बांधवगड हा नेहमीच बलाढ्य वाघांसाठी ओळखला गेलेला प्रदेश. हा प्रदेश आपल्या हस्तगत करण्यासाठी अनेक नरोत्तमवाघांनी इथे आपले रक्त सांडले. ‘चार्जर’ हा त्यामधीलच एक नरोत्तम वाघ. अखंड प्रदेशावर त्याने आपली सत्ता गाजवून आपले एक कुळ तयार केले. परंतु, प्रत्येक कुळाचा अंत हा निश्चित असतो. ‘चार्जर’च्या कुळाचादेखील आता अंत झाला आहे, तो कसा, याविषयी उलगडा करणारा हा लेख.
नोव्हेंबरच्या अखेरीस बांधवगढच्या जंगलातून अत्यंत वाईट बातमी आली 'Bamera's son, Mr. X is no more.' ही बातमी बांधवगढवर प्रेम करणार्या प्रत्येकाला अस्वस्थ करणारी होती. ’चार्जर’ युगाचा शेवट झाला होता. ज्या ’चार्जर‘च्या पिढ्यांनी गेली दोन दशके बांधवगढला समृद्ध केले त्यांचे स्मरण आणि उजळणी सरत्या वर्षाला निरोप देताना केलीच पाहिजे. कारण, आता नवीन वर्षापासून बांधवगढवर ’नवा भिडू, नवे राज्य’ असेल.१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला बांधवगडमध्ये वाघांची संख्या शून्य होती. कारण, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही शिकार चालूच होती. अशा वेळी ‘बंका’ वाघाचा जन्म १९७० च्या उत्तरार्धात झाला. ‘बंका’चा जन्म कोठे झाला किंवा त्याचे पूर्वीचे सोबती कोण हे कोणालाच माहीत नाही. तो बांधवगडचा निर्विवाद राजा म्हणून उदयास आला. ‘सीता’ नामक वाघिणीचा जन्म १९८२ मध्ये एका उंच टेकडीवर झाला, ज्याला आता ‘सीता मंडप’ म्हणून संबोधले जाते. तिने पुढे तिच्या आईचा प्रदेश ताब्यात घेतला. १९८६ आणि १९८९ मध्ये तिला प्रबळ नर ‘बंका’पासून पिल्लं झाली. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘बंका’ला प्रथमच एका नवीन पुरुषाने आव्हान दिले आणि त्याचे नाव होते ‘चार्जर.’
१५ वर्षांच्या वृद्ध ‘बंका’ त्याच्या भागात घुसखोरी झाल्याने अधिक जागरूक झाला होता. त्याने आपल्या प्रदेशात सतत गस्त घालायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात ‘बंका’ आणि ‘चार्जर’ सात वर्षांच्या नर वाघात भयंकर युद्ध सुरू झाले. १९९१ च्या उन्हाळ्यातील एका रात्री ‘चार्जर’ या तरुण नर वाघाने ‘बंका’ला मारले आणि त्याला मृतावस्थेत सोडले. ‘बंका’ रक्तबंबाळ झाला होता. अखेर ‘चार्जर’ आणि त्याच्या वंशजांचे युग सुरू झाले होते. ‘चार्जर’ त्याची पट्टराणी ‘सीते’सोबत मोठ्या भागावर राज्य करणार हे निश्चित झाले होते.१९९१ मध्ये सीतेने चार शावकांना जन्म दिला. त्यामधील दोन हे ‘बडा बच्चा’ आणि ‘लंगरू’ म्हणून ओळखले जात होते. ‘चार्जर’ने अपंग असलेल्या ‘लंगरू’ला तो चार वर्षाचा होईपर्यंत सांभाळले. १९९४ च्या मार्चमध्ये ‘सीते’ने अजून दोन शावकांना जन्म दिला, त्यापैकी एक लहानपणीच मेला तर दुसरी ‘मोहिनी’ ही मादी ‘चार्जर’च्या कुळामध्ये सामील झाली. तिने एप्रिल १९९७ मध्ये ‘बी १’, ‘बी २’ आणि ‘बी ३’ या नर वाघांना जन्म दिला. त्यांचे वडील ‘चार्जर’च असावे, असा अंदाज आहे. कारण, शावकांचा जन्म हा ‘ताला’नामक पर्वतश्रेणीत झाला होता, जो प्रामुख्याने ‘चार्जर’च्या नियंत्रणाखाली असलेला प्रदेश होता. ‘चार्जर’च्या हद्दीत प्रवेश करण्याचे धाडस इतर कोणत्याही नराचे नव्हते आणि असे नसते, तर ‘चार्जर’ने ही या तीन वाघांना दोन वर्षे आपल्या प्रदेशात राहू दिले नसते.
