ज्येष्ठांचा आधारवड रमेश पारखे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2021   
Total Views |

Manasa 2_1  H x


ग्राहक संरक्षण, ज्येष्ठांसाठी कार्य, मानवाधिकार, माहितीचा अधिकार अशा चारविभागात प्रचंड कार्य करणार्‍या रमेश पारखे यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...


रमेश यांचा जन्म दि. १ ऑक्टोबर, १९४३ रोजी खान्देशमधील अमळनेर येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्यांचे बालपण खान्देशात गेले. त्यांचे वडील पोस्टात अधिकारी होते. त्यामुळे ते वडाळ्याला राहण्यासाठी आले. मराठी कुटुंबीय तिथे फारसे नव्हते. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत पूर्ण झाले. ‘छबिलदास बॉईज हायस्कूल’ येथे त्यांनी आठवीला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी अकरावी मॅट्रीक होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही. त्यांची फौजदारी वकील होण्याची इच्छा होती. पण, दुसरीकडे घरचा गाडा ओढण्यासाठी त्यांना अर्थार्जन करणे गरजेचे होते. त्यांच्यामध्ये शिक्षण घेण्याची जिद्द होती. त्यामुळे वयाच्या ३६व्या वर्षी त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. १९५८मध्ये रमेश डोंबिवलीत राहायला आले.शालेय जीवनापासून घरोघरी वर्तमानपत्रे टाकण्यातून त्यांच्या अर्थार्जनाला सुरूवात झाली. त्या पैशातून भावांचे आणि स्वत:चे शालेय शुल्क ते भरत असत. त्यावेळी रमेश अकरावीला होते. त्यांची आई आजारी होती. तिला औषधोपचार करायला पैसे नसायचे. त्यांच्या बहिणींनी नोकरी पत्कारली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी वर्कशॉपमध्ये नोकरी स्वीकारली. पोटासाठी कोण जी नोकरी करतो ती हलकी आहे की, भारी हे पाहायचे नाही हे आईने शिकविले होते. सहा महिन्यांनी ‘इलेक्ट्रीक’ बोर्डात नोकरी मिळाली. पण, त्यांना १८ वर्ष पूर्ण न झाल्याने ती नोकरीही हातातून गेली. अचानक ‘टर्मिनेशन’ त्यांच्या हाती आले होते. रेल्वेमध्ये रुळावर खडी टाकण्याची नोकरी वयाच्या १८व्या वर्षी मिळाली. डोक्यावरून खडी वाहण्याची त्यांना सवय नव्हती. सहा महिने पूर्ण होण्याच्या दोन दिवस आधी टाईमकिपर यांनी ५०० रूपयांची मागणी केली. ५०० रूपये दिले की, मी तुम्हाला ‘मन्थली बेसस’वर घेतो. पण ते पैसे देता न आल्याने रमेश यांची तीही नोकरी गेली. आयुष्यात संघर्ष करायला आईने शिकविले होते. पोटासाठी जी नोकरी करतो तिला हलकी आणि भारी असे समजायचे नाही हे आईने शिकविले होते. त्यामुळे ज्या ज्या नोकर्‍या मिळत गेल्या त्या त्या रमेश यांनी स्वीकारल्या. १६व्या वर्षी परिस्थितीशी झगडत होते. कुणाचाही पाठिंबा नव्हता. ‘एम्पलॉयमेंट’मधून रमेश यांना एक नोकरी मिळाली. १९६२ साली चीनचे आक्रमण झाले होते. त्यावेळी त्यांना माणसं हवी होती. वर्कर म्हणून काम करावे लागेल. फॅक्टरी साफ करावे लागत होते. फोरमॅनने दोन महिन्यांनी वर्कशॉपमध्ये काम दिले. पत्र्यातून बंदुकीची गोळी कशी बनविली जाते हे समजले. १९६२ मध्ये ‘टायपिंग’ आणि ‘शॉर्टहॅण्ड’ शिकून घेतले होते. त्यानंतर ठाणे ‘आरटीओ’ येथे नोकरी मिळाली. केंद्र सरकारच्या एका नोकरीची संधी मिळाली. दि.१ ऑक्टोबर, १९६६ पासून ‘एलआयसी’मध्ये कामावर रूजू झाले. ‘टायपिस्ट’ म्हणून त्यांनी काम स्वीकारले होते. दि. १ जानेवारी, २००० नंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘सुपरवायझर’ म्हणून मुलाखत दिली त्यात रमेश पहिले आले. ते पहिले प्रमोशन ‘एलआयसी’मध्ये मिळाले होते. ५८व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आयुष्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करायचे ठरविले होते. पर्यावरण, मानवाधिकार, ग्राहक यांच्यासाठी काम सुरू केले. १९९० पासून ‘कन्झुमर अ‍ॅक्टीव्हीटी’मध्ये त्यांनी चार ते पाच केसेस जिंकल्या आहेत. पाच हजारांच्या वर नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. २००० मध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद झाले. त्यानंतर वेगवेगळ्या मुव्हमेंट आल्या. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे २००७ साली अध्यक्ष झाले. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करीत असताना त्यांच्या कामाची पद्धत पाहून ‘फेस्कॉम’ने कोकण विभागाची जबाबदार दिली. २००९ साली निवडणुकीत रमेश यांनी अर्ज भरला. कोकण प्रादेशिक विभागातील पाच जिल्हे आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर पाच जिल्ह्यांचे प्रादेशिक सचिव झाले. २०१२ ते १५ मध्ये त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले. तीन वर्षाची एक टर्म होती. पुन्हा दुसर्‍या टर्ममध्येही त्यांना निवडून दिले. दोन टर्मनंतर काम करता येत नसल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. संघटनेशी ते आताही जोडलेले आहेत.




