
बोस्टन - चीनच्या 'रन रिक्रुइटमेंट प्रोग्राम'शी असलेले संबंध लपविल्याच्या आरोपाखाली हार्वडचे प्राध्यापक चार्ल्स लायबर यांना अमेरिकन न्यायालयाने दोषी ठरविले आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या संशोधनात हस्तक्षेप करुन चीनला मदत केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला. चार्ल्स हे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रसायनशास्त्राचे माजी अध्यक्ष आहेत. चीनी बँकांशी असलेल्या व्यवहारांमुळे ते चर्चेत आले होते. खोटा करपरतावा दाखवून फसवणूक केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
अमेरिकन सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "लायबर हे चीनच्या वुहान तंत्रज्ञान युनिव्हर्सिटीतील स्ट्रॅटेजिक सायंटिस्ट या पारितोषिकासाठी पात्र होते. ते नंतर थाउजंड टॅलेंट प्रोग्राम या चीनच्या रन रिक्रुइटमेंट प्रोग्राममध्ये सहभागीही झाले. मात्र, चीन या कार्यक्रमाचा उपयोग परदेशी संशोधकांचा वापर करुन माहिती चोरी करण्यासाठी करत असे. या प्रकरणी लायबर यांची चौकशी सुरू आहे.
बचाव पक्षाचे वकील मार्क म्युकासे यांनी या प्रकरणी सांगितले की, "लायबर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये स्पष्टता नाही. तसेच त्यांनी केलेल्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी कागदपत्रांचीही पूर्तता फिर्यादी करु शकलेले नाहीत. खोटे विधान केल्याच्या आरोपासाठी एकूण पाच वर्षांचा शिक्षा आहे. लायबर हे सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. ज्यूरीच्या तीन तासांच्या चर्चेनंतर निकाल जाहीर करण्यात आलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो आणि याच्याशी आम्ही नक्की लढा देऊ असे म्युकासे यांनी सांगितले. यूएस विभागाचा एक भाग म्हणून लायबरवर जानेवारी २०२० रोजी आरोप लावण्यात आला होता. याच काळात कोरोनाच्या उगमाची चौकशीही अमेरिकेने सुरू केली होती.