‘मोहिनी’ने नंतर दोन पिल्लांना जन्म दिला. मार्च २००३ मध्ये, जेव्हा तिची तिसर्या फळीतील पिल्ले ही १८ महिन्यांची होती तेव्हा जंगलातून जाणार्या एका वाहनाने झालेल्या अपघातात ‘मोहिनी’चा मृत्यू झाला आणि त्यानंतर ती पिल्लेही लवकर मरून गेली. इकडे ‘सीते’ने १९९६ च्या सप्टेंबरमध्ये तीन शावकांना जन्म दिला. जी अगदी लहान वयात गेली. त्याचवर्षी तिने तिच्या शेवटच्या एक नर आणि दोन मादी शावकांना जन्म दिला. त्यामधील नर बेपत्ता झाला आणि नंतर माद्या ‘बनवेही’ आणि ‘चक्रधारा’ यांनी ज्या ज्या भागांवर राज्य केले त्या भागांच्या नावांनी त्या दोन्ही ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी मिळून पुढे सुमारे २५ शावकांना जन्म दिला, त्यापैकी किमान १८ शावकं हा एकट्या ‘बी २’ उर्फ ‘सुंदर’ या वाघाची आहेत.‘बी २’ उर्फ ‘सुंदर’२००० सालच्या सुरुवातीस, ‘चार्जर’ला त्याच्या स्वत:च्या मुलाने ‘बी २’ उर्फ ‘सुंदर’ने आव्हान दिले होते. ‘सुंदर’ सोबतच्या नियमित मारामारीमुळे ‘चार्जर’ जखमी झाला. त्याचे वाढते वय ‘सुंदर’च्या ताकदीचा सामना करू शकले नाही. ‘चार्जर’ त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘चक्रधारा’ प्रदेशातील सिंहासन सोडून हद्दपार करण्यात आले. त्याने एकेकाळी निर्भयपणे एक दशकाहून अधिक काळ इथे राज्य केले होते. ‘सुंदर’ने ‘चार्जर’ला राजभेरा कुरणात पळवून लावले. तिथे त्याचा दुसरा मुलगा ‘बी १’ (उर्फ राज) याच्याशी सामना झाला आणि संघर्षात तो जखमी झाला. ‘चार्जर’ कदाचित मोतीबिंदूमुळे कमकुवत झाला होता. ज्यामुळे त्याची शिकार करण्याची क्षमता कमी झाली होती, नाहीतर तो अजूनही आपल्या मुलांशी लढण्यासाठी पुरेसा सामर्थ्यवान होता. जून २००० मध्ये ‘सुंदर’ मरदारी गावाजवळील एका खंदकात उपाशी व जखमी अवस्थेत विभागाला सापडला. त्याला एका सुरक्षित निवार्यात हलवण्यात आले. जेथे त्याने २९ सप्टेंबर २००० रोजी अखेरचा श्वास घेतला.
