भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे फसलेले अधिवेशन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2021   
Total Views |

communist_1

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई काऊंसिल)तर्फे दि. १८ आणि १९ डिसेंबर रोजी औरंोगाबाद येथे ‘राष्ट्रीय दलित हक्क अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटक होते भाकपचे महासचिव डी. राजा, तर अध्यक्ष होते, ‘ऑल इंडिया दलित राईट्स मूव्हमेंट’चे निमंत्रक जानकी पासवान. ‘जय भिम’, ‘लाल सलाम’च्या घोषणा देणारे हे अधिवेशन... या अधिवेशनाचे फोलपण आणि त्यातील विषमता पाहून मन सुन्न झाले.. या अधिवेशनातल्या अनुभवांचे हे शब्दचित्रण...

इथे आमच्या बाबासाहेबांसाठी आलो. पण, इथे तर काय ‘लाल लाल’ चालू हे. हे ‘लाल’ काय हे? आन ‘सलाम’ बिलाम बी करीत्यात!!! आमची कागदं कुठेशी मिळतील? आजून मिळाली नाय.” अस्सल औरंगाबादी मराठी भाषेच्या लहेज्यात त्या आजी औरंगाबादच्या मिरचीच्या ठेच्यापेक्षाही जास्त तिखट आवाजात गरजल्या. आजीचा सवाल ऐकून लाल स्कार्फ बांधून आलेला तो गल्लीतला ‘सीपीएम’ नेताही जरासा गडबडला, गोंधळला. म्हणाला, ”आज्जे थांब.... जरा निवांत बस. गावाकडं शेतात बसायचं तर इथं बस. हुईल तुझं काम, मिळतील कागद.” पण, हे बोलताना त्याचा आवाज काहीसा मंदावला. त्याच्या डोळ्यातली अस्वस्थता लपता लपत नव्हती. कारण, सकाळी १० वाजल्यापासून फुलंब्री, रांजणगाव आणि औरंगाबादच्या आजुबाजूच्या गावखेड्यांतून या आयाबाया आलेल्या. आलेल्या नव्हे, तर त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका पातळीवरच्या या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणलेले! ‘तुम्हाला गायरान जमिनी मिळतील, घरं बांधून मिळतील, तुम्ही विधवा आहात, तर तुम्हाला महिन्याला पेन्शन मिळेल, नवर्‍याने सोडून दिले, तर त्ाुम्हाला पोटगी मिळेल,’ इतकेच काय तर ‘तुम्ही रिक्षा चालवणारे आहात, तर तुमच्यासाठी सरकारने पेन्शन जाहीर केली. मात्र, मोदी (म्हणजे पंतप्रधान मोदी होत) ती पेन्शन मुद्दाम तुम्हाला देत नाहीत. जर ती पेन्शन पाहिजे, तर ती इथेच तुम्हाला मिळेल.’ असे या गोरगरीब आणि परिस्थितीने रंजल्या-गांजल्या लोकांना सांगितले गेले. त्यामुळे आजुबाजूच्या गावखेड्यांतून या आयाबाया इथे आशेने दाखल झाल्या. इथे येण्याइतके गाडीभाड्याचे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यासाठी कर्ज काढून हा सगळा जमाव इथे आलेला. उपाशी तापाशी.. या सगळ्या जणींना पाहून खूप वाईट वाटत होते. भोळ्या-भाबड्या आयाबायांशी इतके खोटे आणि क्रूर कुणी वागू शकते? पण, हे दृश्य होते, ‘राष्ट्रीय दलित अधिकार आंदोलन अधिवेशनात’ले आणि या अधिवेशनाचा निमंत्रक भारतीय कम्युनिस्ट पक्ष!




