
नसीरूद्दीनसारखे लोक या देशाला आता आपली मातृभूमी आहे वगैरे म्हणू लागले हा बदल महत्त्वाचा
"आम्हा २० करोड लोकांची ही मातृभूमी आहे. आम्हा २० करोड लोकांना कोणी नष्ट करू शकत नाही. जर असे कोणी बोलत असेल तर आम्ही लढू! मला विश्वास आहे की, अशा लोकांना चोख उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत.” सरफरोश चित्रपटात ‘होशवालों को खबर क्या’ म्हणत देशद्रोही व्यक्तीची भूमिका अगदी मनापासून रंगवणाऱ्या नसीरूद्दीन शाहचे वरील उद्गार! छत्तीसगढ येथे धर्म संसद झाली. तिथल्या विषयांचा मुद्दा घेऊन म्हणे त्यांना वाईट वाटले आणि संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी एका दैनिकाला म्हणे अशी प्रतिक्रिया दिली.
अर्थात नसीरूद्दीनसारखे लोक या देशाला आता आपली मातृभूमी आहे वगैरे म्हणू लागले हा बदल महत्त्वाचा. कारण, त्याआधी त्यांना आणि सिनेसृष्टीतल्या, साहित्यसृष्टीतल्या काही तथाकथित ठरावीक पुरोगामी वगैरे लोकांना (म्हणजे देश आणि हिंदू समाजाबद्दल दुस्वास असलेले लोक) भारतात राहायची भीती वाटू लागली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, भाजप सत्तेत आले म्हणून त्यांना देश असुरक्षित आणि असहिष्णू वाटायला लागला होता. पण, आता नसीरूद्दीनसारख्या लोकांना भारतात राहायची भीती वाटत नाही आणि भारत आपली मातृभूमी आहे, हे जाहीर सांगण्याची इच्छाही झाली आहे.
पण, छत्तीसगढच्या धर्मसंसदेमध्ये कोण काय म्हणाले यावर आपले विचार मांडायला नसीरूद्दीन यांना वेळ आहे. मात्र, त्याआधी ‘एमआयएम’च्या ओवेसीने जे काही अकलेचे तारे तोडले, त्याबद्दल नसीरूद्दीन काही बोलल्याचे ऐकिवात नाही. “मोदी हिमालयात जातील,योगी मठात जातील, तेव्हा हिंदूंचे काय होईल,” असा प्रश्न विचारणाऱ्या ओवेसींबद्दल नसीरूद्दीन मूग गिळून गप्प होते.
तसेच निधर्मीपणाचे ढोल पिटणारे त्यांचे इतर सहकारी कुठे होते देव जाणे? अर्थात, नसीरूद्दीन हे ओवेसींना जाब विचारतील आणि तेव्हा देशातील बहुसंख्य हिंदू समाजाला न्याय मिळेल, असे काही नाही. हिंदू जागा झाला आहे. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय पटलावरही त्याचे दृश्य स्वरूप प्रगट होताना दिसते. काहीही असो, या देशात राहायचे या देशातून सारे काही कमवायचे आणि वर देशालाच शिव्याशाप द्यायचे, अशी विकृती जपणाऱ्या लोकांचे दिवस मात्र बदलले हे नक्की!