‘चार्जर’चा मोठा प्रदेश त्याच्या मुलांच्या ‘बी १’, ‘बी २’ आणि ‘बी ३’च्या हातात गेला. ‘बी १’ने (उर्फ राज) राजभेरा क्षेत्राचा ताबा घेतला. तो शेवटचा जून, २००२ मध्ये दिसला होता. ‘बी २’ने (उर्फ सुंदर) हिरवेगार चक्रधारा क्षेत्र स्वतःकडे ठेवले, तर ‘बी २’ (बडा लडका) तीन भावांपैकी सर्वात मोठा चक्रधाराच्या पलीकडे असलेल्या टेकड्या आणि मिर्चैनी क्षेत्राचा काहीभाग ताब्यात घेतला. नोव्हेंबर २००३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. लहानपणापासूनच ‘बी २’ने आपले वर्चस्व राखले. संपूर्ण प्रदेश पुन्हा ‘बी २’ उर्फ ‘सुंदर’च्या ताब्यात गेला होता. तो त्याच्या वडिलांच्या विपरित होता. ‘सुंदर’ अगदी शांत होता. ‘सुंदर’ला प्रथम आव्हान ‘चॅलेंजर’ने (त्याच्या दोन वर्षांच्या मुलाने) दिले होते. जो झुरझुरा, चोरबेहरा आणि महामन भागात लढत होता. २००३-०४ मध्ये ‘चॅलेंजर’च्या रहस्यमय मृत्यूनंतर, एक नवीन नर ‘बोखा’ प्रदेशांमध्ये प्रवेश केला. तो ‘सुंदर’ आणि नंतर त्याचा मुलगा ‘बामेरा’ यांचा कायम विरोधक राहिला.जानेवारी, २०१० मध्ये ‘बामेरा’ हा ‘सुंदर’च्या प्रदेशात घुसला होता. ‘बोखा’ आणि ‘सुंदर’ जेव्हा प्रबळ होते तेव्हा ‘बामेरा’नेत्यांना टाळले. ‘बामेरा’चा जन्म डिसेंबर, २००४ मध्ये ‘सुंदर’ आणि ‘चक्रधारा’ मादी (उर्फ प्यारी) यांच्या पोटी झाला होता. फेब्रुवारी, २०११ मध्ये ‘सुंदर’च्या प्रदीर्घ कारकिर्दीला त्याने आव्हान दिले होते. ‘सुंदर’चे वय वाढत होते, तर ‘बामेरा’ अधिक धाडसी होत होता. त्याने ‘सुंदर’चा बराच भाग व्यापला होता. २०११ मध्ये ‘सुंदर’ने त्याच्या वडिलांकडून वारसा मिळालेला आणि जवळजवळ एक दशक टिकवलेला प्रदेश सोडला आणि ‘ताला’ येथील आपले सिंहासन ‘बामेरा’साठी खाली करून८० किमी अंतरावर असलेल्या चरवाह वनक्षेत्रात गेला. १९ नोव्हेंबर, २०११ रोजी तो अशक्त अवस्थेत दिसला आणि वृद्धापकाळामुळे त्याचा मृत्यू झाला.
२०११ मध्ये ‘बामेरा’चे खरे राज्य आले. ‘सुंदर’च्या मृत्यूनंतर ‘बामेरा’ने स्वतःसाठी एक मोठा प्रदेश एकत्र केला. आपल्या वडिलांप्रमाणेच, त्याने चक्रधारा प्रदेशाला आपली राजधानी घोषित करत मुख्य प्रदेशाचा बराचसा भाग व्यापला. बांधवगडमधील वाढत्या नर वाघांच्या संख्येने, विशेषत: समृद्ध ‘ताला’ भागात ‘बामेरा’ला कधीही शांतता लाभली नाही. विशेषतः २०१३ च्या सुरुवातीनंतर ‘बामेरा’ने संघर्ष टाळण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने आपली जोडीदार ‘लक्ष्मी’ हिला ‘बोखा’सोबत दुरून पाहिलं, तरी त्याक्षणी त्याने ‘बोखा’ला आव्हान दिलं नाही.‘बामेरा’चा आपल्या सुरुवातीच्या काळात राज्य करण्याचा प्रतिकार त्यावेळच्या ‘मिर्चैनी’ नामक वाघाच्या उपवयस्क वाघांकडून झाला. त्याचा स्वत:चा मुलगा ’पुष्पराज’ आणि ’मिर्चैनी’च्या एका उपवयस्क शावकांनी ’बामेरा’ला जखमी केले. ज्यातून तो पूर्णपणे बरा झाला नाही. ’बामेरा’समोर कठीण आव्हाने होती. ’जोभी’ नामक वाघाने ’बामेरा’चा बराचसा प्रदेश आपल्याकडे घेतला. ’जोभी’शी झालेल्या एका मारामारीत ’बामेरा’च्या पुढच्या दोन्ही पंजांना दुखापत झाली होती, तर त्याने ’जोभी’ एका डोळ्याने आंधळा केला होता. मार्च, २०१४ च्या सुमारास, बनवेही येथे जन्मलेल्या त्याच्या मुलाने ’बामेरा’ला मुख्य प्रदेशातून काढून टाकले. ऑक्टोबर, २०१५ मध्ये बांधवगड पावसाळी हंगामानंतर सुरू झाल्यावर, ‘भीम’नामक वाघाने ’बामेरा’ला आव्हान दिले. एक धोकादायक लढा सुरू झाला, ज्यामध्ये ’बामेरा’ने ‘भीम’च्या खांद्याचा चावा घेतला. नोव्हेंबर, २०१५ मध्ये ’बामेरा’ लंगडत होता आणि त्याला उपचारासाठी प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आले. सहा महिन्यांनंतर त्याचा मृत्यू झाला.