औरंगाबादच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेले हे ‘दलित हक्क अधिवेशन.’ अधिवेशनाच्या निमित्ताने औरंगाबाद शहराचा परिसर लाल झेंड्यांनी, कॉम्रेड अमूक आणि कॉम्रेड तमूकच्या ‘लाल सलाम’ केलेल्या बॅनर्सनी अगदी रंगलेला. सभागृहाच्या आवारात दोन-तीन पुस्तकांचे स्टॉल लागलेले. नवीन कृषी कायद्यामध्ये काय आहे, हे सांगणारेही एक पुस्तक तिथे होते. कम्युनिस्ट पक्षाची मासिकं, पाक्षिकं आणि इतर साहित्य तिथे व्यवस्थित मांडलेले. कृषी कायदा तर आता रद्द झाला, मग हे पुस्तक का विक्रीला ठेवले? यावर तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीचे म्हणणे, ”या कायद्यात कशी मनुस्मृती होती, तीन टक्के ब्राह्मणांची ठोकशाही होती, हे लोकांना कळायला हवे, म्हणून हे पुस्तक प्रत्येक कॉम्रेडने वाचले पाहिजे.” अर्थात, पारंपरिक हिंदू असले, तरी आमच्या ज्ञात पिढ्यात कुणीही ‘मनुस्मृती’ वाचली काय, पाहिलीही नसल्याने त्या ‘मनुस्मृती’मध्ये काय लिहिले, ते या पुस्तकातून कळेल का? असे विचारण्याची इच्छा झाली. पण, इतक्यात डफली वाजण्याचे आणि ‘जय भिम, जय भिम, लाल सलाम, लाल सलाम’ म्हणत काही तरूण आले. पुढे मला असे जाणवले की, या अधिवेशनामध्ये हाच काय एकमेव तरूण मुलांचा गट होता. पाठेापाठ एक गंभीर चेहर्‍याचा वृद्ध मेगाफोनवर उद्घोषणा करत होता, “हमारे नेता कॉम्रेड डी. राजा आये हैं.’ डी. राजा आणि शेतकरी आंदोलनात नेतृत्व करणारा शीख गुरीया, ‘ऑल इंडिया दलित राईट्स मूव्हमेंट’चे निमंत्रक जानकी पासवान वगैरे दिसले. डी. राजा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव. त्यामुळे त्यांचे स्वागत जंगी होईल, असे वाटले. पण, इथे मोजून ७० ते ८० पेक्षाही कमी लोक स्वागताला. त्यातही वार्धक्याने झुकलेले वाकलेले लोक जास्त! या सगळ्यांनी ‘कॉम्रेड लाल सलाम, लाल सलाम’ असा गलका केला. मग त्यांच्या नेत्यांनीही उजवा हात कोपरापासून दोनदा का तीनदा उंचावत सलाम केला. त्यानंतर मग अधिवेशनाला सुरुवात झाली. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्सची प्रतिमा लावलेली. ‘औरंगाबाद इफ्टा’ आणि ‘नाशिक इफ्टा’च्या कलाकारांचे गीत सादरीकरण होते. टिपीकल ‘कबीर कला मंच’ किंवा त्याचेच पिल्लू ‘समता कला मंच’ यांच्या थाटाची गाणी. त्यानंतर मग सुरू झाले खुले सत्र. उर्दू मिश्रीत हिंदीमध्ये निवेदक सगळ्या प्रमुख पाहुण्यांना स्टेजवर बोलावू लागला. जनाब डी. राव, जनाब किरण रेड्डी वगैरे जनाब कांगो वगैरे.. या सत्राचे उद्घाटन आम्ही अनोख्या पद्धतीने करणार आहोत, असे त्याने सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेशेजारी निळा पडदा होता, तर मार्क्सच्या बाजूला लाल पडदा. पाहुण्यांनी गट करायचा. एका गटाने निळा, तर एका गटाने लाल पडदा पकडायचा आणि मग त्या दोन पडद्याची गाठ मारायची. तशी गाठ मारून दोन्ही पडदे वर बांधले गेले. त्यामुळे म्हणे झाले काय तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि मार्क्सच्या विचारांचे मिलन. (असे निवेदक आणि त्या व्यासपीठावर उपस्थित तमाम नेत्यांचे म्हणणे!) तर अशा अतार्किक विचारांची आणि कृत्यांची ही फक्त झाँकी होती. खुले सत्र झाले आणि मला उत्तर मिळाले की, कम्युनिस्ट विचारधारा आज देशात काय, जगातही शेवटची घटका का मोजत आहे ते!



