रत्नागिरी : राज्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने संपाची कोंडी अद्यापही फुटलेली नाही. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच आहे. या दरम्यान, अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 'निलंबित झालेल्यांना बडतर्फ केले जाऊ शकते. सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही', असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
'१० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. अडीच हजारापेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त झाली आहे. प्रशासन कारवाईचे एकएक पाऊल पुढे टाकत आहे. जे निलंबित झालेत ते बडतर्फ होऊ शकतात. सरकारला अशी कारवाई करण्याची बिलकूल इच्छा नाही. परंतु लोकांना वेठीला धरून अत्यावश्यक सेवा वेठीला धरली जात असेल तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ते वापरावे लागतील', अशी प्रतिक्रीया परब यांनी दिली आहे.
'एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार की नवी नोकर भरती करणार?, असा सवाल करण्यात आला. त्यावर या संदर्भात बैठक व्हायची आहे. त्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. एसटीच्या सेवेत आतापर्यंत २२ हजार कर्मचारी परत आले आहेत. एसटीची १२५ डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बऱ्यापैकी वाहतूक सुरू आहे. तर विदर्भ मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. २० तारखेनंतर हळूहळू वाहतूक सुरू होईल,' असेही ते म्हणाले.