मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार!

    28-Dec-2021
Total Views |

Kapil and Ranveer_1
 
 
 
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे वचन सर्वार्थाने अंगी बाणवण्यासाठी ‘मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार!’ हा विचार मुळी मनात रुजविणे अत्यंत महत्त्वाचे! कारण, हे जीवन सुंदर तेव्हाच आहे, जेव्हा आपल्या आरोग्याचा आणि पर्यायाने आयुष्याचा संपूर्ण ताबा आपण आपल्या हाती घेऊ. तेव्हा, नवीन वर्षाचे संकल्प घेण्याची हल्लीची ‘फॅशन’ लक्षात घेता, यंदाही प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी, सुखी-स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी ‘मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा कानमंत्र जपावा आणि जगावा...
 
 
 
 
स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस! ताणतणाव! ज्याचा-त्याचा हा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. ताण अनुभवत असताना तो अनेक कारणांनी उत्पन्न होतो. आपण आजारी असतो तेव्हा, आपण कठीण परिस्थितीला, दुष्ट लोकांना सामोरे जातो तेव्हा, वा आयुष्यातील मिशन पूर्ण करत नाही तेव्हा... अशा अनेकविध कारणास्तव तणाव निर्माण होतो. अशावेळी आपले शरीर आणि मेंदू रासायनिक वा हार्मोन्सच्याविविध बदलांतून आपले आरोग्य राखण्याचा प्रयत्न करत असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखायचा आपण प्रयत्न करतो. हे करताना कित्येकांचा सहनशीलतेचा वाडगा अनेक वेळा रिता होतो.
 
 
 
 
हा वाडगा योग्य प्रयत्नांनी सदैव भरलेला राहू शकतो, जर आपण स्वतःला काळजीपूर्वक निरोगी आणि सक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला तर! असे केले तर आपलाही सहनशीलतेचा वाडगा सदैव भरलेला राहील. अर्थात, व्यावसायिक खेळाडूंसाठी अवघड व्यायाम करणं, यापुरतेच हे मर्यादित राहत नाही. यासाठी स्वतः दक्ष राहून स्वतःची निगा राखायला लागते. स्वतःची काळजी घ्यावी लागते.
 
 
 
धावपटू आणि इतर खेळाडू आपल्या खेळातील यशासाठी आपली खेळातील एकाग्रता वाढवितात. आपल्या खेळासाठी ते स्वतःला समर्पित करतात. पण, यामुळे त्यांनी जर स्वतःसाठी मोकळा वेळ दिला नाही वा आपण या खेळात काय उद्देश ठेवला आहे, याचा योग्य विचार केला नाही, तर खेळाडू ‘बर्नआऊट’ किंवा खच्ची होऊ शकतात. शिवाय व्यायामपटूचे आयुष्य जरी मातब्बर असले, तरी तुमच्या संपूर्णतेची व्याख्या त्यामुळे देता येत नाही.
 
 
 
तुम्ही तुमची उत्तम तयारी केलेली आहे आणि तरीही अयशस्वी झाला आहात किंवा तुम्हाला तणावामुळे जबरदस्त दुखापत झाली आहे, तर काय होईल? आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की, आपले स्वतःचे बृहतमूल्य हेस्वतःच्या व्यावसायिक कार्याशी जोडलेले नसावे आणि मुळात आपलं शरीर हे यंत्र नाही. आपल्या खेळाचं क्षितीज पाहताना खेळाडूंनी लक्षात घ्यायला पाहिजे की, आपल्याला आयुष्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन सांभाळायला लागते. शिवाय आपली मानसिक आणि शारीरिक काळजी व्यवस्थित घ्यायला लागते.
 
 
 
आदाम केम्प हे व्यावसायिक बास्केटबॉलपटू आहेत. ते म्हणतात, “ ‘सेल्फ केअर’ किंवा ‘स्वआस्था’ ही जगण्याची ‘स्टाईल’ आहे. त्यांनी जर नियमितपणे स्वतःची काळजी नाही घेतली नाही, तर त्यांना जगणेच अवघड होईल,” असे ते सांगतात. सॅम्युयल अकिन्स हे व्यावसायिक ‘बॅले डान्सर’ म्हणतात, त्यांच्यासाठी स्वतःबद्दलच्या काळजीचे अनेक पदर मोडतात. ‘बॅले डान्सिंग’च्या ‘प्रॅक्टिस’मध्ये जवळजवळ दहा-बारा तास ही मंडळी उभ्या-उभ्या श्रम करतात. त्यासाठी त्यांना मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्य सांभाळायचे म्हटले, तर अगदी बारीक-बारीक गोष्टींचे नियोजन असते.
 