 
एक-दोन महाराष्ट्रातले लोक सोडले, तर मंचावर बसलेले ‘सीपीएम’ पक्षाचे महामंत्री डी. राजा, शेतकरी आंदोलनचा शीख नेता गुरीया, बिहार, तामिळनाडू आणि केरळमधून आलेले त्या त्या राज्याचे ‘सीपीएम’चे प्रमुख होते. त्यांना कुणालाही मराठी भाषा बोलणे तर सोडाच, समजण्याचाही प्रश्नच नव्हता. बरं, समोर बसलेली जनता कोण? तर औरंगाबादच्या ग्रामीण भागातून आलेल्या वृद्ध महिला आणि पुरूष. गरीब आणि त्या गरिबीसोबत असंख्य प्रश्न घेऊन जगणारे ते सगळे जण. त्यांना हिंदी, तर नाहीच नाही,पण शुद्ध मराठी भाषाही कळायला कठीण जात होती. या सगळ्या जमावासमोर ‘सीपीएम’च्या नेत्यांनी भाषणं ठोकली ती चक्क इंग्रजीतून! त्यामुळे समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली. नेते काय बोलतात त्यातलं ‘ओ का ठो’ कळत नव्हते. त्यामुळे आयाबाया लघुशंकेच्या नावाने, पाणी पिण्याच्या नावाने, तर कुणी पान-तंबाखू खाण्याच्या नावानेही सभागृहाबाहेर पडू लागल्या. हे सगळे सुखनैव चालू असताना नेते मात्र भाषणबाजी करण्यात दंग होतेच. पंचाईत मात्र झाली होती ती गावपातळीवरच्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची! कारण, त्यांनी गावातून ज्या आयाबायांना आणले होते, त्या आयाबाया त्यांना म्हणत होत्या, “भैय्या, आमच्याशी ते कधी बुलणार हायेत.” अशातच प्रत्येक नेता भाषण करायला उभा राहिला की, पुढच्या दोन-चार रांगेत बसलेले कम्युनिस्ट पदाधिकारी कार्यकर्ते-कॉम्रेड ‘लाल सलाम-लाल सलाम’ असे ओरडत. हे सगळे ऐकून ‘जय भिम’च्या नार्‍यासाठी आलेला समाजगट वैतागला आणि जनतेतून मागणी झाली, ‘कॉम्रेड, जय भिम बोला, जय भिम.’ पण, मंचावर बसलेल्या ‘सीपीएम’ नेत्यांच्या चेहर्‍यावरची साधी माशीही हलली नाही.






या अधिवेशनात हे संपूर्ण सत्र रा. स्व. संघाच्या निंदेला वाहिलेले! रा. स्व. संघ कसा जातीयवादी आहे, मनुस्मृतीवर चालतो, त्यामुळे देशात कशी ब्राह्मणशाही आहे, त्यामुळे भाजप कसे मनुस्मृतीवाले आणि ब्राह्मणशाहीचे सरकार आहे, हे इंग्रजीतून सांगण्याचा या ‘सीपीएम’ नेत्यांनी धडाका लावला. डी. राजा, किरण रेड्डी, कांगो वगैरे या सगळ्यांनी भाजपशासित राज्य असलेल्या गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये कशी जातीयता आहे, दलितांवर कसा अत्याचार होतो, हे तावातावाने सांगितले. पण, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल किंवा ज्या महाराष्ट्रात हे ‘दलित हक्क अधिवेशन’ आयोजित केले होते, तिथे दलितांवर किंवा शोषित-वंचित समाजघटकांची काय परिस्थिती आहे, यावर एक चकार शब्दही काढला नाही. सगळा चर्चेचा भर होता तो देशात मनुस्मृतीचे राज्य सुरू आहे यावर! त्यामुळे देशात महिलांवर अत्याचार होतो. महिलांना संधी मिळत नाही, असेही ते म्हणत होते. पण, याच मंचावर एक लक्षणीय गोष्ट अशीही होती की, इतक्या सगळ्या नेतेमंडळीत व्यासपीठावर केवळ एकच महिला नेता बसली होती आणि तीही अगदी पाठच्या रांगेत आणि तिने एक चकार शब्दही उच्चारला नव्हता. पुरूष नेतेमंडळींची भाषणं ऐकत त्या महाराष्ट्राच्या महिला नेत्या गप्प बसल्या होत्या. समानतेची भाषा बोलणार्‍यांमध्ये ही एकमेव महिला नेता महिलांसाठी काही बोलेल, असे वाटले. पण, तिचे नाव भाषणासाठी पुकारलेही गेले नाही. तिच्या वाटेचे सगळे पुरूष मंडळीच बोलत होती. कम्युनिस्ट पक्षामध्ये ’ही’ असली स्त्री-पुरूष समानता असेलही!



