आधी ट्रेकिंगच्या क्षेत्रात आणि सध्या नाशिकच्या ‘बाईकर्स ग्रुप्स’मध्ये आपली ‘रायडर राजा’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या भूपेश खैरनारविषयी...
खानदेशातील शिरपूरचा भूपेश सावता खैरनार याचा जन्म. त्याचे बालपण मालेगाव तालुक्यातील रावळगावात गेले. ‘रावळगाव इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये माध्यमिक शिक्षण त्याने पूर्ण केले. बारावीनंतर एक वर्षाचा ‘कॉम्प्युटर डिप्लोमा’ आणि नंतर मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवली. मात्र, भूषणचे मन अभ्यासात रमले नाही. एकदा सहज मित्रांंसोबत त्रिंगलवाडी येथे तो ट्रेकिंगला गेला.
यादरम्यान डोंगरावर चढाई करणे, सूर्यास्त, सूर्योदय पाहण्याचा आनंद या गोष्टींमुळे त्याला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर कर्नाळा किल्लाही त्याने सर केला. याच किल्ल्यावर एक दिवस आधी बिबट्या आढळला होता. मात्र, तरीही त्याने हे धाडस केले. याच दरम्यान ट्रेकिंगची आवड आणि नोकरी करण्याची मानसिक स्थिती नसल्याकारणाने त्याने चांगली नोकरीदेखील नाकारली. काही काळ त्याने एका अमेरिकेच्या आणि नंतर नाशिक येथील एका सामाजिक संस्थेतही काम केले.
भूपेशचा फेसबुकवरील एक मित्र विविध स्थळांना भेटी दिल्यानंतर ते फोटो सोशल साईट्सवर अपलोड करायचा. त्यावेळी भूपेशने त्या मित्राशी संपर्क साधला असता, त्याची टुरिझम कंपनी असल्याचे समजले. त्यानंतर काही दिवसांतच भूपेशही त्या टुरिझम कंपनीत रुजू झाला.
2019 साली भूपेशच्या आयुष्याला सर्वार्थाने कलाटणी मिळाली. कधी साधा रेल्वेने प्रवासही न केलेल्या भूपेशने तब्बल सात ते आठ राज्यांना भेटी दिल्या. पगारातून काही पैशांची बचत करण्यास भूपेशने सुरूवात केली. तसेच ‘शेअर मार्केट’चे ज्ञान मिळवत त्याने उत्पन्नाचा आणखी स्रोत निर्माण केला. 2020 साली लेह-लडाखला जाण्याचे त्याचे नियोजन कोरोनामुळे फिस्कटले. सर्व काही ठप्प झाल्याने त्याच्याकडे प्रचंड मोकळा वेळ होता. मग यादरम्यान भूपेशने ‘बाईक रायडिंग’विषयीचे व्हिडिओ, ब्लॉग सोशल साईट्सवर पाहिले आणि ‘बाईक रायडिंग’चे क्षेत्र त्याला खुणावू लागले.
अखेर त्याने ‘बाईक रायडिंग’साठी ‘ऑफ रोड’ आणि ‘ऑन रोड’ चालणारी ‘हिरो एक्स पल्स’ बाईक खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिक शहरात आणि मालेगावातील शोरूम्सलादेखील या बाईकविषयी कल्पना नव्हती. त्याने ‘हिरो’ कंपनीच्या दिल्ली कार्यालयात वारंवार संपर्क साधला. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर मालेगावच्या शोरूममध्ये अवघ्या 15 दिवसांत गाडी दाखल झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाडी घेतल्यानंतर मालेगावहून तो घरी रावळगावला जात असताना वाटेत त्याला तब्बल 50हून अधिक जणांनी थांबवत गाडीविषयी विचारपूस केली. विशेष म्हणजे, ही बाईक असलेला मालेगाव तालुक्यातील भूपेश हा एकमेव व्यक्ती आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या संपवून नाशिकला तो पुन्हा नोकरीवर रुजू झाला. यानंतर भूपेश नाशिकच्या ‘एक्स पल्स बाईक रायडर्स’ग्रुपसोबत जोडला गेला. त्यानंतर तो ‘ऑफ रोड रायडिंग’साठी गंगापूर धरण परिसरातील गेला असता, शूज, गिअर्स नसतानाही त्याने ‘बाईक रायडिंग’चे धाडस केले. यानंतर मात्र भूपेशने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘बाईक रायडिंग’कडे भूपेशनेे ‘करिअर’ म्हणून पाहात आपली वाटचाल सुरू केली. आतापर्यंत भूपेशने नाशिक जिल्ह्याचे चारही कोपरे आपल्या बाईकने सर केले आहेत.
