लोह बी घडले, परीसचि झाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2021   
Total Views |

book_1
परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्या अनुभवांचे नेमके शब्दांकन, आवश्यक तिथे स्वतःच्या आकलनाची भर घालणे, कार्यकर्त्यांचे परिषदेमधले अनुभव आणि त्यांची नंतरची वाटचाल यांची स्वतःच्या निवेदनातून केलेली नेमकी सांधेजोड यामुळे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. ही कार्यकर्त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना ठळक करणारी प्रत्येक प्रकरणामधली ‘परिषदेने मला काय दिले’ ही चौकट लक्षवेधी आहे. राष्ट्रउभारणीमध्ये अमूल्य योगदान देणार्‍या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची पंच्याहत्तरी दृष्टिपथात येत असताना विविध अंगांनी तिचा सविस्तर लेखाजोखा मांडला जाईल, तेव्हा ‘तुम्ही बी घडा ना’ हे पुस्तक त्याला पूरकच ठरेल.


पौगंडावस्थेमधून बाहेर पडून तारुण्याच्या खुल्या आसमंताकडे जाणार्‍या वाटेवर चालणार्‍या व्यक्तीला शरीर आणि मनामध्ये घडून येणारे बदल असंख्य भलीबुरी स्वप्ने दाखवत असतात. त्यामध्ये गुंतून जात असताना वाटेवरच्या नाजूक वळणांवरून पाऊल कधी घसरेल याची शाश्वती नसते. बंधमुक्ततेसाठीच्या आसुसलेपणाचे रुपांतर स्वैरपणामध्ये होऊ नये, यासाठी या वयामध्ये गरज असते ती योग्य दिशादर्शनाची.
 
 
या वयोगटामधल्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना दिशादर्शन करत त्यांच्यातील अंगभूत ऊर्जेला विधायकतेकडे वळवणारी आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार रुजवणारी संघटना म्हणजे ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.’ या संघटनेने गेल्या ७२ वर्षांमध्ये अक्षरशः लाखो कार्यकर्ते घडवले आहेत. महाविद्यालयीन कालखंडात मिळालेली ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या संस्कारांची शिदोरी घेऊन वैयक्तिक आयुष्यात वाटचाल करणार्‍या २८ व्यक्तींच्या कर्तृत्वाची ओळख दत्ता जोशी यांनी आपल्या ‘तुम्ही बी घडा ना’ या पुस्तकामधून करून दिली आहे.

महाविद्यालयीन जीवनात परिषदेमध्ये दायित्व घेऊन कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधून त्यामधून हे पुस्तक साकारले आहे. यातले अनेक जण परिषदेचे ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ असण्याचा अनुभव घेऊन तावून-सुलाखून निघालेले आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊन सरकारी नोकरी न करता ‘दलित उद्योजकता’ या विषयात कार्य करणारे ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक मिलिंद कांबळे; समाजसेवी संस्थांना (एनजीओ) कागदपत्रांची पूर्तता, निधी उभारणी, नियोजन यासंदर्भात मार्गदर्शन करणार्‍या ‘सेवावर्धिनी’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी, ईशान्य भारतापासून युरोपपर्यंत ‘मदर्स ऑन व्हील्स’ या उपक्रमाद्वारे मातृशक्तीचा जागर करणार्‍या माधुरी काळे-सहस्रबुद्धे, अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमधून वर येऊन आज बांधकाम आणि पुनर्विकास क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करणारे शिवाजी दहीबावकर अशा अनेक माजी पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी सांगितलेले अनुभव खूप काही शिकवून जाणारे आहेत.