 
याच सत्रात एका नेत्याने ‘बुद्ध आणि मार्क्स’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. पण कसा? तर त्याचे म्हणणे की, ”बाबासाहेब बुद्ध आणि मार्क्स यांना मानत होते आणि समाजाने बुद्धासोबत मार्क्सना पण मानावे म्हणूनच तर त्यांनी हे पुस्तक लिहिले ना?” त्यांच्या मते महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज पण कॉम्रेडच बरं का? अण्णा भाऊ साठेंचा उल्लेख तर ‘कॉम्रेड’ असाच! इतकेच काय, सगळ्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला तो ‘कॉम्रेड बी. आर. आंबेडकर’ असाच! हे अधिवेशन घेण्याआधी ही नेतेमंडळी औरंगाबादच्या धनिक आणि विद्वान लोकांनाही भेटली होती आणि ‘दलित’ शब्द योग्य की अयोग्य, यावर म्हणे चर्चाही केली. मग या नेतेमंडळींनी मत मांडले की, ”रा.स्व. संघ ‘दलित’ शब्दाला आक्षेप घेतो. ‘दलित’ शब्द हटवा म्हणून रा. स्व. संघ पाण्यासारखा पैसा ओततो. कारण, त्यांना ‘दलित’ऐवजी जातिवाचक नावं घ्यायची असतात.” नेता हे सगळे बोलत असताना मला भेटलेले सगळेच संघ पदाधिकारी, स्वयंसेवक आठवले, ज्यांनी आयुष्यात कधीही जातिवाचक तर सोडाच, पण, ‘हा दलित...तो सवर्ण’ असा विषय चुकूनही केला नाही. असो. तर आपले भाषण सुरू असताना हाच नेता मग सांगू लागला की, दलित कोण? तर दलित म्हणून त्याने मागासवर्गातील जातींचे नाव घेण्याचा सपाटा चालवला. त्याचे म्हणणे या देशाला रा. स्व. संघाला ‘हिंदुस्थान’ करायचे आहे. पण, या संपूर्ण अधिवेशनामध्ये असंख्य वेळा देशाचे नाव ‘हिंदुस्थान’ असेच घेतले गेले, हे विशेष!



