ठाण्यातील ४७ प्रभागांचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे अखेर सादर

    29-Dec-2021
Total Views |

Thane_1

 
 
ठाणे : कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असतानाही ठाणे महापालिकेने आगामी पालिका निवडणुकीच्या सज्जतेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार, एकूण ४७ प्रभागांच्या रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने यासाठी विशेष गोपनियता बाळगल्याने प्रभाग रचनेबाबत नाना चर्चा रंगल्या आहेत.
 
 
 
 
ठाणे महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपणार आहे. या निवडणुका एक सदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. परंतु, महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका तीन सदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात सुरू केली होती.
 
 
 
 
दि. ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून पाठविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांना दिले होते. परंतु, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागून घेतली होती. त्यानंतर मागील दहा दिवस महापालिकेचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करत होते.
 
 
 
 
मागील आठवड्यात हा आराखडा आयोगाला सादर केला. त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर निवडणूक आयोग महापालिकेला सूचना करेल. नसेल तर तो प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती सूचना मागवल्यानंतर, त्यावर सुनावणी होऊन प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे.
 
 
 
 
४७ प्रभागातील एका प्रभागात चार नगरसेवक
ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा तयार करताना २०११ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली असून १४२ नगरसेवकांची संख्या असलेल्या ठाणे महापालिकेत किमान ३५ हजार आणि जास्तीत जास्त ४२ हजारांचा एक असे तीन सदस्य संख्येचे ४६ आणि कमीत कमी ४९ ते जास्तीत जास्त ५७ हजार लोकसंख्या असलेला चार सदस्यांचा एक असे ४७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.