नवी दिल्ली : “सध्या देशात कोरोनाच्या नवीन ‘ओमिक्रॉन’वर अभ्यास सुरू आहे. याला रोखण्यासाठी आपल्या सर्वांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी केले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशवासीयांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “कोरोनाच्या कठीण प्रसंगी आपण सर्व कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. प्रत्येकाने आपापल्या परिसरात मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. सध्या देशात लसीकरणाचा १४० कोटी डोसचा टप्पा पार झाला आहे. ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. ही जनशक्तीची ताकद आहे की, सर्वांच्या प्रयत्नांनी आपण या महामारीचा सामना समर्थपणे केला. कोरोनाच्या नवीन ‘व्हेरिएंट’चा आपले वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. दररोज मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर काम केले जात आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कॅप्टन वरुण सिंग यांच्या कार्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ’नभः स्पृशं दीप्तम्’ म्हणजेच अभिमानाने आकाशाला स्पर्श करण्याचे सांगितले होते. हे भारतीय वायुदलाचे ब्रीदवाक्यही आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे जीवन असेच होते. जेव्हा ते रुग्णालयात होते, त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेले एक पत्र समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाले. ते पत्र वाचून माझ्या मनात पहिला विचार आला, तो म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंग जमिनीशी जुडलेले होते. दुसरा विचार आला की, उत्सव साजरा करण्याची वेळ आली तेव्हा ते येणाऱ्या पिढ्यांची काळजी घेत होते. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवनही एक उत्सव व्हावे, अशी त्यांची इच्छा होती, ” असे मोदी यांनी सांगितले.
‘ओमिक्रॉन’ विषाणूचे मुंबईत २७ नवे रुग्ण
‘ओमिक्रॉन’ विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच बळावत असल्याचे चित्र आहे. राज्यात रविवार, दि. २६ डिसेंबर रोजी ‘ओमिक्रॉन’च्या ३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण १४१ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यांपैकी ६१ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. ‘ओमिक्रॉन’चे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. राज्यातील ३१ पैकी २७ रुग्ण हे मुंबईतील आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.