ज्येष्ठांसाठी अनेक कायदे असतात. त्यांची त्यांना जाणीव करून दिली. ज्येष्ठांच्या वैयक्तीक केसेस खूप आल्या, त्या सोडविल्या. महाराष्ट्र सरकारने जे धोरण जाहीर केले होते, त्या अनुषंगाने सोयी-सुविधा द्यायच्या होत्या. कडोंमपा त्या सोयीसवलती देत नव्हती. ज्येष्ठ नागरिक सातत्याने पाठपुरावा करीत होते. रमेश पारखे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांनी एक मोर्चा काढला व त्यानंतर महापौरांनी ज्येष्ठ नागरिक शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीपश्चात त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. हेच ज्येष्ठ नागरिक संघाचे मोठे यश होते. सरकारने ज्येष्ठांना सोयी-सुविधा द्या, आरोग्यविषयक सुविधा द्या, आरोग्यशिबीरे जाहीर करा हे सर्व धोरणात दिले होते. मात्र, कुणीही ते मान्य करायला तयार नव्हते. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून माहिती घेतली. नगरविकास कमिशनरकडे पत्रव्यवहार केला. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सर्व ठिकाणी करण्यास सुरूवात केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण मिळावे, असे कायदा सांगतो. त्यासाठी धोरणदेखील आहे. ज्येष्ठ नागरिक संरक्षण समिती स्थानिक पातळीवर व्हायला हवी. ती स्थापन व्हावी त्यासाठी पत्रव्यवहार केला. डोंबिवलीला पोलीस समिती आहे. विविध ठिकाणी संरक्षण समिती स्थापन झाल्या. रमेश यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. सुमारे दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना संरक्षण कायद्यावर मार्गदर्शन केले आहे. ज्येष्ठांना न्यायालयातून न्याय मिळवून दिला आहे. एखाद्या केसमध्ये ज्येष्ठांना व त्यांच्या मुलांना समुपदेशन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सात ते आठ टक्के जणांना ‘पेन्शन’ आहे. बाकी सर्वजण सरकारी औषधांवर अवलंबून आहेत. त्यासाठी रमेश सरकार दरबारी अजूनही झगडत आहे. ज्येष्ठांचा अधिकार त्यांना द्या, त्यांची आयुष्याची संध्याकाळ सुसह्य होईल असे पाहा, त्यांना प्रेमाने वागवा यासाठी झटणार्‍या रमेश पारखे यांना दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.




@@AUTHORINFO_V1@@