मुंबई : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी देणाऱ्या तरुणाला अटका करण्यात आली असून तो स्वतःला दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा चाहता म्हणवतो, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी विधानसभेत चर्चादेखील झाली असून आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करणार असल्यची घोषणा केली.
मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीला मुंबई क्राईम ब्रांचने बंगळुरूहुन अटक केली. आरोपीने आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून धमकी दिली होती. तत्पूर्वी आरोपीने ८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच या मेसेजमधून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आले. नंतर त्याने तिनदा फोन केला.
परंतु, आदित्य ठाकरे यांनी हा फोन उचलला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. आदित्य ठाकरेंनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू केला होता. आरोपी हा बेंगळुरूत होता. तेथून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.