’बामेरा’ लढवय्या होता आणि त्याने बांधवगडमधील इतर कोणत्याही वाघांपेक्षा जास्त वाघांचा सामना केला आणि लढला. त्याने कदाचित ‘चार्जर’च्या कुळातील प्रबळ पुरुषांपेक्षा सर्वात कमी काळ राज्य केले तरीही तो खर्या योद्धाप्रमाणे लढला. त्याच्या हयातीत त्याने लढलेल्या पुरुषांमध्ये ‘बोखा’, ‘सुंदर’, ‘रहस्य’, ‘जोभी’, ‘पुष्पराज’ (वकीता येथील ‘बामेरा’चा मुलगा), वकीताचा दुसरा मुलगा, ‘ब्लू आईज’ आणि अगदी ‘मिस्टर एक्स’ (त्याचा स्वतःचा मुलगा) या इतक्या सगळ्या वाघांचा समावेश होती.
‘बामेरा सन’ उर्फ ‘मिस्टर एक्स’‘मिस्टर एक्स’ या ‘बामेरा’च्या मुलाचा जन्म ऑक्टोबर, २०११ मध्ये ‘कानकट्टी’ या वाघिणीच्या पोटी इतर दोन मादीशावकांसोबत झाला. त्याच्या गालावरील ‘एक्स’ चिन्हाच्या आधारे त्याला ‘मिस्टर एक्स’ म्हणून देखील ओळखले जाते. मे, २०१३ मध्ये एका मादी शावकाला अज्ञात नराने मारले. जूनपर्यंत तो दुसर्या बहिणीसोबत दिसला होता. पण पुढच्या महिन्यात त्याला वन विभागाने मृत घोषित केले. तो हरदिया, किल्ला आणि चक्रधारा भागात फिरताना दिसत होता.
२०१६ च्या सुरुवातीला तो तीन वर्षांनी पुन्हा समोर आला. आता तो पाच वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर वाघ होता. मगधीमध्ये ‘महामान’ या नर वाघाशी त्याने संघर्षांची मालिका सुरू केली. ‘महामाना’चा पराभव करून तो सिंहासनावर विराजमान झाला. ‘ताडोबा सॉसर’पासून ताला ’पर्वतरांगे’पर्यंत सेहेरा मेडोजपर्यंत मागधीच्या काही भागावर हा ‘बामेरा’चा पुत्रराज्य करत होता. ‘बामेरा’चा मुलगा त्याच्या पूर्वजांनी राज्य केल्याप्रमाणे ‘मागधी आणि ताला प्रमुख क्षेत्रावर राज्य करूशकतो असे कुठेतरी वाटत होते. बामेरा बाहेर पडल्यानंतर चक्रधारा क्षेत्र रिकामे झाले होते. भीमशी त्याचे काही लढायालढल्या.
‘मिस्टर एक्स’ने आणखी अनेक काळ या प्रदेशावर राज्य केले असते. परंतु चार्जरचा अपवाद वगळता कोणत्याही पुरुषानेएवढ्या विशाल प्रदेशावर राज्य केले नाही. महामान आणि भीम अशा तरुण आणि बलवान वाघांसह ‘मिस्टर एक्स’चे पतन आणि निधन जवळ आले होते. अखेर त्याने यावर्षी शेवटचा श्वास घेतला आणि ‘चार्जर’ युगाचा अस्त झाला.
अक्षता बापट