नाशिक : फादरमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षातून आणि होत असलेल्या त्रासाला कंटाळून फादर अनंत आपटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार रविवार, दि. १९ डिसेंबर रोजी समोर आला. आपटे यांनी स्वतःला चर्चमध्ये जाळून घेतल्याची माहिती आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर रविवारी रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. या घटनेमुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा चर्चमधील अंतर्गत संघर्षाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील त्र्यंबक नाक्याजवळ असलेल्या ‘सेंट थॉमस चर्च’ येथे असलेले बिशप शरद गायकवाड हे मागील काही दिवसांपासून फादर अनंत आपटे यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देत होते आणि त्यांचा छळही करीत होते. याबाबत फादर गायकवाड यांच्याविरोधात आपटे यांनी मुख्य फादर यांच्याकडे तक्रार देखील केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर हे प्रकरण वाढत गेले आणि रविवारी ज्यावेळी ‘सेंट थॉमस चर्च’मध्ये प्रार्थना सुरू होती त्याच वेळेस संतप्त झालेले फादर अनंत आपटे यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले.
ही घटना या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविक आणि चर्च कमिटीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्पेटमध्ये त्यांना गुंडाळून आग विझवली. या आगीत फादर अनंत आपटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चमधील वाद हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मागील महिन्यामध्ये चर्चमध्ये सुरू असलेला भानगडी वरूनच उपनगर येथे मारामारी देखील झाली होती.