 
आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्याचा परिषदेमध्ये घेतलेला अनुभव या सर्वांना प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कसा उपयोगी पडला, हे वाचणे रोचक आहे. ‘निसर्ग वारी’ या संकल्पनेतून पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त वारीसाठी झटणारे प्रशांत अवचट यांची या संदर्भातली टिप्पणी ही परिषदेच्या कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक अनुभव म्हणता येईल, अशी आहे. ते म्हणतात, “पाण्यात बुडणार्‍याला वाचवायचे कसे याचे प्रशिक्षण परिषदेने दिलेले नव्हते. पण, आणीबाणीच्या परिस्थितीत डोके शांत ठेवून बचावाची योजना कशी आखायची, गडबडीतही अन्य नियोजन कसे करायचे आणि अमलात कसे आणायचे, हे मात्र परिषदेने शिकवले होते. हीच मनाची कणखरता घेऊन कुठे दाज्या पावरा नंदुरबारच्या वनवासी भागामध्ये धरणग्रस्तांसाठी कार्य करतात, कुठे डॉ. कदम, डॉ. चाकूरकर आणि डॉ. बेद्रे अत्यल्प मोबदला घेऊन रुग्णसेवा करतात, कुठे डॉ. गिरीश कुलकर्णी थेट वेश्यावस्तीमध्ये शिरून वेश्यांच्या पुनर्वसनाचे, वेश्यांच्या मुलांच्या विकासाचे कार्य करतात. कुठे सुरेश चव्हाणके प्रतिकूल परिस्थितीत ‘सुदर्शन’ ही वृत्तवाहिनी उभी करून हिंदुत्वविरोधी संपुआ सरकारच्या दडपशाहीला खंबीरपणे तोंड देतात.”


प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांनी परिषदेच्या विविध उपक्रमांमधून रुजणार्‍या सामाजिक जाणिवांबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, “कामामध्ये लोकाभिमुखता आवश्यक असते आणि त्यासाठी सामाजिक भान महत्त्वाचे असते. सामाजिक कार्याचा स्पर्श असणारी मुले या व्यवस्थेत खूप परिणामकारक निर्णय घेऊ लागतात. सामाजिक भान येण्यासाठी अन्य मुलांना जो वेळ लागतो, तो यांना लागत नाही. परिषदेसारख्या संघटनेशी विद्यार्थीदशेत जोडला गेलो, त्याचा मोठा फायदा मला माझ्या कामात झाला. त्यातून मी अधिकाधिक लोकोपयोगी कामे करू शकलो. अशाच संस्कारांचा फायदा अनेक कार्यकर्त्यांना स्वतः सामाजिक संस्था उभी करून समाजकार्य करताना झाला.” डॉ. प्रसाद आणि हर्षदा देवधर यांचे ‘भगीरथ ग्रामविकसन प्रतिष्ठान’, सुनील गोवारदीपे यांची ‘नॅचरल एज्युकेशन फॉर इकोलॉजिकल डेव्हलपमेंट’ या सामाजिक संस्थांच्या कार्याचे पुस्तकामध्ये दिलेले तपशील यादृष्टीने अभ्यासावेत, असे आहेत.


परिषदेचे काम करताना आंदोलने करण्याची वेळही अनेकदा येते. अन्यायकारक शुल्कवाढीविरोधात केलेले आंदोलन असो वा मुलींच्या स्वच्छतागृहांसाठी केलेली आंदोलने असो, परिषदेच्या आंदोलनांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. परिषदेची आंदोलने फक्त महाविद्यायीन परिघापुरती मर्यादित राहिली नाहीत. काश्मीरमधील हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल जागृतीसाठी केलेले ‘चलो काश्मीर’ आंदोलन असो, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन असो वा आसाममधील विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा असो, परिषद राष्ट्रीय प्रश्नांवरच्या आंदोलनातही कायमच सक्रिय राहिलेली आहे. या आंदोलनांनी आपल्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा उचलल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी पुस्तकामध्ये आवर्जून सांगितले आहे.

