येमेनचे भाकरीचे ‘ब्रदरहूड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2021   
Total Views |

yemen_1
 
 
'युनिव्हर्सल ब्रदरहूड’ ही मुस्लीमजगतातील अत्यंत लोकप्रिय संकल्पना, नव्हे सूत्रच आहे. जग या संकल्पनेतूनच सुरू होते, असेही मानणारे काही महाभाग आहेत. या संकल्पनेचा अर्थ ही लोक सांगतात की, जगभरातले सगळे मुस्लीम एक आहेत. त्यामुळे अर्थातच ते सगळे भाऊ आहेत. या संकल्पनेनुसार अन्य धर्मीयांशी त्यांचे नाते काय, हा प्रश्न जगाला पूर्वापार पडलेला आहे. असो. तर मुद्दा असा की, ‘मुस्लीम ब्रदरहूड’ जगात असताना आज जगभरात मुस्लीम देशांचे जे काही चालले आहे, ते पाहून असे वाटते की, जगभरातील मुस्लीम देशच आपसात भांडत तरी असतात किंवा मुस्लीम दहशतवादाच्या गर्तेत खचलेले तरी असतात. याचेच एक दुदैवी उदाहरण म्हणजे येमेन हा देश.
 
‘अल्ला, देश, क्रांती आणि एकता’ हा या देशाचा मंत्र. पण, देशात अभूतपूर्व गरिबी आणि अन्नाची असुरक्षितता. इतकी की, ‘युएन एजन्सी’च्या मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी असलेल्या प्रादेशिक संचालक कॉरीन फ्लेशर यांनी सांगितले की, “गेल्या तीन महिन्यांमध्ये या देशातील सुमारे ५० टक्के कुटुंबांना पुरेसे अन्न मिळालेले नाही. सध्या जगभरात मदतीचा ओघ थंडावल्याने येमेनमधील गरजूंना अन्नवितरण करण्यासाठीही अडचणी येत आहेत.” त्यामुळे गृहयुद्ध, त्यातच इराण आणि सौदी अरेबियाच्या अंतर्गत विवादात अडकलेल्या येमेनची सध्या अन्नान्न दशा झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आणि जगभरातल्या अनेक मानवतावादी संघटनांनी येमेनसाठी चिंता व्यक्त केली आहे. कारण, या देशात तब्बल १ कोटी, ६२ लाख लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. ही लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या अर्धी आहे. तसेच अधिकृत माहितीनुसार, पाच वर्षांखालील २३ लाख बालक कुपोषणाचे बळी ठरणार आहेत. येमेनमध्ये पुढील वर्षी मेपर्यंत या लोकांना मदत सुरू ठेवण्यासाठी ८१ कोटींपेक्षा डॉलर्सची आवश्यक आहे. २०२२ मध्ये दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुटुंबांना खात्रीने मदत यासाठी ‘जागतिक अन्न कार्यक्रमा’ला एक अब्ज ९७ कोटी डॉलर्सची गरज आहे.
 
 
इतक्या मोठया प्रमाणावर मुस्लीम बालक कुपोषित आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मुस्लीम नागरिक उपासमारीचे बळी ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर धनिक मुस्लीम राष्ट्रे काय करत आहेत? तर येमेनचे शेजारी आहेत सौदी अरेबिया आणि इराण. सौदी अरेबिया तर स्वत:ला मुस्लीम राष्ट्रांचा मसिहाच समजत आला आहे, असे जागतिक अभ्यासकांचे मत. पण, येमेनच्या या दुर्दशेला कारणीभूत आहेत ते सौदी अरेबिया आणि इराणच! इराणची फूस असलेले दहशतवादी येमेनच्या हद्दीतून सौदी अरेबियावर हल्ला करतात, असे सौदी अरेबियाचे म्हणणे. त्यामुळे सौदी अरेबियाने काही वर्षांपूर्वी येमेनशी व्यापारी आणि इतर मदतीचे संबंध संपुष्टात आणले. त्यामुळे अनेक मुस्लीम राष्ट्रांनीही येमेनेशी संबंध तोडले. सौदी अरेबियाचे आणि त्याच्या सहकारी देशांचे म्हणणे की, इराण पुरस्कृत दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. मात्र, यामुळे येमेनची अर्थव्यवस्था कोलमडली. त्यातच कोरोनाने हाहाकार उडाल्यामुळे येमेन समर्थक इराणचेही आर्थिक नुकसान झाले. या अशा परिस्थितीत येमेनची स्थिती आर्थिकदृष्ट्या विकलांग झाली आहे. देशाची अर्धी जनता एकवेळच्या अन्नाला मुकली आहे. अन्नाची ही दशा तर इतर सोई-सुविधांचा काय बोजवारा उडाला असेल, याची तर गणना न केलेली बरी!
ताप-सर्दीसारख्या सामान्य आजारांवरही औषध किंवा उपचार मिळवणे, हे सामान्य येमेनवासीयांना दुरापास्त झाले आहे. या भीषण परिस्थितीमध्ये येमेनवासीयांना जगण्यासाठी जगावर भिस्त ठेवावी लागत आहे. सौदी अरेबिया आणि इतर मुस्लीम देशांपासून तुटलेल्या येमेनच्या मदतीला संयुक्त राष्ट्र संघ पुढे सरसावलाही आहे. येमेनच्या अनेक समस्यांसाठी जगभरातील अनेक सामाजिक संस्था एकत्र येऊन मदतही करत आहेत. पण, दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीने आणि नव्याने आलेल्या ‘ओमिक्रॉन’मुळे हा मदतीचा ओघ सध्या मंदावला आहे. सध्या सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामध्ये वाघाघाटीच सुरू आहेत. या वाटाघाटी सौदी आणि इराण या दोन देशातील अंतर्गत युद्धात सापडलेल्या लोकांसदर्भात आहेत. यामध्ये मरण्याच्या वाटेवर आला तो सामान्य येमेनवासी! हा येमेनवासीयांच्या मते, सध्या एकच ‘ब्रदरहूड’ आहे ते म्हणजे, भाकरीचे ब्रदरहूड. भुकेचे ब्रदरहूड!
@@AUTHORINFO_V1@@