‘युनिर्व्हसिटी ऑफ वाकेन पण मोडणार नाही’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2021   
Total Views |

sanjay raut_1  
 
 
"आप आए, बहार आई,” मी राहुल राजकुमारांना बोललो. त्यांनी मोदींची जशी गळाभेट घेतली, तसा त्यांच्या गळ्यातसुद्धा पडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी माझ्याकडे पाहिलेही नाही. अगदी ढुंकूनही पाहिले नाही. काही किंमतच नाही बुवा! अपमान घोर अपमान!!! पण, आता ‘वाकेन पण मोडणार नाही’ हा शेवटी आमचा बाणाच आहे म्हणा! तर काय म्हणत होतो मी, हा...ते आले आणि बहार आली! आता कशी बहार आली ते मात्र विचारू नका. नाही म्हणजे विचारण्यात काही अर्थच नाही. अहो, त्यांचा डोक्यावर ‘हात’ आहे, म्हणून तर आमची महाराष्ट्रात मौज आहे, तीच बहार आहे, नाही तर ‘घड्याळ्यांच्या काट्यां’चे काय? कधी उलटसुलट फिरवून १२ वाजवतील याचा काही नेम नाही बघा! त्यांचा ‘हात’ आहे, साथ आहे म्हणून आमची बहार आहे; नाहीतर महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला सत्तेपासून स्थगिती दिली होती. पुन्हा म्हणून कधी आम्ही राजसिंहासनावर बसलो तरी असतो का? काय म्हणता, मी लाळघोटेपणा करतो? चमचागिरी करतो? हे बघा, तुम्ही महाराष्ट्रातील लोकं ना कधी सुधारणार नाहीत. काकासाहेबांसाठी मोठ्या मुश्किलीने खुर्ची उचलून आणत होतो, तर त्यातही तुम्हाला माझी चमचेगिरी दिसली. त्यांच्या कन्येसोबत बहारदार नृत्य करत होतो, तर त्यातसुद्धा तुम्हाला काहीतरी गैरच वाटले. आता राहुल राजकुमारांना ‘बहार’ म्हटले, तर त्यातहीतुम्हाला वेगळे वाटते. तसेही ‘तुम आ गये हो नूर आ गया हैं। बहारों फूल बरसाओ मेरा राजकुमार आया हैं’ वगैरे म्हटल्यापेक्षा ‘आप आए बहार आई हैं’ कसं ‘शॉर्ट’ आणि ‘स्वीट’ वाटतं. काय म्हणता? माझ्यासाठी नवीन योजना आहेत म्हणता? कोणती?काय म्हणता शैक्षणिक योजना? कोणती? होतकरू नोकरदारांनी आपल्या ‘बॉस’ची मर्जी कशी राखावी? आपल्या डोक्यातली संस्कृतीमूल्ये गाडून लाचारी कशी मुरवावी, हा शैक्षणिक उपक्रम राबवू म्हणता? ‘वाकेन पण मोडणार नाही’ असे विद्यापीठ काढू म्हणता? यात लाचारी, द्वेष, तलवार-कोथळा-वाघनखे, ‘गिरेंगे तो भी टांग उपर’ आणि ‘सोनियामाई पुराण’ तसेच ‘काकासाहेब गुणाख्यान’, असे सहा विषय शिकवायचे म्हणता? त्यात तर माझा हातखंडा आहे. आणि आता तर युवराजांना भेटून आलो. त्यामुळे मी धन्य धन्य झालो. विद्वान झालो. का हसलात? राजकुमार विद्वानच आहेत, तर त्यांचा विद्वतापूर्ण आशीर्वाद घेऊन ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे विद्यापीठ मी काढणारच; नव्हे नव्हे काढले आहेच!
 

वाईन : एक जीवनावश्यक वस्तू

 
जगण्यासाठी काय हवे? भाकर, घर आणि कपडे. छे! ‘वाईन’ही हवीच!!! म्हणूनच तर महाविकास आघाडी सरकार दैनंदिन गरजेची दुकाने, ‘डिपार्टमेंटल स्टोअर्स’ व बेकरींमधून ‘वाईन’च्या बाटल्यांच्या विक्रीला मुभा देण्याची अधिसूचना लागू करण्याची शक्यता आहे. किती ही लोककल्याणकारी कामगिरी! महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात सरकार बळकावल्यापासून दारू, ‘वाईन’, बिअरशॉप वगैरे आता जीवनावश्यक गोष्टी झाल्या आहेत की काय, असे वाटू लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून बहुतेक सगळ्याच लोककल्याणकारी योजनांना स्थगिती दिली. या स्थगिती पुराणामध्ये वेगाने निर्णय घेतले गेले, ते केवळ दारू, बिअर आणि ‘वाईन’ संदर्भात. हे सरकार दारूबाजांचे खरे गुणग्राहक सरकार आहे, असे खात्रीपूर्वक वाटावे, अशी राज्यात परिस्थिती. असो. ‘वाईन’वर दहा रुपये अबकारी कर आकारण्यात येणार आहे .त्यामुळे सरकारच्या तिजोरीतपाच कोटींचा महसूल जमा होणार आहे, असे म्हटले जाते. महसूल जमवण्यासाठी हा निर्णय! ‘वाईन’ विक्रीच्या समर्थनासाठी सरकारने कितीही मखलाशी केली की, ‘वाईन दारू नाही’ वगैरे तरीसुद्धा दुदैवाने आज महाराष्ट्रात अशीही घरं आहेत की, जिथे दारूड्या नवर्यापासून ५-५० रूपये लपवून मुलांसाठी तांदूळ, गहू खरेदी करणार्या आयाबाया या किराणा दुकानात जातात. त्यांचा संसार दारूसाठी उद्ध्वस्त झाला. या माऊलींसाठी ‘कमी अल्कोहोल असणारी’ ‘वाईन’ म्हणजे जीवनावश्यक वस्तू कधीच ठरु शकत नाही. विवाह सोहळ्यात विनाकारण गळाभेट करत नाचणार्यांचे, दारूच्या पार्ट्यांवर पार्ट्या रिचवणार्यांचे किंवा ‘नाईट लाईफ’ला सर्वोत्तम‘लाईफ’ मानणार्यांचे जग वेगळे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे जग वेगळे. ‘वाईन’ ही जीवनावश्यक वस्तू वाटावी इतकी अजूनही महाराष्ट्राची संस्कृती नशेली झाली नाही. महसुलात भर पडावी म्हणून महाविकास आघाडी सरकारने किराणामालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीस ठेवणे आणि ‘धरण कोरडे म्हणून त्यात मुतू का?’ म्हणून याच सरकारच्या नेत्याचे एकदा विचारणे हे दोन्हीही सारखेच! तितकेच असंवेदनशील आणि संस्कृतीहीन! महाविकास सरकार महसूल वाढवण्यासाठी ‘वाईन’ला जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात जागा देत आहे. काय म्हणावे, ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!’
 
@@AUTHORINFO_V1@@