही. “मोदी हिमालयात जातील,योगी मठात जातील, तेव्हा हिंदूंचे काय होईल,” असा प्रश्न विचारणाऱ्या ओवेसींबद्दल नसीरूद्दीन मूग गिळून गप्प होते. तसेच निधर्मीपणाचे ढोल पिटणारे त्यांचे इतर सहकारी कुठे होते देव जाणे? अर्थात, नसीरूद्दीन हे ओवेसींना जाब विचारतील आणि तेव्हा देशातील बहुसंख्य हिंदू समाजाला न्याय मिळेल, असे काही नाही. हिंदू जागा झाला आहे. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय पटलावरही त्याचे दृश्य स्वरूप प्रगट होताना दिसते. काहीही असो, या देशात राहायचे या देशातून सारे काही कमवायचे आणि वर देशालाच शिव्याशाप द्यायचे, अशी विकृती जपणाऱ्या लोकांचे दिवस मात्र बदलले हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@