योगसाधनेतून समाजजागृती..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2021   
Total Views |

Dinesh Bhutekar_1
 
 
 
वयाच्या ४१व्या वर्षी योग शिकून त्यानंतर केवळ आठ वर्षांतच दिनेश भुतेकर जागतिक स्तरावर ‘योगसाधक’ म्हणून प्रसिद्धीस पावले. त्यांच्या योगसाधनेचा आणि समाजजागृतीचा घेतलेला हा मागोवा...
 
 
साधारण दहा वर्षापूर्वींचा काळ. मराठवाड्यातल्या दिनेश भुतेकर यांच्या आजुबाजूला खूप काही घडत होते. एकीकडे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत होते, तर दुसरीकडे समाजातील व्यसनाधीनता आणि निराशाही वाढत होती. योगसाधनेमुळे या सगळ्यात बदल होईल, असे दिनेश यांना वाटले. त्याचवेळी त्यांनी ‘योगसाधनेतून समाजसेवा’ हे व्रत स्वीकारले. त्यावेळी त्यांचे वय होते ४१ वर्षे. त्यानंतर आठ वर्षांत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘योगसाधक’ म्हणून ख्याती प्राप्त केली. २०२० साली थायलंड येथे आंतरराष्ट्रीय योगस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ते भारताचे प्रतिनिधित्वही करणार होते. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. आजपर्यंत दिनेश यांनी औरंगाबाद, जालना परिसरात शेकडो योग शिबिरे घेतली. योग, प्राणायाम आणि ध्यान शिबिरातून त्यांनी हजारो युवकांना आणि युवतींना सकारात्मक जगण्याची प्रेरणा दिली. व्यसनमुक्ती आणि निराशामुक्ती यासाठी त्यांनी योगसाधनेचा मंत्र तरूणांना दिला. त्यांच्या कार्याचा आज मोठा विस्तार झाला आहे. सध्या ते ‘श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम, वेरूळ’ येथे योगशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जास्तीत जास्त वेळ शीर्षासन केले म्हणून त्यांचे नाव ‘ब्रेव्हो बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही नोंदवण्यात आले आहे. ‘द ग्रॅण्ड मास्टर’ म्हणून योगसाधनेत त्यांना ओळख प्राप्त आहे. अशा या योगसाधकाचे ‘योगसाधनेतून समाजजागृती’ हे एकमेव लक्ष्य आहे.
 
ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये योगसाधनेतून शारीरिक आणि मानसिक शक्तींची ऊर्जा वाढावी, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये देशासाठी कार्यरत व्हावे, या ध्येयाने प्रेरित होऊन दिनेश समाजात योगजागृती करत असतात. दिनेश भुतेकर यांच्या जीवनाचा मागोवा घेतला तर जाणवते की ,त्यांच्या घरात काही योगसाधनेची परंपरा नव्हती. तसेच दिनेश वयाच्या ४०व्यावर्षी योग शिकले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आयुष्यात माणूस कोणत्याही वळणावर सकारात्मक सुरुवात करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिनेश भुतेकर यांची जीवनकथा...
 
भुतेकर कुटुंब मूळचे जालन्याचे. आपले पूर्वज सरदार आणि आपण उच्च कुळातले हे पूर्वापार घराण्यात चालत आलेले संस्कार. तर या भुतेकर कुटुंबातले राधाकिशन आणि सुभद्रा या जोडप्यांना चार अपत्ये. त्यापैकी एक दिनेश. राधाकिशन हे स्वातंत्र्यसैनिक. १९४२च्या सत्याग्रहात तसेच मराठवाडा संग्रामात त्यांनी योगदान दिले. ते सांगत, “देशनिष्ठेचा धर्म हाच सगळ्यात मोठा धर्म. जे काही कराल ते देशासाठी करा.” तर सुभद्राबाई अतिशय धार्मिक. दारात आलेला कुणीही व्यक्ती अगदी प्राणीमात्रही भाकरीविना जाऊ नये, असा त्यांचा दंडक. त्या काळात दिनेश रा. स्व. संघाच्या शाखेतही जात असत. अशा प्रकारे धर्मनिष्ठा आणि देशप्रेमाच्या संस्कारांत दिनेश यांचे बालपण गेले. एकदा गावात एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून विकासकाम मार्गी लागले. अधिकाऱ्याने आपुलकीने सगळ्यांचे चहापान केले. मात्र, या लोकांनी नमस्कार करून चहा प्यायला नकार दिला. कारण, तो कार्यक्षम आणि समाजशील अधिकारी तथाकथित मागास समाजातील होता. मात्र, राधाकिशन भुतेकर यांनी चहा घेतला आणि सोबत असलेल्या दिनेशलाही दिला. तिथून बाहेर पडल्यावर राधाकिशन सगळ्यांनाच म्हणाले, “आपण ज्या साहेबांकडे गेलो होतो, त्यांनी गावासाठी चौकटी बाहेर जाऊन आपुलकीने काम केले. त्यांचा आपण आदर करायलाच हवा.” कर्माने आणि गुणाने हे साहेब आपल्या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. आपण त्यांच्यात पण जातपात शोधली? हे खूपच वाईट. तरूण वयाच्या दिनेश यांच्या मनात वडिलांचे वाक्य कायमचे कोरले गेले.
 
दिनेश यांना लहानपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा होती. मात्र, घरच्या आर्थिक जबाबदारीमुळे दिनेश यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यावेळी त्यांनी मोलमजुरीचीही कामे केली. काम करता करताच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांना बँकेत नोकरी मिळाली. या काळात त्यांना अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले. वजन भयंकर वाढले. इतके की, वाढत्या वजनाची लाज वाटू लागली. ही १२ वर्षं अशीतशीच गेली. एकदा गावात पतंजली योगशिबीरवाले आले. आपल्या शारीरिक व्याधी कमी होतील, वजन कमी होईल यासाठी दिनेश यामध्ये सहभागी झाले. सुरुवातीला योग करणे कठीण गेले. मात्र,सहा-सात महिन्यांतच दिनेश यांच्यामध्ये योगसाधनेमुळे खूप बदल झाला. स्वत:मधील सकारात्मक बदल समाजासाठीही उपयुक्त ठरावा, समाजाचे भले व्हावे, यासाठी त्यांनी स्वत:च्या आयुष्याचे नियोजन केले. जास्तीत जास्तीत वेळ योगसाधनेतून समाजजागृती कशी करता येईल, यासाठी उपक्रम सुरू केले. कोरोना काळात आश्रमाच्या माध्यमातून तर योगसाधना आणि प्रशासकीय सेवेच्या जाळ्यातून दिनेश यांनी लोकसेवेचे आदर्श उदाहरण समाजासमोर मांडले. दिनेश म्हणतात, “प्रत्येक व्यक्तीमध्ये शक्ती असते. ती देशासाठी आणि समाजासाठी उपयोगात आणली पाहिजे. त्यासाठी योगसाधना हे उत्तम साधन आहे.” योगसाधक दिनेश भुतेकर यांचे विचार आणि कार्य समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@