‘जिम्नॅस्टिक’ची पूजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2021   
Total Views |

pooja surve.jpg_1
पुस्तकी ज्ञानासोबतच खेळामध्ये नैपुण्य मिळवणार्‍या ‘शिवश्री शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पूजा सुर्वे हिच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
सर्व खेळांची जननी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिम्नॅस्टिकमध्ये स्वतःचे करिअर आणि अनेक क्रीडापटू घडवणार्‍या पूजा श्रीनिवास सुर्वे हीचा जन्म मुंबईत झाला असला, तरी तिचे ठाणे शहराशी अतूट नाते जुळले आहे. मुंबईतच शिक्षणाचे धडे गिरवत असताना शाळेतील पहिला क्रमांक तिने कधीच सोडला नाही. बीएससी (कॉम्प्युटर सायन्स) केलेल्या पूजाने शिक्षणाबरोबरच नृत्य, वक्तृत्व यातही नैपुण्य मिळवल्याने युवापिढीसाठी ती एक ‘आयडॉल’ ठरली आहे.पूजाचे वडील (बी.ए.) व्यावसायिक असून, आई (बी. कॉम.) असून, त्यांना व्यवसायात मदत करतात. आईचे सुरुवातीपासूनच मत होते की, मुलांनी फक्त अभ्यास किंवा पुस्तकी ज्ञान घेऊ नये, तर सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मुलांनी मोकळ्या हवेत खेळणे आवश्यक आहे. म्हणूनच लहानपणीच पालकांनी पूजाचे नाव व्यायामशाळेत नोंदविले. व्यायामासोबतच तिला ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण दिले. मुंबईतील ‘श्री समर्थ व्यायाम मंदिर’ इथून वयाच्या पाचव्या वर्षी पूजाने जिम्नॅस्टिक खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. या खेळामुळे शरीरास सर्वांग व्यायाम होऊन शरीराची वाढ होते व शरीरास लवचिकता प्राप्त होते. हे तिच्या मनावर बिंबल्याने तिने ‘रिदमिक जिम्नॅस्टिक’मध्येच स्वतःला वाहून घेतले अन् आज ती ‘शिवश्री शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त, आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक बनून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडभरारी घेत आहे.
‘रिदमिक जिम्नॅस्टिक’मध्ये पूजाच्या यशाचा आलेख सतत चढताच राहिला. २००९ मध्ये ‘जपान वर्ल्ड चॅम्पियनशिप’, २०१० ‘मॉस्को वर्ल्ड कप’, २०१० ‘बेलारूस वर्ल्ड कप’ या आंतरराष्ट्रीय ‘रिदमिक जिम्नॅस्टिक्स’ स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. मॉस्को येथे झालेल्या ‘वर्ल्ड कप’ स्पर्धेत‘मिस एक्झॉटिक परफॉर्मन्स’चा किताबही पूजाने पटकावला. २०१० साली दिल्ली येथे झालेल्या ‘कॉमनवेल्थ’ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून प्रथमच भारताला ‘रिदमिक जिम्नॅस्टिक्स’ या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट१६वे स्थान मिळवून दिले. आजतागायत तिचा ‘कॉमन वेल्थ रँक १६ वा’ हा विक्रम कोणीही भारतीय रिदमिक जिम्नॅस्टने मोडला नसल्याचे ती सांगते.खेळात अनेक विक्रम केल्यानंतर मात्र तिने २०११ मध्ये स्वतः खेळाडू म्हणून खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ज्या खेळाने तिला एवढा मान-सन्मान मिळवून दिला, त्या खेळाचा समाजाला, देशाला फायदा मिळवून देण्याचा निश्चय करून स्वतःची ‘फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमी’स्थापन करून ठाण्यातील मुलींना ‘रिदमिक जिम्नॅस्टिक्स’चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दोन मुलींपासून सुरु केलेला हा प्रवास आज ४००हून अधिक मुलींना प्रशिक्षण देत अविरत सुरु आहे.



स्वतःच्या जिम्नॅस्टना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देण्यासाठी पूजा आधी स्वतःला परिपूर्ण करत गेली. त्यासाठी तिने आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले प्रशिक्षण घेत जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. ‘रिदमिक जिम्नॅस्टिक’ हा खेळ परदेशी असल्यामुळे, या खेळामध्ये होणार्‍या नियम बदलांचा फटका जिम्नॅस्टना बसू नये, म्हणून स्वतः अपडेट राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेचा अभ्यास करून त्यातही ‘आंतरराष्ट्रीय पंच’ ही पदवी तिने संपादन केली. २०१६ साली झालेल्या ‘रिओ ऑलिम्पिक’साठी स्पोर्ट्स वाहिनीच्या प्रसारणामध्ये ‘जिम्नॅस्टिक्स एक्सपर्ट’ म्हणून पूजाची नियुक्ती करण्यात आली होती. ‘रिदमिक जिम्नॅस्टिक’चे प्रशिक्षण घेताना अनेकजण क्षमता असूनसुद्धा आर्थिक विवंचनेमुळे या महागड्या खेळापासून वंचित राहतात, हे जाणून आई-वडिलांच्या पाठिंब्याने तिने ‘पूजा ट्रस्ट’ ही संस्था सुरु केली. या संस्थेद्वारे काही मुलींना खेळाचे प्रशिक्षण आणि खेळाची साधनेही मोफत पुरविते. खेळाच्या कामगिरीमुळे २००९-१०च्या‘श्री. शिवछत्रपती क्रीडा’ पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे. खेळाचे प्रशिक्षण घेताना व प्रशिक्षण देतानासुद्धा तिने ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्यप्रकारात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ‘उपांत्य विशारद’ ही परीक्षादेखील उत्तीर्ण केली आहे. २०१९ साली तिच्या ठाणे शहरातील कामगिरीचा आढावा घेऊन तिला ‘ठाणे रत्न’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज पूजाच्या जिम्नॅस्टिक्स अकॅडमीतल्या मुली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. पूजा मुंबईत माहीम येथे राहत असली तरी ठाण्यातील मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी न चुकता दररोज माहीम ते ठाणे हा प्रवास करते. पुस्तकी शिक्षणाचे स्तोम माजविणार्‍या पालकांना खेळाचे महत्त्व पटवून देणे अतिशय अवघड होते. पण, तरीही त्यातून मार्ग काढत विविध ठिकाणी या खेळाचे प्रदर्शनीय कार्यक्रम करते. ‘कोविड’च्या सुरुवातीच्या काळात ‘लॉकडॉऊन’मुळे क्रीडापटूंचे नुकसान होऊ नये, म्हणून तिने ‘रिदमिक जिम्नॅस्टिक्स’चे ऑनलाईन प्रशिक्षण मोफत दिले. या योगदानाबद्दल ‘भारतीय क्रीडा’ संस्था ‘साई’तर्फे ‘प्रोग्राम डायरेक्टर’ ही मानद पदवी देण्यात आल्याचे तिने सांगितले.


“तुम्ही तुमची क्षमता तुमच्यातील कमतरता ओळखा व त्यानुसार कार्यरत व्हा,” असा संदेशही पूजा युवा पिढीला देते. अशा या क्रीडाविश्वाला वाहून घेतलेल्या पूजाने भारतासाठी पदक जिंकण्याचा चंग बांधला आहे. तिच्या या महत्त्वाकांक्षेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



 
@@AUTHORINFO_V1@@