सागरी क्षेत्राचे रक्षण करण्यास भारतीय नौदल सज्ज – नौदलप्रमुख

    03-Dec-2021
Total Views |
nc_1  H x W: 0

युद्धनौका आणि पाणबुडीनिर्मितीत भारत आत्मनिर्भर
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारताच्या सागरी हिताचे आणि सागरी क्षेत्राचे रक्षण करण्यास भारतीय नौदल सदैव सज्ज आहे, अशी ग्वाही नौदलप्रमुख एडमिरल आर. हरिकुमार यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली.
 
 
भारतीय नौदल दिनाच्या पूर्वसंध्येस नौदलप्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भारताचे सागरी हित आणि सागरी क्षेत्रासमोर उभ्या राहणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यास आणि रक्षण करण्याचे भारतीय नौदल सज्ज आहे. बदलत्या परिस्थितीनुसार भारतीय नौदलाच्या नव्या कमांड तयार करण्यास काम युद्धपातळीवर सुरू असून साधारणपणे पुढील वर्षांपर्यंत त्याविषयीची चौकट पूर्ण होणार आहे.
 
 
भारतीय नौदल हिंदी महासागर क्षेत्रामध्ये चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असल्याचे नौदलप्रमुखांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, करोना महामारी आणि देशाच्या पूर्व सीमेवरील घडामोडींमुळे राष्ट्रीय सुरक्षेपुढील जटीलता वाढली आहे. मात्र, या दोन्ही आव्हानांचा सामना करण्यास नौदल सक्षम आहे. भारतीय नौदलास लवकरच हवा आणि पाण्यात संचार करणारी स्वदेशी मानवरहित तंत्रज्ञान प्राप्त होणार असून त्यासाठी पुढील १० वर्षांचा रोडमॅप तयार आहे. सध्या नौदलासाठी विकसीत करण्यात येत असलेल्या ३९ युद्धनौका आणि पाणबुड्यांपैकी ३७ या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातच तयार करण्यात येत आहे. त्यामुळे संरक्षण उपकरणांच्या निर्मितीविषयी भारत आत्मनिर्भर होत असल्याचेही ते म्हणाले.