बाबासाहेबांच्या विचारांतला तरूण घडविणारा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2021   
Total Views |

more_1


व्यवसायात युवकांनी यशस्वी व्हावे, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील असणार्‍या मुलुंडमधील उद्योजक मिलिंद मोरे यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...
 
सध्या जातीवरून नव्हे, तर गुणावरून माणसाला पारखले जाते. माझे बहुतेक मित्र मराठा आणि ब्राह्मण समाजातले आहेत. पण, मी कधीही जातीवाद अनुभवला नाही. कारण, बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिक्षणाचा वसा मी जपला आहे. उच्च शिक्षण आणि त्यायोगे सुरक्षित, आर्थिक, सामाजिक दर्जा आल्याने मला नेहमीच सर्वत्र चांगले अनुभव येतात.” ‘फायनान्शियल प्लॅनर’ म्हणून स्वत:चा व्यवसाय असलेले मिलिंद मोरे सांगत होते. अत्यंत तर्कशुद्ध आणि निखळ वास्तवतेवर आधारित विचार आणि जीवन जगणारे मिलिंद मोरे.
 
 
 
मुंबईच्या मुलुंड आणि परिसरात ‘आर्थिक सल्लागार’ म्हणून चांगलेच परिचित आहेत. या क्षेत्रात तसे मराठी भाषिक कमीच. पण, या क्षेत्रात भक्कम आणि यशस्वीपणे पाय रोवून आज मिलिंद उभे आहेत. याचे सर्व श्रेय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी विचारांना देतात. ‘बी. कॉम’, ‘एम. कॉम’, ‘एल.एल.बी’, ‘पेट’ परीक्षा उत्तीर्ण, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग कोर्स केलेले तसेच ‘सर्टिफाईड फायनान्शियल’चे सर्वोच्च शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित मिलिंद. व्यवसायातील सुस्थितीसोबतच आज समाजात त्यांना मान आहे.
 
उच्चशिक्षण घ्यावे, आर्थिक सुरक्षितता सल्लागार क्षेत्रात तसेच विविध व्यवसायात पदार्पण करावे, यासाठी मिलिंद युवकांना मदत करतात. सल्ला असू दे की, आर्थिक मदत ते सदैव अग्रेसर! कितीतरी मुले केवळ गरिबीमुळे शिकू शकत नाहीत किंवा अज्ञानामुळे काय शिकावे, हे सुद्धा कितीतरी विद्यार्थ्यांना माहिती नसते. मिलिंद अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करतात. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा गरजूंपर्यंत पोहोचाव्या, यासाठी ते काम करतात. हे सगळे करताना कुठचीही प्रसिद्धी नाही की, बॅनरबाजी नाही. अर्थात, मिलिंद जरी आपल्या सत्कार्याची वाच्यता करत नसले, तरीसुद्धा समाजाला माहिती आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समाजजागृतीचा मंत्र घेऊन मिलिंद समाजासाठी काम करण्यास सदैव तत्पर असतात.
 
आज समाजात अनेक दिशाभूल करणार्‍या घटना घडत असतात. ज्यामुळे समाजातील मुलांची माथी भडकतात. मग शिक्षण घेण्याच्या वयात शिक्षण सोडून आंदोलन करतात, मोर्चे काढतात, कधी तुरूंगात जावे लागले. क्वचित आयुष्याला वाईट वळणही लागते. त्यामुळे मिलिंद मुलांची जागृती करत असताना सांगतात की, ”बाबासाहेबांनी शिक्षण घ्यायला सांगितले. एखाद्या नेत्याने त्याच्या पक्षाच्या भल्यासाठी काढलेल्या मोर्चामध्ये तुम्ही मध्येच पडता. मग त्यामध्ये तुम्हाला काय मिळते? आपल्या समाजाचे, आपल्या घरचे काय भले होते? मग ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ का होता? त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. कुटुंबाचे, समाजाचे भले होईल.”
 