कोरोनामुळे दोन वर्षे रद्द झालेला ‘इंडिया बाईक विक’ अर्थात ‘बाईक रायडर्स’च्या लोणावळा येथील कुंभमेळ्यालाही त्याने हजेरी लावली. यावेळी देशातील नामांकित, प्रसिद्ध बाईक रायडर्स, युट्यूबर्स यांची भेट घेतल्यानंतर त्याला ‘बाईक रायडिंग’चे जग खूप व्यापक आणि विस्तृत असल्याची जाणीव झाली. तसेच नाशिकला ‘एमआरएफ आयएनआरसी’ची फायनलमध्येही तो दोनदा सहभागी झाला.
“मी राईडसाठी गेल्यावर माझ्या घरीदेखील नातेवाईकांनी त्याविषयी कुजबूज केली. आधी मी घरीदेखील खोटी कारणे सांगायचो. मात्र, नंतर मी माझ्या कुटुंबीयांना बाईक प्रेमाविषयी समजावले. लोकांना दारूचे व्यसन असते, फिरण्याची आवड असते, मात्र मला ‘बाईक रायडिंग’ची आवड आहे,” हे भूषण आज अगदी अभिमानाने सांगतो. ‘बाईक रायडिंग’च्या आवडीने भूपेशचा मित्रपरिवारदेखील वाढीस लागला. सध्या ‘एक्स पल्स’च्या ग्रुपमध्ये 46 जणांचा समावेश आहे.
बिलकस व्हॅली, विन्ड मिल्स, कसारा घाट, घाटनदेवी, पिकॉक हिल्स, लोणावळा अॅम्बी व्हॅली, कणकवली घाट, अस्वली धबधबा, वैतरणा, ब्रह्मगिरी अशा अनेक ठिकाणी त्याने ‘बाईक रायडिंग’ यशस्वीपणे पूर्ण केले. सीएस संतोष यांना तो आपले आदर्श मानतो. ‘बाईक रायडिंग’मुळे सर्व चिंता दूर होऊन आयुष्यात लढण्यासाठी बळ मिळते. माझ्या ‘बाईक रायडिंग’च्या प्रेमामुळे मला ‘रायडर राजा’ ही ओळख मिळाली. तुमच्याकडे बाईक कोणती आहे, यावर काहीही अवलंबून नसते. तुम्हाला खरोखर इच्छा, आवड आहे का, हे महत्त्वाचे आहे.
गाडीला किक मारा, सोबती घ्या आणि वेगवेगळ्या लोकेशनवर जा. ज्यांना या क्षेत्रात यायचे असेल, त्यांना अनेक युट्यूब चॅनल्सवर या क्षेत्राविषयी माहिती मिळू शकते. हे क्षेत्र प्रत्येकाला सोबत घेऊन चालते,” असे भूषण सांगतो. सरकारदरबारी ‘बाईक रायडिंग’ला साहसी खेळाचा दर्जा देण्याची मागणी भूषण करतो. तसेच डकार रॅलीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याचबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास बाईकवर पूर्ण करण्याचाही त्याचा मानस आहे. ‘बाईक रायडिंग’ क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्याचे स्वप्न पाहणार्या या साहसी ‘रायडर राजा’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
- पवन बोरस्ते
7058589767