 
‘दलित हक्क अधिवेशना’मध्ये सभागृहाबाहेर एका कॉम्रेडने बिसलरी पाण्याच्या बाटल्या विकायला ठेवल्या होत्या. त्यांच्याकडून २० रूपयाला पाण्याची बाटली विकत घ्यायची होती. पहाटेपासून प्रवास करत आलेल्या आयाबाया दुपारी ३-४ वाजेपर्यंत तहानेने व्याकुळ झालेल्या. पण, पाण्यासाठी २० रूपये त्या खर्च कशा करणार? याच कम्युनिस्ट नेत्यांनी टाटा-बिर्ला-अंबानी आणि अदानी यांच्या भांडवलशाहीवर कडाडून टीका केली. ते कसे पाणी विकतात, पाणी काय विकायची गोष्ट आहे का, असा खडा सवालही प्रत्येक नेत्याने केला होता. याच अधिवेशनात दलितांच्या हक्कासाठी काय करता येईल, यासाठी अशा प्रकारे प्रत्येक नेता मनुस्मृती, भाजप, रा. स्व. संघ, भांडवलशाही बिर्ला, टाटा, अंबानी, अदानी यांवर इंग्रजीत भाषण करत होता. या सगळ्या भाषणांचा शेवट एकच होता तो म्हणजे, २०२४ साल हे दुष्ट मनुस्मृतीवाल्यांसाठी अत्यंत वाईट असणार आहे. कारण, २०२४ साली भारतात एकमताने आणि निर्विवादपणे कम्युनिस्ट पक्षाचे सरकार येणार आहे. शेवटी या परिषदेचा सारांश ठराव एका निर्णयाने ठरला तो म्हणजे दुनिया इकडची तिकडे होईल, पण या देशात २०२४ साली सत्तेत येणार तो कम्युनिस्ट पक्षच! नेत्यांची अशी उच्चकोटीच्या नशेतली भाषण सुरू असताना इथे आयाबाया चुळबूळ करू लागल्या. सभागृहाच्या मागच्या बाजूने गावरान भाषेतली तार स्वरातली भांडणं ऐकायला येऊ लागली. एकच गोंधळ उडाला. मग नेत्यांच्या हातातला माईक ओढत निवेदकाने निवेदन केले, “हे पाहा हे ‘एलिट’ पाहुण्यांसाठी असलेल्या जेवणाच्या कँटिनमध्ये कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. तुमच्यासाठी वेगळे फूड पॅकेट आहेत. तुमच्यासाठी ते जेवण नाही.” पुन्हा एकदा २०२४ साली कम्युनिस्ट पक्षच सत्तेत येणार आणि मनुवादी, जातीयवादी विषमतावादी गोरगरिबांचे शोषण करणारे भाजप सरकार हारणार, असे बोलून हे सत्र आटोपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. अर्थात, तोपर्यंत सभागृहात कोण थांबणार? लोकं आपआपले फूड पॅकेट घेऊन आले. पुरीभाजीचे ते छोटे पुडके, पण पाणी? पाणी कुठे होते? ते तर बाहेर कॉम्रेड २० रू. बाटली दराने विकत होता.






इतक्यात एका महिलेचे लक्ष माझ्या हातातल्या वर्तमानपत्राकडे गेले. कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यकर्त्याने प्रकाशित केलेले वर्तमानपत्र या अधिवेशनात वाटण्यात आले. तेसुद्धा सुशिक्षित लोकांना दिले गेले, तर ती महिला माझ्याकडे ते वर्तमानपत्र मागू लागली. तीचे म्हणणे, या पेपरमध्ये गायरान जमिनी आणि घर या अधिवेशनाने लोकांच्या नावावर करून दिले आहे. तुम्ही शहरातल्या दिसता. तुम्हाला गायरान जमिनीची काय गरज, मला तो पेपर द्या. तिच्या बोलण्याला सगळ्या महिलांनी दुजोरा दिला. एका पेपरातली नावावर केलेली गायरान जमीन त्या सगळ्या वाटून घेणार होत्या. हे ऐकून कम्युनिस्ट पक्षाच्या हुशारीबद्दल मनात जराही किंतु राहिला नाही. इतके विषमतावादी आणि ढिसाळ नियोजनाचे संमेलन मी आजवर कधीही पाहिले नव्हते. सभागृहाबाहेर आले. तिथे एका चित्राभोवती चार-पाच आजीबाई जमलेल्या. त्यापैकी एका आजीचे म्हणणे, ”संविधान आमचे आहे. आमच्या बाबासाहेबांनी लिहिले.” आजी असे का म्हणतात, म्हणून चित्राकडे पाहिले, तर चित्रात संविधान आणि त्यासोबत लाल मशाल घेतलेला एक तरूण. जो भारतीय वाटतच नव्हता. संविधानासोबत लाल मशाल कशाला? धम्माचा निळा झेंडा असायला हवा होता ना माय, असे आजीचे म्हणणे. कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना आणि हाताच्या बोटावर उरलेल्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान, या देशाचे आणि या देशातल्या भोळ्या-भाबड्या जनतेचे भावविश्व कळलेच नाही, हे नक्की, तर अशा ही फसलेल्या अधिवेशनाची कहाणी...






 
@@AUTHORINFO_V1@@