 
 
मिलिंद यांचे विचार तरूणांना पटतात. कारण,मिलिंद यांचे म्हणणे म्हणजे आधी केले, मग सांगितले असे असते. असो. मिलिंद यांचे आयुष्य म्हणजे चढ-उतारांचा वेगळा अनुभव आहे. आयुष्यात निराशात्मक असे अनेक प्रसंग आले. पण, मिलिंद यांच्या शब्दकोषात ‘निराशा’ हा शब्दच नाही. त्यामुळे मार्गात काटे आले, तर ते काटे तरी काढणे किंवा त्या मार्गापेक्षा दुसरा सरस मार्ग तरी निवडणे हे त्यांनी केले. पण, कधी म्हणून रडतखडत बसले नाहीत.
 
 
मिलिंद यांचे वडील जगन्नाथ मोरे हे मुळचे दौंडचे. ते एका खासगी कंपनीत कर्मचारी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांची प्रचंड श्रद्धा. आपल्या लेकरांनी बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे उच्चशिक्षण घ्यावे, हा त्यांचा ध्यास, तर जगन्नाथ यांची पत्नी रेऊबाई ही अत्यंत धार्मिक, गृहलक्ष्मीच! जगन्नाथ आणि रेऊबाई प्रचंड कष्टकरी आणि मेहनती आणि तितकेच समाजशील. कंपनी बंद पडलेली, पण छोटी-मोठी कामे करून जे पैसे येत, त्यात जगन्नाथ घर सांभाळून ओळखीच्या मुलांना शिक्षणासाठी व्यवसायासाठी मदत करत, तर रेऊबाई भाजीचा धंदा करत, सुकी मासळी विकत. मुलुंड पश्चिमेला त्यांच्या घराच्या पाठीमागे विजेचे सबस्टेशन होते.
 
 
तिथे नेहमीच कर्मचारी खड्डा खणायचे, वायरी जोडायचे काम करण्यासाठी येत. रेऊबाई पाहत की, ते कधी नुसता सुका भात, तर कधी कोरडी भाकरीही खात. मग, त्या दिवसापासून त्या सगळ्या कर्मचार्‍यांना रेऊबाईच्या घरून भाजी जायची. आपण पोटभर जेवताना घराच्या बाहेर कोणी उपाशी राहते, ही कल्पनाच वंगाळ, असे रेऊबाईचे म्हणणे. तर असे हे दाम्पत्य. त्यामुळे समाजासाठीची नैतिक मानवता मिलिंद यांच्या रक्तातच अगदी खानदानी वारसाच!
 
 
आयुष्यभर नोकरी करावी हे मिलिंद यांचे ध्येय कधीच नव्हते. याचे कारण त्यांच्या वडिलांची बंद पडलेली कंपनी. अचानक नोकरी सुटल्यामुळे घरात काय आणि किती समस्या निर्माण होतात, हे त्यांनी अनुभवलेले. मुलुंडमध्ये छोटे छोटे व्यवसाय करत मोठे व्यावसायिक झालेले लोकही त्यांनी पाहिले होते. बाबासाहेबांनीही उच्च ध्येय ठेवले त्यामुळेच ते आयुष्यात भव्यदिव्य कार्य करू शकले, ही प्रेरणा तर होतीच. त्यामुळे नोकरीतून पुरेसे पैसे कमावल्यावर मिलिंद यांनी ‘फॅब्रिकेशन’चा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर पुढे शिक्षणाचा आणि संपर्काचा उपयोग होईल, असा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी ‘फायनान्शियल प्लॅनर’ आणि तसेच आर्थिक, कायदेशीर सल्लागार हा व्यवसाय सुरू केला.
 
 
हे करताना त्यासंदर्भातले आधुनिक शिक्षणही घेतले. या सगळ्या प्रसंगात त्यांची आई, पत्नी आणि भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मिलिंद म्हणतात की, ”डॉ. बाबासाहेबांनी समाजाला स्वाभिमान आणि आर्थिक सबलतेचा मंत्र दिला. त्यानुसार मला सर्व समाजातील युवक आर्थिक क्षेत्रात व्यवसायात यशस्वी होतील, यासाठी मोठ्या प्रमाणात काम करायचे आहे. बाबासाहेबांच्या विचारांतला तरूण घडवायचा आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील युवक घडवण्याचे उद्दिष्ट असणार्‍या मिलिंद मोरे यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...
@@AUTHORINFO_V1@@