 
आंदोलनांचा मार्ग पत्करावा लागला, तरीही व्यवस्थेविरुद्धचा कायमस्वरूपी विखार रुजू न देणे, राष्ट्रभान न गमावणे, हे कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य परिषदेला डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांपेक्षा वेगळे बनवते. सतत संघर्षाचा पवित्रा न ठेवता ‘युथ फॉर डेव्हलपमेंट’, ‘प्रतिभा संगम’, श्रमदान शिबिरे असे विधायक कार्यक्रम परिषदेकडून आखले जातात. त्यामुळेच परिषदेमधला सक्रिय सहभाग थांबल्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही याचा कसा सकारात्मक प्रभाव पडतो, त्याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. ‘ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन’चे अध्यक्ष या नात्याने धनंजय चंद्रात्रे यांनी एकही आंदोलन न करता, रेल्वे आणि प्रवाशांची अडवणूक न करता अनेक न्याय्य मागण्या मान्य करून घ्यायचा स्वागतार्ह पायंडा पाडला हे याचे उत्तम उदाहरण!

परिषदेमधली सर्वसमावेशकता या पुस्तकामध्येही प्रतिबिंबित झाली आहे. सधन कुटुंबापासून ते अगदी वनवासी पाड्यांपर्यंतच्या भिन्न सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असणार्‍या कार्यकर्त्यांची पुस्तकामध्ये आवर्जून दखल घेतली आहे. परिषदेचे सक्रिय कार्य थांबवल्यानंतर या कार्यकर्त्यांनी पुढील आयुष्यामध्ये ज्या कार्यक्षेत्रांमध्ये ठसा उमटवला, त्यामध्येही मोठे वैविध्य आहे.दत्ता जोशी यांनी आतापर्यंत मराठी माणसांमध्ये उद्योजकता रुजावी यासाठी महाराष्ट्रातल्या 900 हून अधिक उद्योजकांच्या यशोगाथा 25 पुस्तकांमधून शब्दबद्ध करून ‘प्रेरक लेखक’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. स्वत: ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलेले असल्याने त्यांना परिषदेच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय आहे. परिषदेच्या माजी कार्यकर्त्यांच्या अनुभवांचे नेमके शब्दांकन, आवश्यक तिथे स्वतःच्या आकलनाची भर घालणे, कार्यकर्त्यांचे परिषदेमधले अनुभव आणि त्यांची नंतरची वाटचाल यांची स्वतःच्या निवेदनातून केलेली नेमकी सांधेजोड यामुळे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. ही कार्यकर्त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना ठळक करणारी प्रत्येक प्रकरणामधली ‘परिषदेने मला काय दिले’ ही चौकट लक्षवेधी आहे. राष्ट्रउभारणीमध्ये अमूल्य योगदान देणार्‍या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची पंच्याहत्तरी दृष्टिपथात येत असताना विविध अंगांनी तिचा सविस्तर लेखाजोखा मांडला जाईल, तेव्हा ‘तुम्ही बी घडा ना’ हे पुस्तक त्याला पूरकच ठरेल.


‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना’ हे पद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिषदेमध्ये नेहमी गायले जाते. त्यामध्ये ‘परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बिघडले सुवर्णचि झाले’ अशी एक ओळ आहे. आपल्याकडे आलेला वारसा कुठल्या ना विधायक मार्गाने इतरांना देणार्‍या आणि त्यातून प्रेरणेची गंगोत्री वाहती ठेवणार्‍या परिषदेच्या संस्कारांबद्दल पुस्तकामधून जाणून घेतल्यावर पद्याच्या ओळीमध्ये थोडासा बदल करून ‘परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बी घडले परीसचि झाले’ असे म्हणावेसे वाटते...
 
पुस्तकाचे नाव : तुम्ही बी घडा ना
लेखक : दत्ता जोशी
प्रकाशक : पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान
पृष्ठसंख्या : २५५
मूल्य : ३००रु.
(पुस्तकासाठी संपर्क :
पीयूष - ९४२०३४२४२४)





 


 
@@AUTHORINFO_V1@@