 
 
विचार करायचा असतो. मनाला शांत करायचे असते. शिवाय काही वेळेतच खायचे असते. अशा अनेक गोष्टी करत सॅम्युयल म्हणतात, “स्वतःची काळजी म्हणजे कुठल्याही वेळी काही विशेष प्रयत्नांची शिदोरी आपल्या थकणार्‍या शरीराला वेळोवेळी द्यायची, जेणेकरुन ते क्षीण न होता टवटवीत राहील. या स्वतःच्या स्वतःसाठी काळजी घ्यायच्या प्रयत्नांमध्ये आपण आपल्या मनाला आणि शरीराला कसे प्रेरित करायचे, ‘रिचार्ज’ करायचे, ठरवायचे. एक नवऊर्जा कशी द्यावयाची, जेणेकरून शरीर दिवसभर काम करूनही थकलेले भासणार नाही, याचा परामर्श घ्यायचा.”
 
 
 
खेळाडूंना वा धावपटूंना स्वत:वर व स्वत:च्या आरोग्यावर काम न करता वा निगा न राखता सकारात्मक आणि विधायक वातावरणात काम करणे शक्य नाही. स्वत:च्या जोपासनेकडे पाहताना व्यक्तीला एक प्रकारची स्वत:शी निभावून नेणारी बांधिलकी लागते. त्यात शिस्तबद्धता आहे. मनावर नियंत्रण आहे स्वत:कडे विशेष लक्ष पुरवणे, स्वत:वर लक्ष केंद्रित करणे, स्वत:च्या गरजा पुरविणे, ‘फीटनेस’ सांभाळणे या सगळ्या गोष्टी स्वत:च्या काळजी घेण्याच्या सवयीत मोडतात. यात काहीही स्वार्थीपणा किंवा आत्मकेंद्रीतपणा असण्याचा भागही नाही. यात आपल्याला आरोग्याने (मग ते आरोग्य मानसिक असो व शारीरिक असो) परिपूर्ण ठेवणे आले.
 
 
 
कुठल्या गोष्टी आपल्यासाठी आरोग्यवर्धक आहेत वा कुठल्या गोष्टींनी आपला तणाव कमी होतो, हे जाणून घेतले तर व्यक्ती आपल्या आयुष्याची पायाभरणी व्यवस्थित करेल. हे सूत्र जितके खेळाडूंसाठी आवश्यक आहे तितकेच ते इतर सर्वांसाठीही आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार स्वत:ची काळजी म्हणजे वागणुकीच्या अशा पद्धती ज्यामध्ये स्वास्थ्य, पोषण, करमणुकीच्या गोष्टी, खेळ, व्यायाम जरूरीनुसार आरोग्यासाठी व्यावसायिक मदत इ. गोष्टींचा समावेश आहे.
आजकाल ‘८३’ या कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रसिद्ध झाला आहे. तेव्हा त्यांच्या भूमिकेत काम करणारा रणवीर सिंग हा नट त्यांचे व्यक्तिमत्त्व व चालढाल समजून घ्यायला कपिलपाजींच्या घरी चक्क काही काळ राहिला. त्यावेळी त्याचा उत्तम पाहुणचार कपिलपाजींनी केला.
 
 
 
पण, एका गोष्टीचे बंधन त्यांनी रणवीरवर घातले होते. ते म्हणजे आपलं घर हे खेळाडूंचे घर असल्याने ते बरोबर ८च्या दरम्यानच जेवतात. ही बघा, किती छोटीशी गोष्ट आहे. पण, वर्षानुवर्षे पाळलेली शिस्तबद्धता त्यात दिसून येते. अशा पद्धतीने जेवणाची वेळच नव्हे, तर जेवणात आपण नक्की काय ‘डाएट’ घेणार, ‘फास्ट फूड’ कसे टाळणार, हानीकारक पेये कशी नाकारणार इ. गोष्टींचे बारकाईने नियोजन करणारेही बरेच खेळाडू आहेत.
 
 
 
स्वत:ची काळजी का आणि कशी घ्यावी, याचे विवेचन व्यावसायिक खेळाडूसाठी खूप महत्त्वाचे आहे. पण, इतरांनीसुद्धा स्वत:च्या आरोग्यासाठी असे नियोजन केले, तर प्रत्येकाला एक आरोग्यवर्धक दर्जेदार जीवन जगता येईल. नवीन वर्षाची सुरुवात होतेच आहे, तेव्हा असा एखादा सकारात्मक बहुमूल्य निर्णय घेऊन पाहावयास काहीच हरकत नाही. (क्रमश:)
 
  - डॉ. शुभांगी पारकर